भारतीय टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने देशभरातील आपली 3G सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत सर्वत्र ही सेवा बंद करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. 3G सेवा बंद करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात देखील झाल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली.

एअरटेल कंपनी सध्या प्रतिग्राहक सरासरी उत्पन्न (ARPU)वाढवण्यावर भर देत आहे. परिणामी काही दिवसांपूर्वीच कंपनीने ग्राहकांना दणका देताना इनकमिंग व्हॉइस कॉल्सची वैधता कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता 3G सेवा बंद करण्याचा निर्णय देखील प्रतिग्राहक सरासरी उत्पन्न वाढवण्याच्या आणि सेवेतील गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने घेण्यात आल्याची माहिती आहे. कोलकात्यामधून 3G सेवा बंद करण्यास कंपनीने सुरूवात केली आहे. यानंतर कंपनी केवळ 4G सेवेवर लक्ष्य केंद्रीत करेल. 3G सेवा बंद करण्यात येणार असली तरी 2G मात्र सुरूच असेल असंही कंपनीने स्पष्ट केलंय.

एअरटेलचा ग्राहकांना दणका –
एअरटेलच्या प्रीपेड ग्राहकांना इनकमिंग कॉल सुरू ठेवण्यासाठी आता आधीपेक्षा लवकर रिचार्ज करावं लागणार आहे. एअरटेलने किमान रिचार्ज स्कीममध्ये बदल केला आहे. हे केवळ प्रीपेड रिचार्जसाठी लागू असणार आहे. रिचार्जची वैधता संपल्यानंतर खात्यात बॅलेन्स शिल्लक असेल तरीही केवळ 7 दिवसांपर्यंतच इनकमिंग कॉल्स येऊ शकतील, यापूर्वी ही वैधता 15 दिवसांसाठी होती. कंपनीने हा निर्णय प्रतिग्राहक सरासरी उत्पन्न (ARPU) वाढविण्यासाठी घेतल्याचं सांगितलं जात आहे.

सध्या टेलिकॉम कंपन्या किमान रिचार्ज आणि स्मार्ट रिचार्जवर भर देत आहेत. याअंतर्गत वैधता मर्यादित असते, म्हणजे ग्राहकांना सातत्याने रिचार्ज करावं लागतं. एअरटेलच्या रिचार्ज प्लॅनची सुरूवात 23 रुपयांपासून आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असून कॉलिंगसाठी वेगळं रिचार्ज करावं लागतं. दरम्यान, खिशावर थेट भूर्दंड पडणार असल्याने एअरटेलच्या इनकमिंग कॉलच्या नव्या नियमाबाबत ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.