अनेकदा एखादी टीप, मित्र-मैत्रिणींशी भेट किंवा आवडता छंद मूड फ्रेश करायला पुरेसा ठरतो. तुम्हाला माहीत आहे का, आपला आहार आणि मूड यांचा थेट संबंध आहे. आपण ज्या गोष्टी खातो, त्या गोष्टी आपल्याला आनंदी किंवा उदास होण्यास कारणीभूत ठरू शकतात. काही खाद्यपदार्थ आनंदी करणारे हार्मोन्स वाढवतात. तज्ज्ञांच्या मते राग, तणाव व थकवा दूर करण्यासाठी औषधांवर अवलंबून न राहता, आपल्या आहारात थोडा बदल केला. तर, आपण मानसिकदृष्ट्या स्थिर आणि उत्साही वाटू शकतो. चला तर मग बघूया, मूड नैसर्गिकरीत्या चांगला ठेवण्यासाठी कोणते पदार्थ मदत करतात.

१. मानसिक शांतीसाठी केळी

केळी हा फक्त पोट पटकन भरणारा नाश्ता नसून, मन प्रसन्न ठेवण्यासाठीदेखील उत्तम पर्याय आहे. त्यात ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो अ‍ॅसिड असतं. हे शरीरात गेल्यावर सेरोटोनिन नावाच्या न्यूरोट्रान्समीटरमध्ये रूपांतरित होतं. सेरोटोनिनला हॅपी हार्मोन म्हटलं जातं. कारण- त्यामुळे हलकं, आनंदी राहून आरामदायी वाटतं. केळी खाल्ल्यावर चिडचिड, राग आणि थकवा कमी होण्यास मदत होते. तसेच, केळ्यात असलेले फायबर आणि पोटॅशियम शरीरात शक्ती संतुलन जतन करतात. दिवसभरातील कामाचा ताण कमी करण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी केळी खूप फायदेशीर आहेत. पचन सुधारण्यातही त्याचा मोठा फायदा आहे. तज्ज्ञांच्या मते, नियमितपणे केळी खाल्ल्याने मानसिक आरोग्य सुधारतं, तणाव कमी होतो आणि झोपेची गुणवत्ता चांगली राहते. सकाळी नाश्त्यात किंवा संध्याकाळी स्नॅक्समध्ये एक-दोन केळी खाणं हा शरीरासाठी एक उत्तम उपाय आहे.

२. तणाव कमी करण्यासाठी काजू

आपण अनेक वेळा काजू फक्त स्नॅक्स किंवा गोड पदार्थांमध्ये खातो; पण काजू हे फक्त चविष्ट नसून मानसिक आरोग्यासाठीही खूप उपयुक्त आहेत. त्यात मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असतं. हे खनिज मेंदूसाठी खूप आवशयक आहे. त्यामुळे काजू खाल्ल्याने तणाव कमी होतो आणि मन शांत राहते. काजूत प्रथिने, आरोग्यदायी चरबी आणि खनिजेदेखील असतात. हे शरीराला दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतात. जेव्हा शरीराला आवश्यक पोषण मिळतं, तेव्हा आपण अधिक उत्साही वाटतो. तज्ज्ञ सांगतात की, दररोज थोडेसे काजू स्नॅक्स म्हणून खाल्ले, तर मूड सुधारतो, कामाचा ताण कमी होतो.

३. आनंदासाठी डार्क चॉकलेट

चॉकलेट हा गोड खाणाऱ्यांचा आवडता पदार्थ; पण डार्क चॉकलेट मूड सुधारण्यासाठी खास ओळखलं जातं. त्यात फ्लेवोनॉइड्स नावाचे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे मेंदूत रक्तप्रवाह सुधारतात. रक्तप्रवाह चांगला झाला की, मेंदू ताजातवाना राहतो आणि तणाव कमी होतो.
डार्क चॉकलेट सेरोटोनिन आणि एंडॉर्फिन्ससारखे आनंदी भावना वाढविणारे हार्मोन्स वाढवण्यात मदत करतं. त्यामुळे मन प्रसन्न राहतं, चिंता कमी होते आणि मूड हलका होतो. तज्ज्ञांच्या मते, थोड्या प्रमाणात डार्क चॉकलेट खाल्लं, तर दिवसभरातील ताण कमी होतो.

४. पचनासाठी प्रो-बायोटिक अन्न

मानसिक आरोग्य आणि पचन यांचा थेट संबंध आहे. जर पोट निरोगी असेल, तर मूडदेखील उत्तम राहतो. प्रो-बायोटिक अन्नामुले शरीरात चांगले जीवाणू वाढतात, ज्यामुळे पचन सुधारतं. पोट हलकं राहिलं की, ताणतणाव आपोआप कमी होतो. ताक किंवा आंबवलेल्या भाज्या हे प्रो-बायोटिक्सचा चांगला आधार आहेत. हे पदार्थ नियमित खाल्ल्यास आतड्यांचं आरोग्य सुधारतं आणि शरीराला पोषण मिळतं. आतडी निरोगी असतील, तर ‘गट-ब्रेन अ‍ॅक्सिस’ नावाच्या नात्यामुळे मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे चिंता, थकवा व मानसिक अस्थिरता कमी होते.