How Much Toothpaste Is Safe To Apply : दात स्वच्छ आणि चमकदार दिसण्यासाठी सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे तुमचे दात, हिरड्या निरोगी राहतात आणि तोंडात रात्रभर वाढणाऱ्या बॅक्टेरियापासून तुमचे संरक्षणसुद्धा होते. त्यामुळे अनेकदा दात स्वच्छ राहावे म्हणून किंवा तोंडाचा वास जावा म्हणून आपण ब्रशवर जास्त टूथपेस्ट लावतो. बरोबर ना? तर तुम्हीही असेच करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. कारण ब्रशला जास्त टूथपेस्ट लावल्याने तुम्ही नुकसान ओढून घेताय एवढे तर नक्की…

तर दात घासताना, आपण टूथपेस्टच्या प्रमाणाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. तज्ज्ञांच्या मते, ब्रशला लावण्यासाठी मटारच्या आकाराची टूथपेस्ट पुरेशी आहे. मटारच्या आकाराची टूथपेस्ट ब्रशवर घेतल्याने दात चांगल्या प्रकारे स्वच्छ करण्यासाठी पुरेसे आहे. मोठ्यांबरोबर लहान मुलांचीसुद्धा दात घासताना अधिक काळजी घेतली पाहिजे आणि त्यांनाही टूथपेस्ट कमी प्रमाणात ब्रशवर घेण्याचा सल्ला दिला पाहिजे. लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक ठरतो आणि अतिरिक्त टूथपेस्टचा वापर दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतो.

टूथपेस्टचा जास्त वापर हानिकारक का आहे?

जास्त प्रमाणात टूथपेस्ट वापरणे दातांसाठी हानिकारक ठरू शकते. दात मजबूत करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टूथपेस्टमध्ये असलेले सोडियम फ्लोराइड अधिक प्रमाणात वापरल्यास तोंडाचे आरोग्य बिघडू शकते. अशा परिस्थितीत दातांवर पोकळी निर्माण होऊ शकतात आणि मुलांमध्ये फ्लोरोसिससारख्या समस्यादेखील उद्भवू शकतात. यामुळेच डॉक्टर दात स्वच्छ ठेवण्यासाठी थोड्या प्रमाणात टूथपेस्ट वापरण्याचा सल्ला देतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माउथवॉश कधी वापरायचे?

तोंडाच्या आरोग्याशी संबंधित काही समस्या असल्यास, सर्वप्रथम डेंटिस्टचा सल्ला घ्या. जर तुमचे तोंडाचे आरोग्य सामान्य असेल, तर तुम्ही ब्रश केल्यानंतर माउथवॉश वापरू शकता. यामुळे तोंडाला ताजेपणा येतो आणि दुर्गंधीच्या तक्रारीपासूनही सुटका मिळते. याशिवाय तोंडातील हानिकारक बॅक्टेरिया कमी करण्यासदेखील मदत होते. पण, कोणत्या प्रकारचा माउथवॉश तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला डेंटिस्टचा सल्ला घ्यावा लागेल.