अनेक दशकानंतर सध्या २१ व्या शतकात जागतिक पातळीवर जगातील बहुतेक सर्व देशांना एकाचवेळी भेडसावणारे “कोरोना व्हायरस साथीचे” संकट आलेले आहे (स्वातंत्र्यपूर्वी विसाव्या शतकाच्या सुरवातीला “प्लेगसारख्या” व्याधीने भारतीय समाजामध्ये मोठे अस्वास्थ्य निर्माण झाले होते). गेल्या तीन महिन्यांपासून चीन देशामध्ये प्रचंड वेगाने पसरलेल्या “कोरोन विषाणूंचा प्रादुर्भाव” हा जवळजवळ सर्व जगात पोहचलेला आहे. “चीन” नंतर दक्षिण कोरिया, इटली, इराण, जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, भारत, अशा इतर अनेक देशांमध्ये “कोरोना विषाणूंचा” प्रादुर्भाव दिवसेंदिवस वेगाने वाढतो आहे व “मानवी” होत आहे.

कोरोना व्हायरसची लागण होऊ नये म्हणून आपण कोणती खबरदारी घेऊ शकतो?
• कोरोना व्हायरसच्या धोक्यापासून सक्षमपणे दूर राहण्यासाठी एकूण एक सर्व निकश पाळण्याची अनिवार्य आवश्यकता आहे.
• साथीच्या काळात शक्यतोवर अनिवार्य असल्याशिवाय घरातून बाहेर पडू नये.
• गर्दीच्या ठिकाणी, मोठ्या जनसमुदायात उदा. उद्याने, बाजारपेठा इ. वावरणे टाळावे.
• नागरिकांनी एकमेकांमध्ये सदैव सुयोग्य अंतर ठेवूनच संभाषण साधावे व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे “ प्रत्येक व्यक्तींनी समाजात वावरताना “मास्क” चा उपयोग करणे अनिवार्य आहे.
• मास्क विश्वासार्ह कंपन्यांचे वापरावे.
• रुमाल वापरत असाल तर तो स्वच्छ व पुरेसा मोठा असावा.

(आणखी वाचा : COVID-19 आयुर्वेदीय दृष्टिकोन भाग १ : व्याधी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दिनचर्या )

करोना विषाणूंचा संसर्ग एका रुग्णाकडून दुसऱ्या व्यक्तिकडे श्वासोच्छासामार्गे हवेच्या माध्यमातून संसर्ग होऊ शकतो. हे विषाणू व्यक्ति बोलताना, शिंकताना, खोकताना जे थुंकी आनुषंगिक तुषार उडतात ते हवेच्या माध्यमातून एका व्यक्तिकडून दुसऱ्या व्यक्तिकडे संक्रमित होण्याची शक्यता असते. परिणामतः सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी ह्या तसेच इतर आणखीन “गंभीर” समस्यासुध्दा निर्माण होऊ शकतात. तसेच “कोरोना विषाणूंचा संसर्ग” झाल्यास रुग्णाच्या फुफ्फुसात त्या विषाणूंमुळे अनेक प्रकारची हानी होते असे रुग्ण परिक्षण करताना संशोधनाच्या दरम्यान तज्ञांना आढळून आलेले आहे. रुग्णपरीक्षण करताना फुफ्फुसाच्या “ऊती” या जीवाणूंच्या संसर्गाने काही प्रसंगी “विदीर्ण” झालेल्या आढळतात. त्यामुळे सर्वांनीच बोलताना, शिंकताना, किंवा खोकताना मुखाजवळ पुरेश्या मोठ्या स्वच्छ हातरुमालाचा उपयोग विशेषत्वाने करणे अत्यंत आवश्यक आहे.

काही कामानिमित्त बाहेर जाण्याची आवश्यकता आलीच तर बाहेरुन घरात आल्यावर काहीही खाण्यापूर्वी, भोजनापूर्वी व एकूणच दिवसातून ५-६ वेळा तरी वेळोवेळी तळहात साबणाने स्वच्छ चोळून धुवावेत.

(आणखी वाचा : COVID-19 आयुर्वेदीय दृष्टिकोन भाग २ : व्याधी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चौकस आहार )

आयुर्वेदाच्या दॄष्टीने दिवसभर “जंतूघ्न” अशा “कडूनिंब” पाण्यात घालून ते पाणी चांगले उकळवून ठेवावे व अशा पाण्याने दिवसभर हात धुवावे. त्यामुळे तळहातांची त्वचाही सुरक्षित राहील व विशेषतः लहान मुलांचे तळहात नाजूक असतात. त्यामुळे त्यांची योग्य ती काळजी घेतली जाईल.

सारांश, सद्यकाळात दिवसागणिक मानवी समाजात पसरणाऱ्या “कोरोना व्हायरसचा” परिणामकारक बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने ह्या लेखात दैहिक तसेच मानसिक अशी सर्वांगीण व्याधिप्रतिकारशक्ती सक्षम होण्याच्या दॄष्टीने उद्धॄत केलेल्या सर्व उपाययोजनांचा सुयोग्य प्रकारे अंमल केल्यास आपण हया जीवघेण्या काळातूनही यशस्वीपणे व संपूर्णपणे बाहेर पडू असा सल्ला भारतीय समाजाचा एक घटक म्हणून नितांत आत्मविश्वास वाढवणारा ठरतो व माझ्या इतर सर्व बंधुभगिनींमध्ये असा विश्वास ह्या लेखाद्वारे प्रस्थापित होईल याची मला खात्री वाटते.