दुचाकी म्हटली की काही वर्षांपूर्वी बजाज कंपनीची चेतक ही स्कूटर अगदी लगेच आपल्या डोळ्यासमोर यायची. मात्र मागच्या काही काळात ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये झालेल्या प्रगतीमुळे विविध कंपन्यांनी आपल्या अनेक गाड्या लाँच केल्या. त्यामध्ये स्कूटर मागे पडली आणि कालांतराने दिसेनाशी झाली. मधल्या काही काळात भारतात स्कूटरसारख्या दिसणाऱ्या दुचाकी बनविण्याचे अनेक प्रयत्न झाले. काही वर्षांपूर्वी आलेली परदेशी कंपनीची वेस्पा (Vespa) ही गाडी त्याचेच एक उदाहरण आहे. पण आता इतक्या वर्षानंतर बजाजची चेतक ही गाडी पुन्हा बाजारात येत असल्याचे कोणी सांगितले तर कदाचित तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. पण ‘हमारा बजाज’ म्हणत ही गाडी पुन्हा येत आहे. बाजारात पुन्हा नव्याने प्रवेश करण्यासाठी कंपनी सज्ज झाली असल्याचे चित्र आहे.

चेतक ही एकेकाळी घरातील एका सदस्याप्रमाणे असणारी गाडी होती. आता ५० ते ६० वर्षे वय असणाऱ्या वयोगटातील अनेकांच्या या गाडीशी भावना जोडलेल्या होत्या. त्यामुळे ही चेतक पुनरागमन करत असेल तर तिच्या असंख्य चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बाब आहे. ही गाडी कदाचित पुढच्या वर्षी लाँच होऊ शकते. १९७२ पाहून २००६ पर्यंत या गाडीचे उत्पादन सुरु होते. पण काही कारणाने मागील जवळपास १२ वर्षं हे उत्पादन बंद करण्यात आले होते. गिअर नसलेल्या स्कूटर बाजारात आल्यानंतर बजाज चेतक अपडेट करण्यात आली नव्हती. त्याचा परिणाम विक्रीवर झाला आणि २००९ मध्ये कंपनीला आपला गाशा गुंडाळावा लागला. बजाज ही स्कूटरच्या बाबतीत कायमच बादशाह म्हणून प्रसिद्ध होती. कधी काळी कंपनीचे ५० टक्क्यांहून अधिक शेअर्स होते. पण सध्या बजाजच्या स्कूटर सेगमेंटमध्ये केवळ १५ टक्के मार्केट शेअर वाचले आहेत.

सध्या बाजारात असलेल्या होंडा एक्टिवा, पियागो, वेस्पा आणि अप्रीलिया SR150 यांच्याशी बजाजच्या स्कूटरची स्पर्धा आहे. नव्या बजाज चेतकची किंमत ७० हजार रुपये असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचे इलेक्ट्रिक व्हर्जनदेखील भारतीय बाजारात लॉन्च केले जाऊ शकते. बजाजच्या नव्या मॉडेलमध्ये १२५ सीसी, एअर कूल्ड इंजिन दिलं असून हे इंजिन ९-१० bhp आणि ९ Nm टॉर्क जनरेट करू शकते. तसेच यामध्ये सिंगल आर्म फ्रंट संस्पेशन आण रियर मोनोशॉक दिले जाणार आहे असेही सांगण्यात आले आहे. तसेच बसण्यासाठी आरामदायी सीट, ब्लूटुथ कनेक्टीव्हीटी, सामान ठेवण्यासाठी सीटखाली जागा, पाय ठेवण्यासाठी पुरेशी जागा देण्यात येणार आहे.