आपण स्किन केअर म्हंटल कि केवळ हात आणि त्वचेचा विचार करतो. मात्र मानेकडे कुणाचेही फारसे लक्ष दिले जात नाही. अंघोळीदरम्यान आपण मान घासून साफ करतो तेवढंच. परंतु चेहरा, मान यांचा एकसमान रंग राहण्यासाठी काही सोप्या टिप्स सोशल मीडियावर @click4su नावाच्या अकाउंटने शेअर केल्या आहेत.

आपल्या नेहमीच्या काही सवयींमुळे आपली मान काळवंडते. मानेवरील त्वचा गडद रंगाची होऊ लागते. असे होऊ नये त्यासाठी, चेहरा आणि मान यांचा रंग एकसमान होण्यासाठी काय करावे आणि काय नको ते पाहा. तसेच मानेचा काळपटपणा घालवण्यासाठी घरगुती उपायसुद्धा जाणून घ्या.

हेही वाचा : Summer skin care : उन्हाळ्यात टॅन घालवण्यासाठी कोरफडीचा फेसपॅक कसा बनवायचा पाहा…

मानेवर काळपटपणा येऊ नये यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्या?

तुम्ही गळ्यात एखादी चेन घालत असल्यास, ती चेन रात्री झोपताना गळ्यातून काढून ठेवावी.

खूप कडक कॉलर असणारे शर्ट घालणे टाळावे. अति कडक कॉलरचे शर्ट घातल्यास मानेच्या त्वचेला त्रास होऊ शकतो.

अनेकांना अंघोळ करताना मान खसखसून, घासून स्वच्छ करायची सवय असते. मात्र तसे केल्यानेदेखील मानेचा रंग गडद होऊ शकते. मान काळी पडू शकते.

मानेचा रंग उजळण्यासाठी काय करावे?

स्वतःला दररोज व्यायाम करायची सवय लावावी

आपल्या आहार पौष्टिक असून, त्यामध्ये भाज्यांचा अधिक प्रमाणात समावेश असावा.

घराबाहेर पडताना, हात आणि चेहऱ्यासह मानेलादेखील न चुकता सनस्क्रीन लावावे.

तुमच्या शरीरात व्हिटॅमिन्स म्हणजेच जीवनसत्त्वांची कमतरता आहे का हे तपासून पाहावे. खासकरून, ब 12 [vitamin B १२] आणि ड जीवनसत्त्व शरीरात योग्य प्रमाणात असल्याची खात्री करावी.

हेही वाचा : Beauty tips : तूप, बदाम अन्….; काय आहे घरगुती काजळ बनवण्याची पारंपरिक ट्रिक, जाणून घ्या

मानेचा काळपटपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय

मानेचा काळपटपणा घालवण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या रसाचा वापर करू शकता. बटाट्याचा रस मानेवर लावल्यास, तिचा काळपटपणा कमी होण्यास मदत होऊ शकते.

कुंकुमादी तेलाने मानेवर मसाज केला, तर त्यानेदेखील काळवंडलेली मान उजळण्यास मदत होईल

सर्वात सोपा उपाय म्हणजे डाळीचे पीठ आणि हळद यांपासून बनवलेली पेस्ट. आपण चेहरा उजळण्यासाठी वापरत असलेल्या हळद आणि डाळीचे पीठ या दोन गोष्टींचा वापर करून, त्यांचे एक मिश्रण बनवून घ्यावे. हे मिश्रण मानेला लावून ठेवा. असे केल्यानेदेखील मानेची त्वचा उजळ होण्यास मदत होऊ शकते.

असे साधे आणि सोपे उपाय इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @click4su नावाच्या अकाउंटने शेअर केले आहेत. या व्हिडिओला आत्तापर्यंत ७८९k इतके व्ह्यूज मिळाले आहेत.