Blood in Cough: खोकल्यात रक्त येणे ही कधीच साधी गोष्ट नसते. खोकल्याबरोबर रक्त दिसल्याने कुणालाही घाबरायला होऊ शकतं. वैद्यकीय भाषेत याला हेमोप्टिसिस म्हणतात. बरेच लोक याकडे साधा खोकला किंवा घशाची खवखव म्हणून दुर्लक्ष करतात, पण हे फुफ्फुसाशी संबंधित गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. टीबी, फुफ्फुसाचा कॅन्सर, ब्रॉन्किएक्टेसिस आणि पल्मोनरी एम्बोलिझम ही खोकल्यात रक्त येण्याची मोठी कारणे असू शकतात. वेळेवर उपचार न केल्यास हे जीवघेणेही ठरू शकते.

२०२२ मध्ये इंडियन जर्नल ऑफ मायकोलॉजीमध्ये छापलेल्या एका अभ्यासात दिसून आले की, भारतात हेमोप्टिसिसची जवळपास ६०% प्रकरणे टीबीमुळे होतात, तर BMC Pulmonary Medicine च्या अभ्यासानुसार, जर खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव (मॅसिव्ह हेमोप्टिसिस) वेळेवर थांबवला नाही तर मृत्यूची शक्यता ५०% पेक्षा जास्त असते.

हेमोप्टिसिस म्हणजे काय?

हेमोप्टिसिस म्हणजे फुफ्फुस किंवा खालच्या श्वसनमार्गातून येणारं रक्त. हे रक्त फेसाळ, चमकदार लाल किंवा कफासोबत मिसळूनही बाहेर येऊ शकतं. हे रक्त नाक, तोंड किंवा पोटातून येणाऱ्या रक्तापेक्षा वेगळं असतं.

रक्तस्त्राव किती धोकादायक असू शकतो?

मोठ्या प्रमाणात हेमोप्टिसिस म्हणजे २४ तासांत साधारण २०० ते ६०० मिलीलिटरपेक्षा जास्त रक्त बाहेर येणे किंवा श्वास घेण्यास अडथळा निर्माण करणारी कुठलीही रक्ताची मात्रा असं मानलं जातं. BMC च्या अभ्यासानुसार, सौम्य हेमोप्टिसिस कधी कधी संसर्ग किंवा हलक्या जळजळीमुळे होऊ शकतो. पण, मध्यम किंवा जास्त प्रमाणात हेमोप्टिसिस झाल्यास स्थिती गंभीर होऊ शकते. विशेषतः नियंत्रणात न आलेल्या मॅसिव्ह हेमोप्टिसिसमध्ये मृत्यूदर ५०% पेक्षा जास्त असतो.

टीबी

फुफ्फुसातील टीबी हे हेमोप्टिसिसचं सर्वात मोठं कारण आहे. सक्रिय टीबी संसर्ग आणि जुन्या टीबीमुळे झालेल्या जखमा, दोन्हीही रक्तस्त्रावाचं कारण ठरू शकतात. २०२२ मधल्या भारतीय अभ्यासानुसार, ६० टक्के प्रकरणांमध्ये टीबी हे हेमोप्टिसिसचं मुख्य कारण आहे.

ब्रॉन्किएक्टेसिस

ब्रॉन्किएक्टेसिस तेव्हा होतो, जेव्हा वारंवार होणारे संसर्ग श्वसनमार्गांना नुकसान पोहोचवतात आणि रक्तवाहिन्या कमकुवत होतात. वारंवार होणाऱ्या फुफ्फुसाच्या संसर्गामुळे एअरवेच्या भिंती कमजोर होतात, त्यामुळे रक्त येण्याची शक्यता वाढते. मॅसिव्ह हेमोप्टिसिसच्या प्रकरणांत ब्रॉन्किएक्टेसिस हे मुख्य कारणांपैकी एक आहे.

श्वसन संसर्ग

न्यूमोनिया किंवा ब्रॉन्कायटिसमुळे फुफ्फुसाच्या ऊतींमध्ये सूज येऊ शकते आणि लहान रक्तवाहिन्या फुटू शकतात, त्यामुळे थुंकीत रक्ताच्या रेघा दिसू शकतात. ही प्रकरणे जास्त धोकादायक नसतात, पण तरीही डॉक्टरांची तपासणी गरजेची असते.

फुफ्फुसांचा कर्करोग

फुफ्फुसात ट्यूमर वाढल्याने रक्तवाहिन्या खराब होऊ शकतात. अनेक रुग्णांमध्ये हेमोप्टिसिस हा फुफ्फुसाच्या कॅन्सरचा पहिला संकेत असतो. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

हेमोप्टिसिसची इशारे देणारी लक्षणे

  • खोकल्यासोबत जास्त प्रमाणात रक्त येणे
  • काही दिवसांपासून वारंवार रक्त येणे
  • श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे किंवा चक्कर येणे
  • रात्री घाम येणे, ताप येणे किंवा कारणाशिवाय वजन कमी होणे
  • टीबी, धूम्रपान किंवा फुफ्फुसांच्या जुन्या आजारांचा इतिहास