Soaked Fruit for Health: दररोज फक्त दोन-तीन हे गोड आणि पौष्टिक फळ पाण्यात भिजवून खाल्ले आणि काही दिवसांतच पचन सुरळीत झालं, असं अनेकांचा अनुभव सांगतो. पण, हा साधा ड्रायफ्रूट खरोखरच इतका परिणामकारक असतो का? संशोधन सांगतं, होय! ड्रायफ्रूट्स आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर मानले गेले आहेत, पण त्यातही हे गोड आणि पौष्टिक फळ सर्वाधिक गुणकारी फळ मानलं जातं, कारण हे फळ फक्त शरीराची कमजोरी दूर करत नाही, तर आतड्यांचं आरोग्य सुधारतं, त्वचेला तजेला आणतं आणि मनही शांत ठेवतं.
संशोधन काय सांगतं?
आंतरराष्ट्रीय Nutrients या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका पुनरावलोकनानुसार, अंजीर ही मानवनिर्मित सर्वात जुनी पिकं मानली जातात. जवळपास ६,००० वर्षांपासून त्याची लागवड होत आहे. या संशोधनात असंही नमूद आहे की, अंजीरमध्ये व्हिटॅमिन्स, खनिजे, डायटरी फायबर, ऑर्गेनिक ॲसिड्स आणि अमिनो ॲसिड्स मुबलक प्रमाणात असतात. याशिवाय, यात असणारे फ्लॅव्होनॉइड्स, कॅरोटेनॉइड्स आणि टोकोफेरॉल्स ही संयुगं शरीरातील पेशींना ताजेतवाने ठेवतात. आयुर्वेदिकतज्ज्ञ आचार्य बालकृष्ण सांगतात, “अंजीर अत्यंत शक्तिवर्धक आणि पौष्टिक आहे. हे कमजोर लोकांच्या शरीरात नवचैतन्य भरतं आणि शरीराची ताकद वाढवते.”
१. पचनक्रिया सुधारते, आतड्यांची होते स्वच्छता
आयुर्वेद सांगतो की, अंजीर हा नैसर्गिक पचनवर्धक पदार्थ आहे. यातील घुलनशील आणि अघुलनशील फायबर आतड्यातील घाण साफ करतं आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवून देतं. अंजीरमधील एन्झाईम्स अन्नाचं पचन सुलभ करतात, त्यामुळे गॅस, सूज आणि जडपणा कमी होतो. अनेक संशोधनात दिसून आलं आहे की, अंजीरच्या नियमित सेवनाने Irritable Bowel Syndrome (IBS) ची लक्षणं कमी होऊ शकतात.
२. शरीरातील कमजोरी व थकवा घालवते
अंजीर हे नैसर्गिक एनर्जी बूस्टर आहे. “अंजीर हे शक्तिवर्धक आणि पौष्टिक आहे. कमकुवत शरीरात ते नवचैतन्य आणतं आणि अंगात बळ देतं.” यातील नैसर्गिक साखर आणि मिनरल्स शरीराला त्वरित ऊर्जा देतात, त्यामुळे दररोज कामाचा ताण असणाऱ्यांसाठी अंजीर अमृतासमान आहे.
३. हृदयाला ठेवते निरोगी
अंजीरमध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित ठेवतात, तर त्यातील अँटिऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात. काही वैद्यकीय संशोधनांनुसार, अंजीर ब्लड शुगर लेव्हल स्थिर ठेवून हृदयविकाराचा धोका कमी करू शकते.
४. मेंदू आणि स्मरणशक्ती सुधारते
अंजीरमधील पॉलीफेनॉल्स आणि अँथोसायनिन्स ही संयुगं मेंदूच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह ताणापासून वाचवतात.
काही प्रायोगिक अभ्यासांनुसार, अंजीरचं सेवन अल्झायमर, चिंताग्रस्तता आणि विस्मरण कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतं. वय वाढत असतानाही मन तल्लख ठेवण्याचं हे एक नैसर्गिक साधन आहे.
५. वजन नियंत्रणात ठेवते
अंजीर हे कमी कॅलरी आणि जास्त फायबरयुक्त फळ आहे, त्यामुळे ते पोट जास्त वेळ भरलेलं ठेवतं आणि वारंवार खाण्याची सवय कमी करतं. हेल्दी स्नॅक म्हणून हे अतिशय उपयुक्त पर्याय ठरू शकतं.
निष्कर्ष
अंजीर हे फळ म्हणजे आरोग्याचा नैसर्गिक साठाच आहे. आतड्यांचं आरोग्य सुधारायचं असेल, थकवा दूर करायचा असेल किंवा मन शांत ठेवायचं असेल तर अंजीर आहारात नक्की समाविष्ट करा. तथापि, कोणताही नवीन आहार सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
