Breast Cancer Warning Signs: जगभरात लाखो महिलांना हादरवणारा रोग म्हणजे स्तनाचा कॅन्सर. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये तब्बल २.३ दशलक्ष महिलांना या आजाराने गाठले, तर जवळपास ६.७ लाख महिलांनी जीव गमावला. त्यातील धक्कादायक गोष्ट म्हणजे बहुतांश वेळा हा आजार वेळेवर समजतच नाही. लक्षणं डोळ्यासमोर असतानाही ती साधी, किरकोळ गोष्ट मानून स्त्रिया दुर्लक्ष करतात. पण खरी गोष्ट अशी आहे की, वेळेवर लक्ष दिलं, तर हा आजार टाळणे किंवा नियंत्रणात ठेवणे शक्य होऊ शकते. पण प्रश्न असा आहे, ती कोणती चिन्हे आहेत, जी इशारा देऊ शकतात? चला जाणून घेऊया, स्तनाच्या कॅन्सरची ५ अशी गंभीर लक्षणं जी दुर्लक्षित केली, तर जीवावर बेतू शकते…

महिलांनो, ही ५ चिन्हं घेतली नाहीत गंभीर तर जीवावर बेतू शकतं संकट

१) स्तनाच्या आकारात, रूपात किंवा दिसण्यात बदल

आपल्याला रोज आरशात दिसणाऱ्या स्तनात अचानक सूक्ष्म बदल दिसू लागले– आकार, आकृती किंवा बाह्य स्वरूप बदलले, तर ती धोक्याची घंटा आहे. अनेक वेळा स्त्रिया याकडे वयानुसार होणारा बदल किंवा वजनात झालेला फरक यांमुळे असे झाले असेल, असा समज करून घेतात. पण, सतत होत राहणाऱ्या अशा बदलांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

२) स्तनात किंवा बगलेत गाठ

स्तनाच्या कॅन्सरचे सर्वांत सामान्य लक्षण म्हणजे गाठ. गाठ लहान, कठीण किंवा अनियमित आकाराची असू शकते. लक्षात ठेवा प्रत्येक गाठ कॅन्सरची नसली तरी प्रत्येक गाठीची डॉक्टरांकडून तातडीने तपासणी करून घ्यायलाच हवी.

३) स्तनाभोवतीच्या त्वचेतील विचित्र बदल

कधी त्वचेला संत्र्याच्या सालीसारखा दाट पोत येतो, कधी लालसरपणा किंवा ओढल्यासारखे दिसते. हे बदल साधे नाहीत. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास धोका वाढू शकतो.

४) स्तनाग्रातील (निप्पल) अनियमितता

निप्पल आत ओढले जाणे, त्यावर पुरळ किंवा रॅश येणे, द्रवपदार्थ स्रवणे – या चिन्हांकडे बहुतांश वेळा महिलांकडून दुर्लक्ष केले जाते. पण तज्ज्ञ सांगतात की, हेसुद्धा गंभीर संकेत असतात.

५) स्तनात सतत वेदना

कॅन्सर म्हणजे केवळ गाठ नाही. कधी स्तनात किंवा बगलेत सतत जाणवणारा त्रास, वेदना किंवा सूज हीसुद्धा लक्षणे असू शकतात. हा त्रास वारंवार जाणवत असेल, तर विलंब न लावता वैद्यकीय सल्ला घ्या.

लक्षात ठेवा, ही माहिती तुमच्या सुरक्षिततेसाठी आहे. हा वैद्यकीय सल्ला नाही. जर अशा कोणत्याही लक्षणांची जाणीव झाली, तर ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. जीवन अमूल्य आहे आणि त्यामुळे सावधानता बाळगण्याशिवाय पर्याय नाही!