– डॉ. मुझम्मील शेख
जगभरात जवळपास ७०% मृत्यूंना असंसर्गजन्य रोग कारणीभूत असतात. अकाली वयात होणाऱ्या या मृत्यूंपैकी ८५% पेक्षा जास्त मृत्यू अल्प व मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये होतात. भारतात जवळपास ५.८७ मिलियन लोक (एकूण मृत्यूंपैकी ६०%) असंसर्गजन्य रोगांना बळी पडतात. बैठ्या जीवनशैलीमुळे या रोगांचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. स्तनांचा कर्करोग हा एक अतिशय गंभीर असंसर्गजन्य रोग असून याचे प्रमाण वेगाने वाढत आहे.
खरेतर, स्तनांचा कर्करोग पुरुषांना देखील होऊ शकतो परंतु स्त्रियांमध्ये याचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात जास्त असते. जगभरात तसेच भारतात महिलांना ग्रासणाऱ्या कर्करोगांमध्ये बहुतांश प्रमाण स्तनांच्या कर्करोगाचे आहे. २०१६ सालच्या ग्लोबल बर्डन ऑफ डिजीज स्टडी नुसार १९९० ते २०१६ या कालावधीत भारतात स्तनांच्या कर्करोगामध्ये ३९.१ टक्के वाढ झाली. २०१६ मध्ये ५.२६ लाख व्यक्ती या रोगामुळे आजारी होत्या. स्तनांच्या कर्करोगाचा धोका वाढण्यामागे अनेक कारणे असतात. यापैकी काही घटक मानवी नियंत्रणाबाहेर असतात. पण अनेक बाबी अशा आहेत ज्यांच्यावर आपण लक्ष ठेऊ शकतो. अति खाणे, व्यायामाचा अभाव या गोष्टी टाळून संतुलित, पोषक आहार घेतल्याने आपण हा धोका टाळू शकतो. आपल्या नियंत्रणात असलेली सर्वात प्रमुख बाब म्हणजे अति जाडेपणा, स्तनांच्या कर्करोगाच्या प्रमुख कारणांमध्ये याचा समावेश आहे.
आणखी वाचा- फुप्फुसाच्या कर्करोगाशी लढण्यासाठी…
भारतीय महिलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याचे प्रमाण खूप जास्त असल्याने स्थिती अधिकच गंभीर आहे. २०१८ च्या ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्टनुसार जगभरात जवळपास ३९% वयस्क व्यक्तींचे वजन प्रमाणाबाहेर वाढलेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणाबाहेर वजन आणि लठ्ठपणा म्हणजे शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी जी आरोग्यास घातक ठरू शकते” असे नमूद केले आहे. जगाच्या विविध भागात नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासातून असे लक्षात आले आहे की, अति जाडेपणामुळे शरीराच्या विविध अवयवांच्या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणावर संभवतो. अन्ननलिका, जठर, थायरॉईड, स्वादुपिंड, कोलन, गुदाशय, एन्डोमेट्रियम, प्रोस्टेट, पित्ताशय, गर्भाशय, स्तन अशा विविध अवयवांना लठ्ठपणामुळे कर्करोगाची बाधा होऊ शकते.
महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग वाढण्यामागे अति जाडेपणा हे प्रमुख कारण आहे. सर्वसामान्य वजन असलेल्या महिलांपेक्षा लठ्ठ महिलांना स्तनांचा कर्करोग होण्याचा संभव १२% जास्त असतो. सुरुवातीपासूनच शरीराचे वजन योग्य प्रमाणात राखले गेले पाहिजे कारण जसजसे वय वाढते तसतसे वजनावर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसते. महिलांसाठी मेनॉपॉज हे खूप मोठे आव्हान असते. या कालावधीत वजन वाढण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणूनच स्तनांच्या कर्करोगाबद्दल तसेच निरोगी जीवनशैली अवलंबिण्याविषयीची जागरूकता किशोरवयापासूनच निर्माण केली पाहिजे. ज्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो अशा जीवनशैलीशी निगडित विषयांबाबत देखील माहिती दिली गेली पाहिजे. शरीराचे वजन योग्य राखणे, नियमित व्यायाम, धूम्रपान व मद्यपान न करणे, बाळाला स्तनपान करविणे यासारख्या सवयीचे महत्त्व वयात आल्यापासून माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबरीने स्तनांची नियमितपणे तपासणी करत राहिल्याने अतिशय कमी खर्चात, प्रभावीपणे कर्करोगावर यशस्वी मात करता येऊ शकते.
स्तनांचा कर्करोग झालेल्या लठ्ठ महिलांवर उपचार यशस्वी होण्याची संभावना देखील कमी असते. त्यामुळे लठ्ठ रुग्णांवर उपचार करणे हे एक मोठे आव्हान असते. अति जाड व्यक्तीवर उपचारांचे अपेक्षित परिणाम होत आहेत अथवा नाही हे पाहण्यासाठी पुढील तपासण्या करणे आणि उपचार यंत्रणा सर्व क्षमतांनिशी वापरल्या जाणे खूप आवश्यक असते. स्तनांचा कर्करोग असलेल्या अति जाड महिलांना विशेष काळजी घ्यावी लागते. सर्जरी आणि रेडिएशनमुळे त्यांच्या बाबतीत जास्त गुंतागुंत होण्याचा संभव खूप जास्त असतो.
– कन्सल्टन्ट, मेडिकल ऑन्कोलॉजी, हिंदुजा हॉस्पिटल, खार