Cancer Foods: कॅन्सर हा असा आजार आहे की, जो कोणालाही, कधीही होऊ शकतो. कॅन्सर तेव्हा होतो जेव्हा शरीरातील पेशी (cells) अनियंत्रितपणे वाढू लागतात आणि मग त्या निरोगी पेशी नष्ट करतात. साधारणपणे शरीरातील पेशी काही काळानंतर मरतात आणि त्यांच्या जागी नवीन पेशी तयार होतात; पण कॅन्सरमध्ये ही प्रक्रिया बिघडते. कॅन्सरच्या पेशी सतत वाढत राहतात आणि एका ठिकाणी जमून गाठ किंवा ट्यूमर (tumor) तयार करतात. हळूहळू या कॅन्सरच्या पेशी रक्त किंवा लसिका तंत्र (lymphatic system)द्वारे शरीराच्या इतर भागांतही पसरतात.

कॅन्सर शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो, जसे फुप्फुस, पोट, तोंड, स्तन, गर्भाशय, प्रोस्टेट किंवा त्वचेचा कॅन्सर. विकाराची सुरुवात साधारणपणे हळूहळू होते; पण वेळेवर उपचार न केल्यास, तो जीवघेणा ठरू शकतो. चुकीचा आहार, ताण व वाईट जीवनशैली ही त्याची मुख्य कारणं मानली जातात. म्हणूनच आज जगभरात कॅन्सर मृत्यूचं दुसरं मोठं कारण बनलं आहे. भारतात सर्वांत जास्त सहा प्रकारचे कॅन्सर आढळतात- फुप्फुसांचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, स्तन कॅन्सर, गर्भाशयमुखाचा (सर्व्हायकल) कॅन्सर व कोलोरेक्टल कॅन्सर.

अमेरिकेतील फ्लोरिडा येथील मेयो क्लिनिकमधील बोर्ड सर्टिफाइड डॉक्टर डॉ. डॉन मुसल्लम यांनी सांगितले की, काही खाद्यपदार्थ कॅन्सरपासून बचाव करण्यास खूप प्रभावी ठरतात. हे पदार्थ दररोज खाल्ले, तर भविष्यात पोट, तोंड आणि इतर प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी करता येतो. चला तर मग जाणून घेऊ कोणते असे सुपर फूड्स आहेत, जे कॅन्सरपासून आपलं संरक्षण करतात.

फ्रोजन बेरीज खा

ब्ल्यूबेरी, ब्लॅकबेरी व रास्पबेरीसारख्या फ्रोजन बेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स जसे अँथोस्यानिन, एलेजिक अॅसिड व फ्लेवोनॉइड्स आढळतात. हे घटक DNA ला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात. हे संयुग शरीरातील सूज कमी करतात आणि कॅन्सरच्या पेशींची वाढ थांबवतात. संशोधनानुसार, नियमितपणे बेरी खाल्ल्याने अन्ननलिका (इसोफेगस) व आतड्याचा (कोलन) कॅन्सर होण्याचा धोका ३० ते ८०% पर्यंत कमी होतो. त्यामुळे आहारात बेरींचा समावेश करणे कॅन्सरपासून बचाव करण्याचा सोपा मार्ग आहे.

किवी खा

किवीमध्ये व्हिटॅमिन C, आहारातील तंतू (डाएटरी फायबर) व अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे पेशींना DNA खराब होण्यापासून वाचवतात. व्हिटॅमिन C शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि खराब झालेल्या पेशी दुरुस्त करतो. संशोधनानुसार, किवीसारखे व्हिटॅमिन C असलेले फळ खाल्ल्याने फुप्फुस, तोंड व पोटाच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. किवी हे चविष्ट, हलके आणि आरोग्यदायी फळ आहे, जे रोज आहारातून घेतल्याने शरीराला कॅन्सरपासून संरक्षण मिळते.

एडामामे (Edamame) चे सेवन करा

एडामामे म्हणजे सोयाबीनचे सुरुवातीचे रूप, जे कॅन्सरशी लढण्यात खूप प्रभावी मानले जात्ते. यात असलेले आयसोफ्लेवोन्स हार्मोन्सचे संतुलन राखतात आणि स्तन, तसेच प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करतात. त्यात फायबर आणि प्रोटीन दोन्ही असतात, जे पचन सुधारतात आणि वजन नियंत्रणात ठेवतात. एडामामे आहारात समाविष्ट केल्याने शरीराला अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक घटक मिळतात, जे कॅन्सरपासून संरक्षण करण्यास मदत करतात.

बीन्स खा

बीन्स म्हणजे डाळी आणि कडधान्ये फायबर, प्रोटीन व अँटिऑक्सिडंट्सने भरपूर असतात. त्यामुळे पचन तंत्र मजबूत होऊन, शरीरातील विषाक्त पदार्थ (टॉक्सिन्स) बाहेर टाकण्यास मदत होते. संशोधनानुसार, बीन्समध्ये असलेले सॅपोनिन व फिनोलिक हे घटक कॅन्सरच्या पेशींची वाढ थांबवतात. बीन्स खाल्ल्याने शरीरातील सूज कमी होते, मेटाबॉलिझम सुधारते आणि कॅन्सरचा धोका कमी होतो. रोज बीन्स खाणे हृदय आणि यकृत (लिव्हर) दोन्हींच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

क्रूसिफेरस भाज्या खा

ब्रोकोली, फ्लॉवर व ब्रसेल्स स्प्राऊट्ससारख्या भाज्यांमध्ये ग्लुकोसिनोलेट्स भरपूर प्रमाणात असतात. ते शरीरात जाऊन कॅन्सरविरोधी घटक म्हणजे इसोथायोसायनेट्स आणि इंडोल्समध्ये रूपांतरित होतात. हे घटक यकृतातील डिटॉक्स एन्झाइम्स सक्रिय करतात, ज्यामुळे शरीरातील कार्सिनोजेन्स (कॅन्सर निर्माण करणारे पदार्थ) बाहेर टाकले जातात. या भाज्यांतील अँटिऑक्सिडंट्स सूज कमी करतात आणि कॅन्सरचा धोका घटवतात. नियमितपणे या भाज्या खाल्ल्याने फुप्फुस, स्तन व आतड्याच्या (कोलन) कॅन्सरपासून बचाव होतो.