Best Tests to Diagnose Cancer Early: अभिनेत्री प्रिया मराठे हिचं कॅन्सरशी झुंज देत निधन झालं. तिच्या जाण्याने चाहत्यांना आणि कलाविश्वाला मोठा धक्का बसलाय. अजून तरुण वयात, अजून खूप काही देण्यासारखं असताना एका आजारानं आयुष्य हिरावून नेलं. मनाला अस्वस्थ करणारा प्रश्न असा की कॅन्सर टाळता येत नाही का? आधीच ओळखता आलं असतं, तर प्रियाचं आयुष्य वाचलं असतं का? डॉक्टर सांगतात की कॅन्सर अचानक होत नाही, तर शरीरात हळूहळू वाढतो. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे लक्षणं दिसायच्या आधीच काही चाचण्यांमधून कॅन्सर सापडू शकतो आणि जीव वाचवता येऊ शकतो. अनेकदा वेळेवर तपासण्या करून हजारो जीव वाचले आहेत. मग आपण काय करू शकतो? कोणत्या तपासण्या कराव्यात? कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये? ही माहिती जाणून घेणं प्रत्येकासाठी आवश्यक आहे.
कॅन्सर हा आजार ऐकलं तरी अंगावर काटा येतो. अनेकांना वाटतं की हा आजार अचानक होतो, पण खरं काय आहे माहिती आहे का? शरीरात कॅन्सरची बीजं हळूहळू पेरली जातात आणि जेव्हा तो उघड होतो तेव्हा उपचार कठीण होतात. पण जर अगदी सुरुवातीला म्हणजेच लक्षणं दिसण्याआधीच कॅन्सर ओळखता आला, तर जीव वाचण्याची शक्यता कितीतरी पटीनं वाढते. प्रश्न असा की हे ओळखायचं कसं? डॉक्टर सांगतात, केवळ ५ चाचण्या तुमचं आयुष्य वाचवू शकतात. त्या कोणत्या? वाचा पुढे काळजीपूर्वक…
कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी कोणत्या तपासण्या आहेत महत्त्वाच्या?
१. मॅमोग्राफी (Mammography)
स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सर सर्वाधिक आढळतो. अनेक वेळा गाठ हाताला येत नाही, पण मॅमोग्राफी चाचणीत तो सुरुवातीलाच सापडतो. वयाच्या ४० नंतर ही चाचणी वेळेवर केली, तर कॅन्सरचा फैलाव थांबवणं शक्य होतं.
२. पॅप टेस्ट आणि एचपीव्ही टेस्ट (Pap & HPV Test)
गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा महिलांच्या मृत्यूचं एक मोठं कारण आहे. पण पॅप टेस्ट आणि एचपीव्ही टेस्टने सुरुवातीची सेल बदल दिसतात आणि त्वरित उपचार सुरू होतात. त्यामुळे हजारो महिला वाचल्या आहेत.
३. कोलोनोस्कोपी (Colonoscopy)
पोटाच्या आतल्या आत वाढणाऱ्या गाठींना आपण ओळखतही नाही. या गाठीच नंतर कॅन्सर होतात. पण कोलोनोस्कोपी करून त्या आधीच काढून टाकल्या, तर कोलोन कॅन्सरपासून बचाव होऊ शकतो.
४. पीएसए टेस्ट (PSA Test)
पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर हा शांतपणे वाढणारा पण घातक आजार आहे. रक्त तपासणीतील PSA पातळी वाढली तर त्वरित पुढील तपासण्या करता येतात आणि रोग आटोक्यात येतो.
५. स्किन एक्झाम (Skin Exam)
नवीन मोल्स, रंग बदललेली खपली किंवा वाढणारे डाग हे कधी साधे नसतात. हे त्वचेच्या कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. वेळेवर तपासणी केल्यास धोकादायक मेलानोमा टाळता येतो.
लक्षात ठेवा – कॅन्सर रोखणं अशक्य नाही, पण उशीर केला तर वाचणं कठीण आहे. म्हणूनच या ५ तपासण्या तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यासाठी कवच ठरू शकतात.