वॉशिंग्टन : मसाल्याच्या पदार्थापैकी एक असलेल्या वेलचीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. वेलचीच्या स्वादाने स्फूर्ती येते, त्यामुळे अनेक जण सकाळी आळस घालवण्यासाठी वेलचीयुक्त चहा पितात. वेलचीमध्ये लोह, क जीवनसत्त्व असून लाल रक्तपेशी निर्मितीत वेलची  महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र अमेरिकी संशोधकांनी वेलचीवर महत्त्वपूर्ण संशोधन केले असून नियमित वेलचीचे सेवन केल्याने ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर (टीएनबीसी) थोपवण्यास मदत होते.

ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर हा स्तनाच्या कर्करोगाचा एक प्रकार असून त्याच्यावर उपचार करणे खूप कठीण आहे. स्तनाच्या कर्करोग झालेल्यांमध्ये १० ते १५ टक्के आजार ‘टीएनबीसी’ असल्याचे दिसून आले आहे. मात्र वेलची टीएनबीसीच्या पेशींशी लढा देऊ शकते, असे संशोधन फ्लोरिडातील ‘ए अँड एम’ विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले. वेलचीमध्ये काही वैद्यकीय गुणधर्म असून ते या पेशींवर मात करण्यास उपयुक्त आहे, असे डॉ. पेट्रिसिया मेंडोका यांनी सांगितले. संशोधकांच्या चमूचे नेतृत्व मेंडोका करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. मेंडोका यांनी फिलाडेल्फियामध्ये पुरावे सादर केले की वेलचीमध्ये एक नैसर्गिक संयुग आहे जे टीएनबीसीच्या उपचारांमध्ये महत्त्वपूर्ण असल्याचे सिद्ध झाले आहे. वेलचीमध्ये स्तन, प्रोस्टेट आणि कोलोरेक्टल कर्करोगाशी लढण्याचे गुणधर्म असल्याचेही त्यांनी नमूद केले. वेलची ही मूळची भारतीय वनस्पती असून भारतात मसाल्याच्या पदार्थामध्ये वेलचीचा वापर केला जातो. कर्करोगासंबंधी वेलचीच्या उपयुक्त गुणधर्माबाबत प्रथमच संशोधन करण्यात आले आहे.