Alert about Heart health: दिवसभरातल्या कामानंतर भूक लागलेली असताना २० रूपयांचा समोसा समोर निरागसपणे आला तर आनंद होणारच. पण जर तो भविष्यात तुम्हाला लाखो रूपये खर्च करायला लावणारा ठरू शकतो. दिल्लीतील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शैलेश सिंग यांनी अलिकडेच याबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. २० रूपयांच्या समोशाच्या किमतीमागे दडलेल्या मोठ्या किंमतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये डॉ. सिंग यांनी जंक फूड खाण्याच्या अर्थशास्त्राचे विश्लेषण केले आहे. यामध्ये त्यांनी असा अंदाज व्यक्त केला की जर कोणी दररोज एक समोसा खात असेल तर वर्षाला सुमारे ३०० म्हणजेच १५ वर्षात समोशावर ९० हजार रूपये खर्च करतो.
मात्र, समोशाची खरी किंमत ही नाहीच. मोठी किंमत तर नंतर मोजावी लागते. जेव्हा खाण्याच्या चुकीच्या सवयी आरोग्य अधिक गुंतागुंतीचं करतात. तेव्हा तुम्ही चुकीच्या अन्नपदार्थांवर पैसे वाचवत नाही, तर तुम्ही तुमच्या धमन्यांवर ४०० टक्के व्याजदराने कर्ज घेत आहात. या कर्जाची शेवटी ३ लाख रूपयांच्या अँजिओप्लास्टीद्वारे परतफेड होते.
तुमचे शरीर वेळापत्रकाची वाट पाहत नाही
डॉ. सिंग यांचा संदेश संख्येच्या पलीकडचा होता. आपल्यापैकी किती जण आरोग्याला प्राधान्य देण्यास उशीर करतात. स्वत:ला सांगतात की, आपण अमुक अमुक काळानंतर आरोग्याला प्राधान्य देण्याची सुरूवात करू. शरीर आपण वेळापत्रक ठरवण्याची वाट पाहत नाही.
व्यायाम करण्याचा किंवा पोषक आहाराचा पहिला आठवडा कदाचित शिक्षेसारखा वाटू शकतो, मात्र त्यावर ठाम रहा असा सल्ला डॉ. सिंग यांनी दिला. तुम्ही टाळत असलेली अस्वस्थता सात दिवस टिकते, मात्र पश्चात्ताप कायम राहतो असेही ते म्हणाले.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जीवनशैलीत छोटे, सातत्यपूर्ण बदल करणं गरजेचं आहे. ३० मिनिटे चालणे, तळलेले पदार्थ मर्यादित करणे आणि ताणतणावाचे व्यवस्थापन हे हृदयरोगाचा धोका कमी करू शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, हृदयरोग हे भारतात मृत्यूचे प्रमुख कारण राहिले आहे. दरवर्षी चारपैकी एक मृत्यू हृदयरोगामुळे होते.
