कर्करोग हा जीवघेणा आजार असून, वेळेवर उपचार न झाल्यास जीव वाचवणे कठीण होते. हा आजार शरीराच्या कुठल्याही अवयवात, कुठल्याही वयात होऊ शकतो. कर्करोगचे १०० पेक्षा अधिक प्रकार व उपप्रकार आहेत. त्यापैकी प्रमुख म्हणजे स्तनाचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग, फुफ्फुसांचा कर्करोग, कोलोरेक्टल कर्करोग आणि मेलानोमा. याशिवाय अजून एक धोकादायक पण वारंवार दुर्लक्षित राहणारा प्रकार म्हणजे त्वचेचा कर्करोग (Skin Cancer). हा आजार सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता शरीराला आपल्या विळख्यात घेतो.

त्वचेचा कर्करोग हा त्वचेतील पेशींच्या असामान्य व अनियंत्रित वाढीमुळे होतो. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांचा दीर्घकाळ परिणाम हा आहे.

त्वचेच्या पेशींच्या आत जे डीएनए (आपल्या पेशींचे नियंत्रण केंद्र) असते, त्याला सूर्याच्या UV किरणांमुळे किंवा इतर कारणांमुळे इजा होते तेव्हा हा कर्करोग होतो. त्यानंतर या पेशी वेगाने वाढायला लागतात व शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियांमध्ये अडथळा आणतात. त्वचेचा कर्करोग कुठल्याही भागात होऊ शकतो, परंतु जास्त प्रमाणात चेहरा, मान, हात व दंड यांसारख्या सतत सूर्यप्रकाशात राहणाऱ्या भागांमध्ये आढळतो.

त्वचेचा कर्करोग कसा होतो? (How does skin cancer occur?)

त्वचेतील पेशींचे डीएनए जेव्हा UV किरणांमुळे खराब होते, तेव्हा त्या पेशी नियंत्रणाविना वाढायला लागतात आणि हळूहळू कर्करोगमध्ये रूपांतरित होतात.

त्वचेचा कर्करोगचे मुख्य प्रकार (Main types of skin cancer)

  • बेसल सेल कार्सिनोमा (Basal Cell Carcinoma – BCC)
    हा सर्वात सामन्य प्रकार असून तो हळूहळू वाढतो.
  • स्क्वॅमस सेल कार्सिनोमा (Squamous Cell Carcinoma – SCC)
    हा त्वचेच्या वरच्या थरातून सुरू होतो.
  • मेलानोमा (Melanoma)
    हा सर्वात धोकादायक प्रकार आहे. तो त्वचेला रंग देणाऱ्या मेलानोसायट्स पेशींमध्ये होतो.

त्वचेचा कर्करोग होण्याची प्रमुख कारणे (Main causes of skin cancer)

  • सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांचा अतिरेकी संपर्क
  • गोरी त्वचा
  • वारंवार झालेला सनबर्न
  • कर्करोगचा कौटुंबिक इतिहास
  • कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती
  • धोकादायक रसायनांच्या संपर्कात येणे
  • त्वचेवरील जखमा किंवा जुनाट घाव

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार व दिग्गज फलंदाज मायकल क्लार्क यांना देखील त्वचेचा कर्करोग झाला होता. त्यांच्या नाकावर झालेली गाठ शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आली होती. त्वचेचा कर्करोगमध्ये त्वचेवर गाठ किंवा मस्से तयार होतात आणि वेळेनुसार त्यांचा आकार बदलतो.

त्वचेचा कर्करोगची लक्षणे कशी ओळखावीत? (How to recognize the symptoms of skin cancer?)

मायो क्लिनिकच्या माहितीनुसार, त्वचेचा कर्करोगमध्ये प्रामुख्याने तिळांमध्ये बदल दिसतात:

  • तिळाचा आकार असमान होणे (Asymmetry)
  • तिळाच्या कडा असमान किंवा अनियमित असणे (Irregular Borders)
  • रंगात फरक दिसणे (Varied Color)
  • आकार किंवा बनावटीत बदल होणे (Changes in Size or Texture)
  • याशिवाय, नवीन गाठ दिसणे किंवा वाढणे, जी तिळ किंवा फोडासारखी भासते
  • न भरून येणारा किंवा वारंवार होणारी जखम
  • त्वचेवर सतत खाज येणे किंवा रक्त येणे.
  • वेदना होणे

डॉक्टरांकडे कधी जावे?

त्वचेवर कुठलाही असामान्य बदल दिसल्यास किंवा तो शंका निर्माण करत असल्यास, त्वरित डॉक्टर किंवा त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. त्वचेचा कर्करोगची लवकर ओळख झाल्यास उपचार यशस्वी होण्याची शक्यता खूप वाढते.