Early Signs of Stomach Cancer: आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पोटदुखीचा त्रास होतोच. कधी अपचनामुळे, कधी ताणामुळे, तर कधी चुकीचं अन्न खाल्ल्यामुळे. पण, ही पोटदुखी वारंवार होत असेल किंवा दिवसेंदिवस वाढत असेल तर ते केवळ साधे दुखणे नाही, तर पोटाच्या कॅन्सरचा (Stomach Cancer) इशाराही असू शकतो का?
‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल रिसर्च अँड पब्लिक हेल्थ’ (२०२३) मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. या अभ्यासानुसार, पोटाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं अनेकदा सामान्य अपचन, गॅस किंवा अल्सर समजून दुर्लक्षित केली जातात, त्यामुळे निदान उशिरा होते आणि उपचार करण्याचा वेळ निघून जातो.
संशोधकांच्या मते, सततची पोटदुखी, वजन झपाट्याने कमी होणं आणि थोडं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटणं (Early Satiety) ही लक्षणं सर्वात जास्त वेळा दुर्लक्षित केली जातात. या लक्षणांकडे वेळेत लक्ष दिलं तर रुग्णाचं आयुष्य वाचू शकतं, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
कर्करोगामुळे होणारी पोटदुखी कशी वेगळी असते?
साधारण अपचन, गॅस किंवा संक्रमणामुळे होणारी पोटदुखी काही वेळात कमी होते. पण, कर्करोगामुळे होणारी पोटदुखी हळूहळू वाढत जाते आणि सतत टिकून राहते. ही वेदना अनेकदा बोथट स्वरूपाची असते किंवा जळजळीसारखी जाणवते. साधे अँटासिड्स किंवा घरगुती उपाय करूनही फरक पडत नाही. काही रुग्णांना थोडं खाल्लं तरी पोट कडक, ताणलेलं वाटतं.
पोटदुखीसोबत दिसणारी इतर लक्षणं
पोटाच्या कर्करोगामध्ये फक्त दुखणं नसतं; त्यासोबत थकवा, भूक कमी होणं, मळमळ, उलट्या (कधी रक्तासकट), सूज, वजन कमी होणं अशी लक्षणं आढळतात. सुरुवातीला ही लक्षणं गॅस्ट्रायटिस किंवा अल्सर समजून दुर्लक्षित केली जातात, पण ती काही आठवडे टिकली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
निदान उशिरा का होते?
बहुतेक वेळा डॉक्टर सुरुवातीला गॅस, आम्लपित्त किंवा H. pylori संक्रमणाचा संशय घेतात. पण, जर वेदना उपचारांनंतरही कायम राहिली तर एंडोस्कोपी किंवा बायोप्सी करून तपासणी करणं अत्यावश्यक ठरतं. संशोधक सांगतात की याच उशिरामुळे अनेक रुग्णांना कर्करोगाचा अंतिम टप्प्यात शोध लागतो.
कर्करोग वाढताना पोटदुखी का वाढते?
कर्करोग जसजसा वाढतो, तसतसा तो पोटाच्या अस्तरात सूज किंवा ब्लॉकेज निर्माण करतो. वरच्या भागात असलेला ट्युमर गिळताना त्रास देतो, तर खालच्या भागातील ट्युमर उलट्या, फुगवटा आणि वेदना निर्माण करतो; म्हणूनच सुरुवातीला हलकी वाटणारी वेदना पुढे जाऊन असह्य होते.
डॉक्टरांकडे कधी जावं?
जर पोटदुखी दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत असेल, खाण्यानंतर वाढत असेल, थकवा किंवा वजन घटल्यासारखी लक्षणं असतील तर लगेच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. एंडोस्कोपी किंवा इमेजिंग चाचणीद्वारे सुरुवातीच्या टप्प्यात निदान करणं शक्य असतं.
प्रतिबंध कसा करावा?
पोटाचा कर्करोग टाळण्यासाठी फळं, भाज्या आणि धान्ययुक्त आहार घ्या; जास्त मीठ, प्रोसेस्ड अन्न, मद्य आणि धूम्रपान टाळा. तसेच H. pylori संक्रमणाचा वेळेत उपचार करा. संशोधनानुसार, जीवनशैली आणि आहारात बदल केल्याने कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.
सावधान : सर्व पोटदुखी कर्करोग नसतात, पण सतत वाढणारी किंवा न बरी होणारी वेदना दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. वेळेत तपासणी केल्यास जीव वाचवता येऊ शकतो.
(सूचना : ही माहिती केवळ जनजागृतीसाठी आहे. वैद्यकीय सल्ल्यासाठी नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
