आज प्रत्येक गोष्ट टेक्नॉलॉजी सोबत हातमिळवणी करताना दिसत आहे. मग यात फॅशन इंडस्ट्री कशी मागे राहील. कोविड-१९ मुळे झालेल्या लॉकडाउनचा प्रभाव जरी याही इंडस्ट्रीवर पडला असला तरी नवनवीन कल्पनांसह फॅशन इंडस्ट्री पुन्हा उभी राहतेय. आणि वेगाने सर्व स्तरावर पुढेही जात आहे. राष्ट्रीय असो वा आंतरराष्ट्रीय मोठ्या फॅशन ब्रँण्डच्या प्रॉडक्ट्सच्या किंमती हजार-लाखांच्या घरात आहेत. आता या ब्रँण्डसला टेक्नॉलॉजीची जोड मिळाली आहे. त्यामुळे किंमती अगदी करोडोंपर्यंतसुद्धा गेल्या आहेत. नुकतीच गुची या नामांकित फॅशन ब्रँण्डची हॅण्डबँग ३ लाखापेक्षा जास्त किंमतीत विकली गेली. खरंतर गुची या फॅशन ब्रँण्डच्या प्रोडक्ट्सची किंमत नेहमीच जास्त असते. परंतु ३ लाखापेक्षा जास्त किंमतीला विकली गेलेली हॅण्डबँग ही डिजिटल स्वरूपातील आहे!
नक्की कसं आहे डिजिटल कपड्यांचं मार्केट?
लॉकडाउनच्या काळात अनेक डिझायनर, फॅशन ब्रँण्डसने त्यांची कलेक्शन डिजिटल स्वरुपात सादर करायला आणि विकायलाही सुरु केली. हे डिजिटल कपडे जास्त ऑनलाइन गेम्ससाठी वापरले जात आहेत. अनेक गेम्समध्ये आपल्याला कॅरेक्टरचे कपडे, अॅक्सेसरीज बदलता येतात. गेममध्ये आधीपासून उपलब्ध असलेले कपडे किंवा अॅक्सेसरीज सोडता अन्य ऑप्शन्स हवे असतील तर डिजिटल कपडे विकत घेता येतात. हे डिजिटल कपडे बनवण्यासाठी फॅशन ब्रँण्ड ३ डी सॉफ्टवेअरच्या मदतीने ड्रेस डिझाईन करतात. हे डिजिटल ड्रेस ग्राहकांच्या फोटोवर व्यवस्थित लावले जातात. अनेक तासांच्या एडिटनंतर तयार झालेले हे फोटो बघितल्यावर डिजिटल ड्रेस घातलाय की रीअल हे ओळखण कठीण जातं.
डिजिटल कपडे हे भविष्य
क्रोएशियाची ‘ट्रिब्यूट’ नामक कंपनी आहे जी डिजिटल कपडे विकत आहे. आणि याच कारणामुळे चांगलीच ट्रेण्डमध्ये आहे. यांच्या कपड्यांचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होताना बघायला मिळत आहेत. त्यांच्या वेबसाईटवर अनेक कपडे सोल्डआउट सुद्धा झालेत. ट्रिब्यूट कंपनीच्या वेबसाईटवर नमूद केल्यानुसार कंपनीला ठाम विश्वास आहे की डिजिटल फॅशन हे भविष्य म्हणून स्वीकारलं जाईल. फिजिकली कपडे बनवायचे नसल्यामुळे कोणत्याही जेंडरसाठी, बॉडी टाइपसाठी हे कपडे सहज उपलब्ध आहेत.