Safety tips for pregnant women during Diwali: दिवाळी हा सण दिवे, प्रकाश आणि आनंददायी वातावरणासाठी महत्त्वाचा मानला जातो. असं असताना जेव्हा सणासुदीच्या नादात जेव्हा लोक त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू लागतात तेव्हा मात्र सणाच्या आनंदाला गालबोट लागतं. दिवाळीत गोडाचे पदार्थ जास्त खाल्ले जातात. तेव्हा मधुमेहाच्या रूग्णांप्रमाणेच गर्भवती महिलांनीही फटाक्यांच्या या आतषबाजीत स्वत:ला जपणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी आरोग्याशी संबंधित विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. आरोग्याबाबत थोडासा निष्काळजीपणादेखील स्त्रीला किंवा होणाऱ्या बाळाला महागात पडू शकतो. त्यामुळे दिवाळीत गर्भवती महिलांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
संतुलित आहार
दिवाळी हा सण असा आहे ज्यावेळी सर्वात जास्त तळलेले, गोड पदार्थ खाल्ले जातात. असं असताना तळलेल्या पदार्थांचे सेवन मर्यादेत करा. साखर आणि चरबीयुक्त पदार्थांपेक्षा ताजी फळे, भाज्या, ड्रायफ्रुट्स आणि घरी बनवलेल्या कमी साखर असलेल्या गोड पदार्थांचा पर्याय निवडा. शिवाय भरपूर पाणी प्या.
आवाज आणि प्रदूषण टाळा
फटाक्यांचा मोठा आवाज गर्भवती महिला आणि बाळांना ताण देऊ शकतात. फटाक्यांपासून दूर रहा आणि शांत ठिकाणी रहा. धूर आणि प्रदूषण टाळण्यासाठी मास्क घाला आणि शक्यतो घराबाहेर जास्त पडू नका.
झोप आणि विश्रांती
सणासुदीच्या काळात धावपळ होते. अशावेळी धावपळ झाली तरी पुरेशी झोप नक्की घ्या. गर्भवती महिलेच्या आणि तिच्या बाळाच्या आरोग्यासाठी ७ ते ८ तासांची झोप आवश्यक आहे. स्वयंपाकघरात जास्त वेळ उभे राहणे किंवा जास्त वेळ ताठून काम करणे टाळा. कामाच्या दरम्यान ब्रेक घ्या.
कपडे आणि दागिने सुरक्षित ठेवा
पोटावर ताण येणार नाही असे सैल कपडे निवडा. दिवाळीत फार जड दागिने घालणे टाळा कारण त्यामुळे अस्वस्थता येऊ शकते.
दिवे वापरताना काळजी घ्या
दिवे लावताना काळजी घ्या. लांब आणि सैल कपडे आगीचा धोका निर्माण करू शकतात. ठेच लागून किंवा तोल जाऊन पडणार नाही याची काळजी घ्या आणि सुरक्षित अंतर ठेवा.
ताण टाळा
सणाच्या तयारीदरम्यान ताण टाळा. कुटुंबाची मदत घ्या. योग किंवा हळू चालण्यासारख्या सवयींमुळे ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.
डॉक्टरांचा सल्ला
कोणताही नवीन पदार्थ खाण्यापूर्वी किंवा आरोग्याच्या कोणत्याही समस्यांबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्या. नियमित तपासणीचे वेळापत्रक करा आणि औषधे वेळेवर घ्या.