आपला ब्रेकफास्ट, दुपारचं आणि रात्रीचं जेवण कसं असावं? याबाबत आपण बरंच वाचत असतो. कोणकोणत्या पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थांचा जेवणात समावेश करावा? काय टाळावं? किंवा या दोन्ही वेळच्या जेवणासाठीची योग्य वेळ कोणती? अशा अनेक मुद्द्यांवर आपण बोलत असतो. पण आपल्याला मधल्या वेळेत लागणारी भूक आणि त्यावेळी नेमकं काय खावं? याबाबतही जाणून घेणं तितकंच आवश्यक आहे. कारण बहुतांश वेळा आपण ह्याच मधल्या वेळांमध्ये तुलनेनं खूप जास्त पॅकेज्ड, जंक किंवा बेकरी फूड खात असतो. उदा. वेफर्स, बिस्किट्स, पिझ्झा-बर्गर, वडापाव, पाणीपुरी, भेळपुरी आणि असं बरंच काही. मात्र, जर आपण हे टाळलं नाही तर दिवसभर पौष्टिक पदार्थ खाऊन काय उपयोग? याच पार्श्वभूमीवर, न्यूट्रिशनिस्ट मानसी पडेचिया यांनी इन्स्टाग्राम रीलमध्ये याच मधल्या वेळच्या खाण्यासाठी काही पौष्टिक पर्याय शेअर केले आहेत. जाणून घेऊया हे पर्याय नेमके कोणकोणते आहेत.

मधल्या वेळी तुम्ही काय खाऊ शकता? न्यूट्रिशनिस्ट सांगतात…

दिवसातल्या मधल्या वेळच्या खाण्यासाठी सफरचंद आणि पीनट बटर हा एक अत्यंत उत्तम आणि पौष्टिक पर्याय आहे. न्यूट्रिशनिस्ट मानसी पडेचिया यांच्या म्हणण्यानुसार, सफरचंद आणि पीनट बटर हे कॉम्बिनेशन तुमची भूक व्यवस्थित भागवतं. सोबतच बऱ्याच वेळापर्यंत तुमचं पोट भरलेलं राहतं.

यासाठी आणखी एक चांगला पर्याय म्हणजे ड्राय फ्रुट्स. तुम्हाला मधल्या वेळी जर भूक लागली तर ६ बदाम आणि ३ खजूर हे तुमचं पोट भरण्यास योग्य ठरेल. तुम्हाला शुगर क्रेव्हिंग होत असेल तर चॉकलेटऐवजी ड्रायफ्रुट्सचा पर्याय नेहमीच उत्तम आहे. न्यूट्रिशनिस्ट मानसी सांगतात कि, “भाजलेले चणे आणि पोहे हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो.”

“प्रथिनं आणि कार्बोहायड्रेट्सचं कॉम्बिनेशन तुमची भूक व्यवस्थित भागवतं. त्यामुळे, बऱ्याच वेळापर्यंत तुम्हाला भूक देखील लागत नाही. मुख्य म्हणजे हे कॉम्बिनेशन तुमच्या रक्तातील साखर देखील योग्य प्रमाणात ठेवते, वाढू देत नाही”, असंही यावेळी मानसी यांनी सांगितलं आहे.

अनेकदा मधल्या वेळी लागणारी भूक ही अत्यंत तीव्र असते. त्यामुळे, यावेळी जंक फूड न खाता आणि उपाशी न राहता या पौष्टिक पर्यायांचा नक्की विचार करा.

काय टाळाल?

  • मॅगी आणि नूडल्स
  • बिस्किट्स आणि वेफर्स
  • ज्युसेस आणि शुगर लोडेड प्रोटीन बार