Don’t Sleep In Sweaty Clothes: दिवसभराची धावपळ आणि उष्णतेमुळे शरीराला घाम येणे सामान्य आहे. शरीर थंड ठेवण्याचा आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्याचा हा नैसर्गिक मार्ग आहे. परंतु, कधीकधी आळस किंवा निष्काळजीपणामुळे लोक घामाने भिजलेले कपडे घालून झोपतात. ही सवय अत्यंत हानिकारक ठरू शकते, शिवाय याचा आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम करू शकते.

घामाने भिजलेले कपडे घालून का झोपू नये?

बुरशीजन्य संसर्गाचा धोका

घामाने भिजलेले कपडे जास्त काळ ओले राहतात. या ओलाव्यामुळे जीवाणू आणि बुरशी वाढू शकतात. यामुळे त्वचेचे संक्रमण, खाज सुटणे, पुरळ येणे आणि बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

सर्दी, तापाचा धोका

ओले कपडे शरीराचे तापमान कमी करतात. रात्री शरीर विश्रांती घेते आणि त्या काळात जास्त थंडीमुळे रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे सर्दी, घसा खवखवणे आणि कधीकधी तापदेखील येऊ शकतो.

स्नायू अखडणे आणि वेदना

रात्रभर भिजलेल्या कपड्यांमध्ये राहिल्याने स्नायू आणि सांध्यांवर थंडावा निर्माण होतो. यामुळे स्नायू अखडण्यासारख्या वेदना होऊ शकतात. कालांतराने ही सवय संधिवात सारख्या समस्यांनादेखील कारणीभूत ठरू शकते.

झोपेवर परिणाम

ओले कपडे चिकटपणा आणि अस्वस्थतता निर्माण करतात, यामुळे वारंवार जाग येण्याची समस्या निर्माण होते. तसेच कमी झोपेमुळे थकवा, चिडचिड आणि तणाव वाढू शकतो.

त्वचेची नैसर्गिक चमक कमी होणे

घामाने भिजलेल्या कपड्यांमध्ये सतत झोपल्याने त्वचेला ऑक्सिजन मिळत नाही आणि तिचे छिद्र बंद होतात. याचा परिणाम त्वचेच्या नैसर्गिक चमक आणि निरोगी पोतावर होतो. हळूहळू त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू लागते.

अ‍ॅलर्जी आणि वासाच्या समस्या

घामातील क्षार आणि बॅक्टेरिया रात्रभर कपड्यांमध्ये अडकून राहतात. यामुळे दुर्गंधी आणि अ‍ॅलर्जिक त्वचेच्या प्रतिक्रिया होऊ शकतात. संवेदनशील त्वचा असलेले लोक विशेषतः असुरक्षित असू शकतात.

काय उपाय करायला हवा?

  • झोपण्यापूर्वी नेहमी घामाने भिजलेले कपडे बदला.
  • हलके, सैल आणि सुती कपडे घालून झोपा.
  • जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर झोपण्यापूर्वी अंघोळ करा.
  • तसेच बॅक्टेरियाचा धोका कमी करण्यासाठी बेडशीट आणि उशांचे कव्हर स्वच्छ ठेवा.