Tomato Ketchup Side Effects for Kids: टोमॅटो सॉस म्हणजे प्रत्येक घरातली रोजची गोष्ट. मुलांच्या टिफिनपासून फ्रेंच फ्राईजपर्यंत सर्वत्र याचं वर्चस्व आहे. घराघरांत रोज घडणारं दृश्य मुलं भाजी खायला नाखूश झाली की लगेच आई म्हणते, “हे घे पराठ्यासोबत केचप खा.” टिफिनमध्ये सॅंडविच असो वा फ्रेंच फ्राईज त्यात टोमॅटो सॉस नसेल तर जेवण अपूर्ण वाटतं. पण, हा ‘गोड चविष्ट सॉस’ तुमच्या लेकरांना आजाराच्या उंबरठ्यावर नेऊन उभं करतोय, असं बालरोगतज्ज्ञ डॉ. यश बनैत सांगतात.

लहान मुलं आवडीने खात असलेला टोमॅटो सॉसच त्यांच्या आयुष्यासाठी घातक ठरत असेल तर? डॉक्टरांनी दिलेला इशारा ऐकल्यावर पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. डॉ. यश यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत पालकांना थेट इशारा दिला आहे. त्यांच्या मते, बाजारात मिळणाऱ्या टोमॅटो सॉसमध्ये प्रचंड प्रिझर्वेटिव्ह्ज, जास्त मीठ आणि हानिकारक केमिकल्स असतात. याशिवाय त्यात शुगरचं प्रमाणही खूप जास्त असतं, त्यामुळे लहान मुलांना नियमित सॉस देणं म्हणजे त्यांना हळूहळू गंभीर आजारांकडे ढकलणं होय.

काय होऊ शकतं नुकसान?

  • जास्त मिठामुळे लहान वयातच बीपीचा धोका वाढतो.
  • गोडवा आणि रसायनं यामुळे मुलांचं वजन योग्य वाढत नाही.
  • सतत सॉससोबत खाण्याची सवय म्हणजे एक अनहेल्दी कॉम्बिनेशन, ज्यामुळे लाँग टर्ममध्ये शरीराची तब्येत खालावते.

डॉ. यश म्हणतात, “आई-वडील मुलांना जेवण घालण्यासाठी हा सोपा मार्ग वापरतात. पण खरी गोष्ट अशी की, ते आपल्या मुलांच्या आरोग्याशी खेळत आहेत.” मग प्रश्न असा की, पालकांनी मुलांना सॉसपासून कसं वाचवावं आणि घरगुती पर्याय कसे वापरावेत? जाणून घेऊया तज्ज्ञ काय सांगतात…

काय कराल उपाय?

जर मुलांना सॉसशिवाय जेवण घ्यायची सवय नसेल तर हळूहळू ती बदलायला हवी. सुरुवातीला मुलं कमी खातील, हट्ट करतील; पण त्यांची फ्रीक्वेन्सी वाढवून, खेळकर पद्धतीने त्यांना सवय लावली पाहिजे.

मल्टीग्रेन फूड सर्वोत्तम

लहान मुलांना पौष्टिकतेसाठी ज्वारी, बाजरी, गहू यांचं मल्टीग्रेन पीठ देणं अत्यंत फायदेशीर ठरतं; यामुळे त्यांना आवश्यक पोषणमूल्यं मिळतात.

घरगुती शुद्ध सॉस

बाजारातील सॉस टाळून घरीच केचअप बनवणं सोपं आहे. टोमॅटो, बीटरूट, मसाले आणि थोडं व्हिनेगर वापरून कमी रसायनं असलेला घरगुती सॉस तयार करता येतो, जो मुलांसाठी सुरक्षित आहे.

येथे पाहा व्हिडीओ

आता प्रश्न असा आहे की – तुम्ही अजूनही मुलांच्या टिफिनमध्ये बाजारातील सॉस ठेवणार का? की आजच ही सवय बदलून त्यांना आजारांपासून दूर ठेवाल?