scorecardresearch

गरम चहा प्यायल्याने वाढतो कॅन्सरचा धोका? संशोधकांनी केला धक्कादायक खुलासा

अनेक लोकांना गरम चहा, कॉफी तसेच इतर गरम पेय पिण्याची आवड असते. मात्र खूप गरम चहा प्यायल्याने अन्ननालिकेचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

गरम पेय थोडी थंड झाल्यानंतरच त्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायद्याचे असते. (संग्रहित फोटो)

आपल्या देशात चहा प्रेमींची कमी नाही. आपल्याकडे चहा इतका लोकप्रिय आहे की आपल्याला गल्लोगल्ली चहाच्या टपऱ्या पाहायला मिळतील. त्यातल्या त्यात अनेकांना गरमागरम मसाला चहा प्यायला फार आवडतो. मसाला चहामध्ये अनेक प्रकारचे मसाले वापरले जातात, जे आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत. याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पचनशक्तीही चांगली राहते. पण चहा गरम नसेल तर प्यायला अजिबात मजा येत नाही.

तुम्हाला गरमागरम चहा प्यायला आवडतो का? जर या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर वेळीच तुम्हाला ही सवय मोडण्याची गरज आहे. नेहमी गरम चहा प्यायल्याने अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते असं निरिक्षण एका संशोधनामध्ये अभ्यासकांनी नोंदवले आहे.

इराणमधील तेहरान वैद्यकीय विद्यापिठातील अभ्यासकांनी गरम चहा पिण्यासंदर्भात अभ्यास केला आहे. हा अहवाल ‘द इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सर’मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. चहा संदर्भातील हे संशोधन तब्बल १५ वर्षे सुरु होते. २००४ ते २०१७ या कालावधीमध्ये संशोधकांनी ४० ते ७५ वयोगटातील ५० हजार ४५ जणांचा अभ्यास केला. यामधील ३१७ जणांना अन्ननलिकेचा कॅन्सर झाल्याचे अभ्यासानंतर समोर आले.

उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांसाठी चहा पिणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या

संशोधनातील माहितीत काय सांगितले आहे?

दिवसाला ६० डिग्री सेल्सियस किंवा त्याहून अधिक तापमान असलेला, ७०० एमएल किंवा त्याहून अधिक चहा पिणाऱ्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याचा धोका ९० टक्क्यांनी वाढतो. या संशोधनामध्ये ६० डिग्रीहून अधिक तापमान असणाऱ्या चहामुळे कॅन्सरचा धोका वाढत असल्याचे म्हटले असले तरी जागतिक आरोग्य संघटनेनुसार ६५ डिग्रीहून अधिक तापमान असणारे गरम पेय (चहा, कॉफी आणि इतर) प्यायल्यास अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

अनेक लोकांना गरम चहा, कॉफी तसेच इतर गरम पेय पिण्याची आवड असते. मात्र या अहवालानुसार खूप गरम चहा प्यायल्याने अन्ननालिकेचा कॅन्सर होण्याचा धोका वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच गरम पेय थोडी थंड झाल्यानंतरच त्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायद्याचे असते, असे मत या संशोधनाचे नेतृत्व करणारे अमेरिकन कॅन्सर सोसायटीचे सदस्य असणाऱ्या डॉ. फरहाद इस्लामी यांनी नोंदवले आहे.

२०१८ मध्ये फेब्रुवारी महिन्यात ‘अ‍ॅनल्स ऑफ इंटरनल मेडिसीन’मध्ये चीनमधील संशोधकांनी गरम चहाबद्दल केलेल्या संशोधनाचा अहवाल छापून आला होता. या अहवालानुसार गरम चहा प्यायल्याने अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याचा धोका पाच पटींने वाढत असल्याचे संशोधकांनी म्हटले होते. मात्र हे संशोधन तंबाखू सेवन करणाऱ्यांसंदर्भातच होते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Does drinking hot tea increase the risk of cancer researchers made a shocking revelation pvp

ताज्या बातम्या