Symptoms and signs of motor neuron disease : मोटर न्यूरॉन डिसीज (एमएनडी) हा एक गंभीर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, जो मेंदू आणि पाठीच्या कण्यातील मज्जातंतू व पेशींवर विपरीत परिणाम करतो, जे आपल्या स्नायूंना नियंत्रित करतात. हे मोटर न्यूरॉन्स हळूहळू मरतात, स्नायू कमकुवत होतात आणि व्यक्तीला चालणे, बोलणे, गिळणे व श्वास घेणे यांसारखी मूलभूत कामे करण्यास त्रास होऊ लागतो. मोटर न्यूरॉन रोगाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. काही प्रकरणांमध्ये, ते आनुवंशिक असू शकते; तर काहींमध्ये ते तंत्रिका पेशींना झालेल्या नुकसानीमुळे किंवा प्रथिनांच्या असंतुलनामुळे विकसित होते.
मोटर न्यूरॉन रोगाच्या लक्षणांमध्ये बोलण्यात किंवा आवाजात बदल, गिळण्यास त्रास होणे, स्नायूंचे आकुंचन किंवा मुरगळणे, हात आणि पायांमध्ये कमकुवतपणा, चालण्यात किंवा संतुलन राखण्यात अडचण आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांचा समावेश आहे.
मोटर न्यूरॉन रोगाचे अनेक प्रकार आहेत, जसे की ALS (अम्योट्रोफिक लॅटरल स्क्लेरोसिस), सर्वांत सामान्य प्रकार, जो मेंदू आणि मणक्याला प्रभावित करतो.
पीएमए (प्रोग्रेसिव्ह मस्क्युलर अॅट्रोफी) ही एक अशी स्थिती आहे, जी प्रामुख्याने स्नायूंच्या कमकुवतपणाशी संबंधित असते.
पीएलएस (प्रायमरी लॅटरल स्क्लेरोसिस) ही स्थिती शरीराच्या हालचालींवर परिणाम करते.
पीबीपी (प्रोग्रेसिव्ह बल्बर पाल्सी) स्थितीत जीभ, घसा व बोलण्यावर परिणाम होतो.
मोटर न्यूरॉन रोगाचे निदान कसे केले जाईल?
आता जिभेचा एमआरआय काढून मोटर न्यूरॉन रोगाचे निदान करता येते. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील संशोधकांनी एक नवीन शोध लावला आहे की, जिभेचे एमआरआय स्कॅनिंग मोटर न्यूरॉनचा रोग लवकर शोधू शकते आणि त्याचे निरीक्षण करू शकते.
लक्षणं
अभ्यासात असे आढळून आले की, एमएनडी असलेल्या ज्या लोकांना बोलण्यास किंवा गिळण्यास त्रास होतो, त्यांच्या जिभेचे स्नायू सामान्य लोकांपेक्षा लहान असतात, जे या आजाराचे प्रारंभिक लक्षण असू शकते. इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग अँड कॉम्प्युटर सायन्स स्कूलचे डॉ. थॉमस शॉ यांनी स्पष्ट केले की, जिभेमध्ये आठ परस्पर जोडलेले स्नायू असतात. जे खाण्यास, गिळण्यास व बोलण्यास मदत करतात. परंतु, मोटर न्यूरॉन रोग असलेल्या रुग्णांमध्ये, हे स्नायू हळूहळू कमकुवत होतात आणि शोषतात. या बदलांचे लवकर निदान झाल्यास डॉक्टरांना लवकर उपचार सुरू करता येतात.
संशोधकांनी २०० हून अधिक जुन्या एमआरआय स्कॅन अहवालांचे विश्लेषण केले, ज्यात एमएनडी रुग्णांचे अहवाल समाविष्ट होते. जिभेच्या स्नायूंचा आकार आणि आकारमान अचूकपणे मोजण्यात आले आणि निकालांवरून असे दिसून आले की, MND असलेल्या लोकांच्या आणि निरोगी लोकांच्या जिभेच्या स्नायूंमध्ये लक्षणीय फरक होता. कॉम्प्युटर्स इन बायोलॉजी अँड मेडिसिन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असेही आढळून आले आहे की, ज्या लोकांची लक्षणे जीभ, घसा किंवा तोंडात सुरू झाली, त्यांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. ज्या लोकांची लक्षणे हात-पायांपासून सुरू होतात, त्यांच्यापेक्षा त्यांचे आयुर्मान कमी असते.
