निरोगी जीवनशैलीसाठी आपला आहार सकस आणि पौष्टिक असणे गरजेचे असते. त्यासाठी व्यायामासोबतच वेगवेगळी फळं, हिरव्या पालेभाज्या, भाज्या, डाळी, अंडी आणि सुकामेवा यांसारखे घटक आपल्या रोजच्या आहारात असावेत, असा सल्ला प्रत्येक जण देत असतो. सकाळी उठल्यावर म्हणा किंवा यावेळी भूक लागल्यावर फुटकळ पदार्थ खाणे टाळण्यासाठी बऱ्याचजणांना बदाम, बेदाणे यांसारखा सुकामेवा खाण्याची सवय असते. असे केल्याने शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक मिळून तुमचे एकंदरीत आरोग्य संतुलित राहण्यास मदत होते.
असे असले तरीही प्रत्येक गोष्टींच्या फायद्यांसह त्यांचे तोटेदेखील असतातच. आपल्याला दररोज सुकामेवा खाण्याचे फायदे तर माहीत असतात, मात्र त्यांचे काही प्रमाणात होणाऱ्या नुकसानाबद्दल आपण अजाण असतो. चला तर मग, दररोज सुकामेवा खाण्याच्या फायद्यांबरोबर, ते खाताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे पाहू.
हेही वाचा : नुसती कॉफी पिऊ नका, तर डोळ्याखालीसुद्धा लावा; काळी वर्तुळं घालवण्याच्या टिप्स पहा…
सुक्यामेव्याचे फायदे
१. पोषक घटकांचे अधिक प्रमाण
काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड यांसारख्या सुक्यामेव्यामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे, प्रथिने, जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यासोबतच दिवसभर काम करण्याची शक्ती देण्याचेही काम हे करत असतात. त्यामुळे अवेळी भूक लागल्यास यांचे सेवन केल्याने फायदा होतो, अशी माहिती न्यूज १८ डॉट कॉमच्या एका लेखावरून समजते.
२. हृदयाचे आरोग्य
बदाम, अक्रोड यांसारख्या सुक्यामेव्यात ओमेगा-३ सारखे शरीराला उपयुक्त असणारे फॅट्स असतात. ज्याच्यामुळे आपल्या कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहून त्याचा फायदा हृदयासाठी होऊ शकतो.
३. वजनावर नियंत्रण
पौष्टिक आणि शरीराला पोषक असणाऱ्या या सुक्यामेव्याचा उपयोग करून आपले वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. योग्य प्रमाणात यांचे सेवन केल्याने पोट भरल्यासारखे वाटून, अनावश्यक पदार्थ खाणे टाळता येते.
४. पचनक्रिया
अपचन किंवा पोट साफ न होण्याच्या समस्यांवरही सुकामेवा फायदेशीर ठरत असतात. यामध्ये असणारे फायबर आपल्या पोटाचे आरोग्य आणि पचन करण्याच्या क्रियेला सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात.
५. कुठेही नेण्यास सोयीचे
इतर पदार्थांप्रमाणे सुकामेवा लगेच खराब होत नाही, त्यामुळे हा पदार्थ तुम्ही कधीही आणि कुठेही घेऊन जाऊ शकता.
हेही वाचा : रिकाम्यापोटी आल्याचा रस पिण्याने पोटासाठी फायदा होतो का? काय आहेत टिप्स जाणून घ्या…
सुकामेवा खाताना कोणती काळजी घ्यावी?
१. कॅलरीजचे प्रमाण अधिक
वजन कमी करण्यासाठी आपण हा पदार्थ जरी खात असलो, तरीही सुकामेव्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुम्ही जर याचे गरजेपेक्षा जास्त सेवन केलेत तर परिणाम उलट होऊन, वजन कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती न्यूज १८ डॉट कॉमच्या एका लेखावरून समजते.
२. प्रिझर्व्हेटिव्हस आणि अतिरिक्त साखर
बाजारात मिळणाऱ्या काही सुकामेव्यांना अधिककाळ टिकवून ठेवण्यासाठी अनेकदा प्रिझर्व्हेटिव्हसचा उपयोग केला जातो किंवा काही काही वेळेस अतिरिक्त साखर [ॲडेड शुगर] वापरली जाते, ज्याचा परिणाम आपल्या आहारावर आणि आरोग्यावर होऊ शकतो.
३. दातांवर परिणाम
खजूर, वाळवलेले अंजीर, बेदाणे, मनुका यांसारखे पदार्थ खाण्यासाठी चिकट आणि गोड असतात. असे घटक खाल्ल्यानंतर त्यांचे बारीक कण आपल्या दातांमध्ये अडकून दात किडण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणताही सुकामेवा किंवा कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर खळखळून चूळ भरून आपल्या तोंडाची व दातांची काळजी घ्यावी.
४. सल्फाईट्स
सुकामेवा जास्तकाळ चांगला राहण्यासाठी त्यामध्ये घातल्या जाणाऱ्या प्रिझर्व्हेटिव्हसमध्ये सल्फाइट नावाचा घटक असतो, ज्याचा त्रास काहींना होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाजारातून सुकामेवा घेताना त्याच्या खोक्यावरील माहिती वाचून मगच ते विकत घ्यावे. शक्यतो सल्फेट-मुक्त पदार्थ/सुकामेवा घेण्याचा प्रयत्न करा.
५. प्रत्येकाला सुकामेवा फायदेशीर नसतो
प्रत्येक सुकामेवा हा सगळ्यांच्या पोटाला, आरोग्याला चालेलच असे नाही. काहींना जर आरोग्याच्या काही ठराविक तक्रारी, समस्या असतील तर त्यांना प्रत्येक सुक्यामेव्यात असणाऱ्या घटकांचा विचार करून किंवा आहारतज्ज्ञांशी बोलून मगच त्यांचे सेवन करणे फायद्याचे ठरते.
[टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित असून कृपया यास वैद्यकीय सल्ला समजू नये.]