Eating habits after workout: आपण किती व्यायाम करतो आणि कोणत्या प्रकारचा आहार घेतो यावर आपले एकूण आरोग्य अवलंबून असते. सकाळी उठल्यानंतर अनेक जण मॉर्निंग वॉकला जातात किंवा जिमला जातात. एवढी मेहनत करून केवळ चुकीच्या पदार्थांच्या खाण्या-पिण्यामुळे जर व्यायाम व्यर्थ ठरत असेल तर काय फायदा. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आयुषी यांनी व्यायामानंतर काय खाणे टाळावे हे सांगितले आहे.
तळलेले अन्न
तळलेल्या पदार्थांमध्ये खराब चरबी वाढवणारे घटक जास्त असतात. त्यामुळे पोषक तत्वांचे शोषण कमी होऊ शकते. डिप फ्राय केलेले पदार्थ टाळणे आणि त्याऐवजी ग्रील्ड चिकन किंवा मासे खाण्याचा पर्याय योग्य आहे. व्यायामानंतरच्या आहारात तुम्ही वनस्पती आधारित प्रथिनांचाही समावेश करू शकता.
मसालेदार पदार्थ
जास्त मसालेदार अन्न आपल्या जिभेच्या चवीला समाधान देऊ शकते. मात्र ते अजिबात योग्य नाही. व्यायामानंतर ते खाल्ल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे छातीत जळजळ देखील होऊ शकते. मसाले जास्त शिजवल्याने पोषकतत्वेदेखीलनष्ट होऊ शकतात. मसालेविरहित पदार्थ खाणे कधीही योग्य.
गोड पदार्थ
गोड पदार्थ खरं तर जिभेला खूपच आकर्षित करतात. यामध्ये कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम आणि हलवा यासारखे पदार्थ जास्त आकर्षित करतात. असं असताना व्यायामानंतर लगेचच ते खाल्ल्याने तुमचे सर्व कष्ट आणि व्यायामातून बर्न झालेल्या कॅलरीज वाया जाऊ शकतात.
अल्कोहोल
अल्कोहोल नेहमीच आरोग्यासाठी धोकादायक राहिला आहे. मात्र, व्यायामानंतर त्याचे सेवन केल्याने डिहायड्रेशन होऊ शकते आणि स्नायूंच्या दुरूस्तीत अडथळा येऊ शकतो. ते ह्रदयासाठी देखील हानीकारक आहे. पाणी, हर्बल टी आणि इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये पिणे चांगले ठरते.
कच्च्या भाज्या
कच्च्या भाज्यांमध्ये भरपूर फायबर असते आणि व्यायामानंतर त्या खाल्ल्याने पोटफुगी होऊ शकते. शिजवलेल्या भाज्या पचायला सोप्या असतात. वाफवलेल्या भाज्यांचा आहारात समावेश करणे योग्य ठरते.