अनेकदा आपण भांडी घासायला बसतो तेव्हा समजते की, भांड्याचा साबण किंवा लिक्विड संपलेला आहे. यात काहीवेळा घरात जास्तीचा साबणही नसतो, तेव्हा भांडी स्वच्छ कशी करायची असा प्रश्न पडतो. असे तुमच्याही बाबतीत होत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला भांडी स्वच्छ करण्यासाठी अशा काही टिप्स सांगणार आहोत. ज्याचा वापर करुन तुम्ही साबण वापरणेही विसरुन जाल. साबणाशिवाय घरातील काही गोष्टींचा वापर करुन तुम्ही अस्वच्छ भांडी धुवू शकता, ती कशी ते जाणून घेऊ…
साबणाऐवजी अशापद्धतीने स्वच्छ करा भांडी
१) राखेने करा स्वच्छ
लाकूड जाळल्यानंतर उरलेल्या राखेपासून तुम्ही भांडी स्वच्छ करु शकता. पूर्वीच्या काळी राखेचा वापर करुन भांडी स्वच्छ केली जायची. यामुळे भांडी घासण्यासाठी तुम्ही डिशवॉश बारऐवजी राखेचा वापर करु शकता. हा उपाय करण्यासाठी राख गाळून त्यात थोडी डिटर्जंट पावडर मिक्स करुन तुम्ही भांडी स्वच्छ करु शकता.
२) व्हिनेगर वापरा
अस्वच्छ भांडी धुण्यासाठी व्हिनेगरचा वापर करु शकता. हा उपाय करुन पाहिल्यास घाणेरड्या भांड्यांचा वास सहज दूर होऊ शकतो. यासाठी १ कप पाण्यात ४ ते ५ व्हिनेगरचे चमचे चांगले मिसळून घ्या, यानंतर अस्वच्छ भांड्यावर घासून घ्या आणि काहीवेळ तसेच राहू द्या, यानंतर स्पंजच्या मदतीने भांडी स्वच्छ करा.
३) सोडा आणि लिंबू
सोडा आणि लेमन जेल दोन्हीमध्ये डाग दूर करण्यासोबतच दुर्गंधी दूर करणारे गुणधर्म आहेत. हा उपाय करण्यासाठी एका भांड्यात ३ चमचे बेकिंग सोडा घ्या, त्यात लिंबू पिळून त्याची पेस्ट तयार करा, आता ही पेस्ट स्पंजवर लावून घाण भांडी स्वच्छ करा.