डॉ. संजीवनी राजवाडे
अनेक दिवस लांबलेला हिवाळा अखेर सुरू झाला आहे. थंडी गुलाबी असो की बोचरी त्याचा मनमुराद आनंद उपभोगायचा असेल तर ऋतूनुसार दिनचर्या पाळणे गरजेचे असते. थंड व कोरडी हवा शरीरावर विशिष्ट परिणाम घडवून आणतात. या ऋतूचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपल्या आहार-विहारात थोडे बदल करणे महत्त्वाचे आहे.
हिवाळ्यातील गारवा शरीरातील तापमानात तर बदल घडवितो, पण त्याबरोबरच शरीरातील रूक्षता, कोरडेपणा वाढतो, तहान लागण्याचे प्रमाण कमी होते. मांसपेशी आणि सांध्याची शिथिलता कमी होते, नसांचे तडतडणे वाढते, नाक-कान-घसा आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. त्वचा-डोळे आणि केसांचे आरोग्य बिघडते. या सगळ्या तक्रारी टाळण्याकरिता वा त्याच तीव्रता कमी करण्याकरिता विशिष्ट काळजी घेतल्यास हिवाळा उबदार होऊ शकतो.
आहारातील बदल
स्पर्शाने थंड असणारे (बर्फ, आईस्क्रीम) तसेच गुणाने थंड असणारे (ज्वारी, चंदन इत्यादी) पदार्थ शक्यतो टाळावेत. उष्णधर्मी सुंठ, मिरे, आले, लसूण, मेथी, बाजरी, लवंग इत्यादी पदार्थाचा आहारात विशेषत्वाने समावेश करावा. पदार्थ खाताना शक्यतो गरमगरम खावेत. शरीरातील पाण्याची पातळी योग्य राहण्याकरिता निरनिराळे द्रव पदार्थ घ्यावेत. यामध्ये सूप, सार, कडधान्याचे कढण, ताकाची कढी, पिठाची हाव असे पदार्थ गरमगरम आलटून पालटून प्यावे. चिमटभूर सुंठ आणि हळद घालून गरम पाणी प्यावे. थंडीमध्ये त्वचेमध्ये पुरेसा ओलावा राखण्यासाठी पाण्याची पातळी योग्य राखणे गरजेचे आहे.
शरीरात निर्माण होणारी रूक्षता कमी व्हावी म्हणून अंतगर्त स्नेहनाची गरज असते. या ऋतूत साजूक तुपाचा वापर वाढवावा. पचनशक्ती उत्तम असल्याने हिवाळ्यात तुपामध्ये तयार केलेले जड पदार्थ पचण्यास सोपे असते. गोड पदार्थामध्ये आवर्जून सुंठ, वेलची, जायफळ, लवंग पूड घालावी. मधुमेहींनी तुपावर परतलेला कांदा पदार्थामध्ये वापरावा. जेवणापूर्वी १ छोटा चमचाभर शुद्ध खोबरेल तेल पोटात घेणे उत्तम.
मांसपेशीची शिथिलता आणि शारीरिक हालचालींची सुकरता यावी अशा दृष्टीने पुढील पदार्थाची चटणी करून आहारात घ्यावी. सुके खोबेर, तीळ आणि शेंगदाणे समप्रमाणात घ्यावेत. तीनपट कढीपत्ता घ्यावा. चवीनुसार लसूण, जिरे, तिखट मीठ घालून पदार्थ भाजून चटणी करावी. ही चटणी कोरडी असून हवाबंद डब्यात १५ ते २० दिवस सहज टिकते.
मेथीच्या दाण्यांना मोड आणून ही मेथी डाळी, उसळी, सॅलेड इत्यादी पदार्थामध्ये रोज वापरावी. यामुळे पदार्थाची चव कडवट होत नाही. तसेच ही मोड आलेली मेथी फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात आठवडाभर साठवता येते. यामध्ये सूजनाशक आणि जंतूविरोधी तत्त्वे असतात. तसेच बी जीवनसत्त्व मोठय़ा प्रमाणावर असते. त्यामुळे छोटी दुखणी, जंतूसंसर्ग यापासून दूर राहता येते. जड अन्न पचविण्याची शक्तीही यांमध्ये आहे. हिवाळ्यात आवळा अतिशय उत्तम आणि मोठय़ा प्रमाणावर मिळतो. अॅन्टीऑक्सिडेंट आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी याचा नियमित वापर करावा. आवळ्याच्या कोणत्याही पदार्थाचा आहारात समावेश करता येईल.
रंगीत भाज्या, फळे त्वचेसाठी हितकारक आहेत. त्वचा, स्निग्ध, ओलसर आणि चमकदार राहावी अशा भाज्या फळे मुबलक प्रमाणात वापरावीत. डोळ्यांचा कोरडेपणाही कमी होण्यास यांमुळे मदत होते. आले, गवती चहा, लवंग-दालचिनीचा काढा गूळ घालून घ्यावा. नाक-कान-घशाला सर्दीमुळे होणारा त्रास यामुळे कमी होण्यास मदत होते.
ही काळजी घेणे आवश्यक
रात्री झोपताना नाकामध्ये तीळ किंवा खोबरेल तेलाचे दोन ते तीन थेंब सोडावेत. संपूर्ण शरीराला खोबरेल तेलाने अभ्यंग करावे. आंघोळीपूर्वी पाच मिनिटे हलक्या हाताने तेल लावावे. चोळून मालीश करणे अपेक्षित नाही. आठवडय़ातून दोनदा तरी केसांना कोमट तीळ किंवा एरंडेल तेलाने मालीश करणे गरजेचे आहे. केस आणि डोक्याची त्वचा यांमुळे मुलायम राहते आणि कोरडेपणामुळे निर्माण होणारा कोंडा कमी होण्यास फायदा होतो. डोक्याला येणारी खाजही कमी होते. ओवा आणि भीमसेनी कापूर दोनास एक प्रमाणात रुमालात घालून लहानशी पुरचुंडी करून नेहमी जवळ ठेवावे. प्रवास करणाऱ्यांनी प्रवासानंतर याचा वास दीर्घ श्वसनाने आत ओढून घ्यावा. इतरांनी शिंका, सर्दी झाल्यास याचा प्रयोग वारंवार करावा. ओवा आणि कापूर रोज बदलावे.
हिवाळ्यात भूक वाढलेली असते. पचनशक्ती चांगली असते. त्यामुळे आपली व्यायामाची क्षमताही वाढते. तेव्हा शरीर तंदुरुस्तीच्या दृष्टीने व्यायामही वाढविणे अपेक्षित आहे. सकाळी चालायला किंवा फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठांनी मात्र थोडे ऊन आल्यावर चालायला जाणे अधिक चांगले. व्यायामाची गती आणि व्यायामाचा कालावधी वाढविणे या ऋतूत अधिक फायदेशीर ठरते
(dr.sanjeevani@gmail.com)