धावपळीच्या जगात स्वयंपाक करण्याऐवजी एका क्लिकवर ऑनलाईन अन्न मागवणे आता सोपे झाले आहे. पण, ही बदललेली सवय केवळ सोयीची नाही तर एक धोकादायक ट्रेंड बनते आहे, जी आपल्या आरोग्यावर नकळत परिणाम करते. खूप थकल्यामुळे जेवण बनवण्याचा कंटाळा आला म्हणून घरी पिझ्झा, बर्गर किंवा फ्राईज मागवून खाणे ही केवळ सवय नाही तर ती एक प्रकारचे व्यसन आहे.

त्यामुळे हा ट्रेंड विशेषतः तरुणांमध्ये इतका वाढला आहे की, साधा घरगुती डाळ-भात, भाज्यांपेक्षा तेलकट आणि मसालेदार पदार्थांना प्राधान्य दिले जाते. पण, या व्यसनाचे परिणाम लहान वयातच शरीरावर दिसू लागले आहेत त्यांचे काय? थकवा, वजन वाढणे, हार्मोनल बिघडणे आणि मानसिक ताण हे सर्व या अन्नाचे दुष्परिणाम दिसून येत आहेत.

व्यसन की सवय?

मानेसर येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. अनु मॅथ्यू यांच्या मते फास्ट फूडचे व्यसन हे बहुतेक वर्तणुकीशी संबंधित असते. परंतु, मेंदूवर त्याचे परिणाम निकोटीन किंवा औषधांसारखेच असतात. साखर, तेल आणि मीठ जास्त असलेले अन्न मेंदूतील डोपामाइन रिवॉर्ड सिस्टमला उत्तेजित करते, ज्यामुळे तेच अन्न पुन्हा पुन्हा खाण्याची तीव्र इच्छा निर्माण होते.

सोयीनुसार बदलते भारतातील अन्न

२४ तास चालणाऱ्या फूड डिलिव्हरी ॲप्समुळे जेवण आता फक्त खास दिवसांसाठी राहिलेले नाही. ताण, अभ्यासाचा दबाव आणि स्वयंपाक करण्याची सवय नसल्यामुळे तरुणांची पटकन मिळणार्‍या जंक फूडकडे ओढ वाढते. त्यातच सेलिब्रिटींच्या जाहिराती, कॉम्बो ऑफर्स आणि “एक खरेदी करा, एक फ्री” अशा स्कीम्समुळे घरचे जेवण कमी आकर्षक वाटू लागले आहे. एम्स (AIIMS) आणि आयसीएमआरच्या (ICMR) संशोधनानुसार, या मार्केटिंगमुळेच तरुणांची खाण्याची पद्धत बदलत आहे.

दुष्परिणाम

१. चयापचय : आठवड्यातून तीन वेळापेक्षा जास्त वेळा बाहेरचं खाणाऱ्यांमध्ये (फास्ट फूड) लठ्ठपणा, मधुमेह, फॅटी लिव्हर आणि हृदयरोगाचा धोका अनेक पटींनी वाढतो.

२. पचन बिघाड आणि आतड्यांचे आरोग्य : जास्त तेलकट आणि कमी तंतुमय (फायबर) पदार्थ खाल्ल्याने पोट फुगणे, ॲसिडिटी आणि पोटातील जंतूंचे संतुलन बिघडते, त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्तीही कमी पडते.

३. हार्मोनल बिघाड : सतत गोड किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात इन्सुलिन नीट काम करत नाही, त्यामुळे पीसीओएस आणि लवकर मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

४. मानसिक आरोग्य : संशोधनातून असे दिसून आले आहे की, तेलकट आणि गोड पदार्थ नियमितपणे खाल्ल्याने मूड स्विंग, चिडचिडेपणा आणि नैराश्य वाढते.

उपाय काय?

आहार एकदम बदलण्याची गरज नाही. फक्त आठवड्यातून एकदा तरी जंक फूड कमी करा, शक्य असेल तेव्हा घरचेच काहीतरी खा आणि रात्री उशिरा ऑर्डर करण्याची सवय कमी करा, इतकं केलंत तरी मोठा फरक दिसेल. लक्षात ठेवा, चविष्ट असलेले सगळेच पदार्थ आरोग्यदायी नसतात… पण, आरोग्यदायी पदार्थही चविष्ट बनवता येतात!