Fatty Liver Symptoms in Women: आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे लोकांचे जीवन पूर्णपणे बदलले आहे. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि अस्वस्थ जीवनशैली यांमुळे लोकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. चुकीचा आहार आणि व्यायामाची कमतरता यांमुळे फॅटी लिव्हर ही समस्या दिसून येत आहे.
लिव्हरमध्ये जास्त चरबी साचल्यास ही समस्या निर्माण होते. त्याला हेपॅटिक स्टिओटोसिस, असेही म्हणतात. फॅटी लिव्हर ही महिलांसाठी आरोग्याची गंभीर समस्या आहे. जीवनशैली, आहार व हार्मोनल बदल यांमुळे ही समस्या महिलांमध्ये सामान्य होत आहे. लिव्हरशी संबंधित ही समस्या असताना महिलांमध्ये काही खास लक्षणे दिसतात, जी वेळेत ओळखल्यास आणि काळजी घेतल्यास ही समस्या टाळता येऊ शकते.
आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, खाण्यापिण्याच्याच्या चुकीच्या सवयीं मुळे लिव्हरच्या आजूबाजूला चरबी साचू लागते. त्यालाच नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) म्हणतात. जर ही समस्या वेळीच हाताळली नाही, तर त्यामुळे लिव्हर सिरोसिसचा त्रासदेखील होऊ शकतो. विशेषतः रजोनिवृत्तीनंतर महिलांना किंवा PCOS किंवा इन्सुलिन रेसिस्टन्ससारख्या समस्यांमुळे महिलांना हा आजार होण्याचा धोका जास्त असतो. सुरुवातीला लक्षणे फार स्पष्ट नसतात; पण लक्षणे ओळखणे आणि कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ही समस्या गंभीर स्वरूप धारण करण्याआधी त्यावर नियंत्रण मिळवून, ती बरी करता येतो. पुरुषांमध्ये फॅटी लिव्हर होण्याची शक्यता महिलांच्या तुलनेत जास्त असते; पण रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये हा धोका खूप वाढतो.
जपानमध्ये २०२१ मध्ये जवळपास १७,००० लोकांवर एक वर्षभर अभ्यास केला गेला. त्यात संशोधकांनी आढळले की, फॅटी लिव्हर ही समस्या पुरुषांमध्ये महिलांच्या तुलनेत जास्त सामान्य आहे. मात्र, ५० ते ५९ वर्ष वयोगटातील महिलांमध्ये हा धोका इतर वयोगटांच्या महिलांच्या तुलनेत जास्त आहे. संशोधकांचा असा विश्वास आहे की, फॅटी लिव्हरच्या विकासात सेक्स हार्मोनची भूमिका असते. विशेषतः टेस्टोस्टेरोनचे प्रमाण जास्त असेल, की लिव्हरचा विकार होण्याचा धोका वाढतो. पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) असलेल्या महिलांमध्ये MASLD होण्याचा धोकादेखील वाढतो. कारण- त्यामध्ये अंशतः एस्ट्रोजनचे स्तर कमी असतात. राष्ट्रीय आरोग्य संस्था (NIH) नुसार, ७५% जास्त वजन असलेल्या लोकांना आणि ९०% पेक्षा जास्त गंभीर जाडसर असलेल्या लोकांना MASLD होण्याची शक्यता असते.
पोटात अस्वस्थता किंवा जडपणा
फॅटी लिव्हर असलेल्या अनेक महिलांना पोटाच्या उजव्या वरच्या भागात जिथे यकृत असते, तिथे हलकी वेदना किंवा जडपणा जाणवतो. ही अस्वस्थता कधी येते, कधी जाते आणि बऱ्याचदा लोक त्याला पोट फुगणे किंवा अपचनाचा त्रास, असे समजतात. असे वारंवार होऊ लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सतत थकवा येणे
सातत्याने थकवा जाणवणे हे एक सामान्य लक्षण आहे. फॅटी लिव्हर ऊर्जा तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे महिलांना पुरेशी विश्रांती घेतली तरीही थकवा किंवा सुस्ती जाणवू शकते.
लठ्ठपणा किंवा जास्त वजन असणे
शरीराचे वजन, विशेषतः पोटाची चरबी, फॅटी लिव्हर होण्याच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. पोटाभोवती जमा झालेली चरबी लिव्हरमध्ये साचण्याचा थेट संबंध असतो.
टाईप २ मधुमेह
डायबेटीज किंवा प्री-डायबेटीज असलेल्या महिलांमध्ये बहुतेकदा इन्सुलिनच्या कमतरतेमुळे स्थूल लिव्हरची समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत लिव्हरच्या पेशींमध्ये चरबी सहज साचते.
हाय कोलेस्ट्रॉल
अनेक महिलांमध्ये न सांगता कोलेस्ट्रॉलचे स्तर वाढतो, ज्यामुळे काळानुसार लिव्हरचे आरोग्य खराब होते.
हार्मोनल बदल
रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोनमध्ये बदल किंवा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS)सारख्या परिस्थितीमुळे इन्सुलिन प्रतिरोध वाढतो आणि शरीरात चरबी वाढते, ज्यामुळे महिलांमध्ये यकृत स्थूल होण्याचा त्रास होण्याचा धोका वाढतो.