Side Effects of Fenugreek Water: मेथीचे दाणे हे केवळ अन्नाची चव वाढवण्यासाठीच नाही, तर औषध म्हणूनही काम करतात. नैसर्गिक उपचारांमध्ये मेथीचा वापर अनेकदा पोटफुगी कमी करण्यासाठी, चयापचय वाढवण्यासाठी, रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी आणि जळजळ दूर करण्यासाठी केला जातो. हे सर्व फायदे मिळवण्यासाठी मेथीचे दाणे भिजवल्यानंतर त्याचे पाणीदेखील पिण्याचा सल्ला दिला जातो. बरेच लोक घरगुती उपाय म्हणून मेथीचे पाणी घेतात. मात्र, हे मेथीचे पाणी प्रत्येकासाठी फायदेशीर ठरेलच असे नाही. मेथीचे पाणी पिणे काही वैद्यकीय परिस्थिती आणि समस्यांमध्ये हानिकारक असू शकते. शिवाय त्याचे काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात. तेव्हा नेमकं कोणत्या समस्या असलेल्यांनी मेथीचे पाणी टाळावे याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

रक्तातील साखर कमी असलेले लोक

मेथीचा वापर रक्तातील साखर कमी करण्यासाठी केला जातो. हाय ब्लड प्रेशर असलेल्या लोकांना इन्सुलिन संवेदनशीलता कमी करण्यासाठी आणि कार्बोहायड्रेट शोषण सुरळीत करण्यासाठी मेथीचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. असं असताना ज्यांना आधीच रक्तातील साखर कमी आहे किंवा जे डायबिटीजची औषधं घेत आहेत, त्यांनी मेथीचे पाणी पिऊ नये. कारण त्यामुळे रक्तातील साखर खूप प्रमाणात कमी होऊ शकते. कमी ग्लुकोजच्या पातळीमुळे चक्कर येणे आणि अशक्तपणा येऊ शकतो.

गर्भवती महिला

मेथीमध्ये अशी संयुगे असतात, जी प्रसूती वेदना वाढवतात. त्यामुळे गरोदरपणाच्या सुरूवातीच्या किंवा मधल्या महिन्यांमध्ये मेथीचे पाणी पिणे धोकादायक ठरू शकते. गरोदरपणात जास्त मेथीचे पाणी प्यायल्याने वेळेआधी प्रसूती होऊ शकते किंवा गर्भपातदेखील होऊ शकतो. कधीकधी मेथीच्या पाण्यामुळे गर्भवती महिलांना पोटफुगी किंवा उलट्या होऊ शकतात.

थायरॉईड असताना मेथीचे पाणी पिऊ नये

काही अभ्यासांमधून असे दिसून आले की, मेथीचे दाणे थायरॉईड संप्रेरकांच्या निर्मिती आणि कार्यात व्यत्यय आणू शकते. मेथीच्या बियांमधील गोइट्रोजेनिक संयुगे आयोडीन शोषणावर परिणाम करतात, जे थायरॉईडसाठी चांगले नाही. हायपोथायरॉईडीझम असलेल्या किंवा कमी सक्रिय थायरॉईड असलेल्या लोकांनी मेथीच्या पाण्याचे सेवन मर्यादित करावे.

पचनाच्या समस्या असल्यास मेथीचे पाणी पिणे टाळा

मेथीमुळे पचनक्रिया सुधारते. पण ते सर्वांसाठी फायदेशीर नाही. मेथीचे पाणी प्यायल्यानंतर अनेकांना गॅस, पोटफुगी, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होतो. मेथीमध्ये फायबर आणि सॅपोनिनचे प्रमाण जास्त असते, ते या समस्या वाढवू शकते. रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने गॅस आणि पोटफुगी वाढू शकते. आयबीएस, अॅसिड रिफ्ल्युक्स किंवा पचनसंस्थेशी संबंधित संवेदनशीलता असलेल्या लोकांनी मेथीचे पाणी पिणे टाळावे.

मेथीची अॅलर्जी

जर एखाद्याला शेंगदाणे, हरभरा किंवा डाळीची अॅलर्जी असेल तर त्यांनी मेथीचे पाणी पिणे देखील टाळावे. याची अॅलर्जी असलेल्या अनेकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे पुरळ येणे, सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि उलट्या होणे असे त्रास होऊ शकतात.