चांगली व वेळेत घेतलेली न्याहारी महिलांमधील वंध्यत्वावर मात करण्यासाठी उपयोगी ठरत असल्याचे नुकत्याच केलेल्या एका अभ्यासामधून समोर आले आहे.   
सकाळी न्याहारीच्या माध्यमातून योग्य प्रमाणामध्ये उष्मांक(कॅलरी) घेतल्यास वंध्यत्वाला कारणीभूत असणाऱया समस्या टळू शकत असल्याचा दावा या अभ्यासावर काम करणाऱ्या संशोधकांनी केला.    
चांगली व भरपूर घेतलेली न्याहारी मासिक पाळीमध्ये अनियमितता असणाऱ्या महिलांच्या प्रसवशक्तीमध्ये वाढ करत असल्याचे जेरूसलेम येथील हिब्रू विद्यापीठाच्या आणि तेल अव्हीव विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे.
महिलांच्या आरोग्यावर जेवणाच्या वेळांचा व पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोमचा(पीसीओएस) काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यात आला. प्रसवशक्ती असलेल्या वयातील महिलांच्या प्रजनन क्षमतेवर ‘पीसीओएस’ चा सहा ते दहा टक्के परिणाम होत असल्याचे संशोधकांच्या निष्कर्षामधून समोर आले.
हे सिंड्रोम महिलांमध्ये निर्माण होणाऱया इन्शुलिनला प्रतिरोध करतात. परिणामी मासिक पाळीमध्ये अनियमितता येते, मोठ्या प्रमाणावर केस गळतात व शरीरावरील इतर ठिकाणच्या केसांमध्ये वाढ होते, चेहऱ्यावर मुरूम वाढतात व वंध्यत्व येते. या लक्षणांमुळे भविष्यामध्ये मधुमेहदेखील होण्याची दाट शक्यता असते.         
वॉल्फसन वैद्यकीय केंद्रामध्ये एकूण ६० महिलांवर १२ आठवडे प्रयोग करण्यात आले. या महिलांचे वय २५ ते ३९ दरम्यान होते. दोन गटांमध्ये विभागलेल्या या महिलांना प्रत्येक दिवशी १८०० उष्मांक मिळतील असा आहार देण्यात आला. या दोन गटांमधील आहाराच्या वेळांमध्ये फरक ठेवण्यात आला होता.        
एक गट त्यांच्या एकूण १८०० उष्मांकापैकी ९८० उष्मांक न्याहारीमधून घेत होता. दुसऱा गट तेच उष्मांक जेवणामधून घेत होता. न्याहरीमधून जास्त उष्मांक घेणाऱ्या गटाला याचा फायदा झाला असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.