फॅशनच्या विश्वात पुरुष किंवा स्त्री असणं, म्हणजेच तुमची लैंगिकता खूप महत्त्वाची असते. पण आता अंजली लामा आणि पेत्र नेट्का यांच्या रूपाने तृतीयपंथीयांनाही रॅम्पवर स्थान मिळालं आहे.
यंदाच्या ‘लॅक्मे फॅशन वीक’च्या मॉडेल्सच्या यादीवर एकदा नजर टाकताना दोन नावांवर येऊ थांबू. अंजली लामा आणि पेत्र नेट्का. नावांवरून कदाचित यांचं वेगळेपण जाणवणार नाही, पण यातील अंजली तृतीयपंथीय मॉडेल असून पेत्र ‘जेंडर फ्लूइड मॉडेल’ आहे. या दोघींचं वेगळेपण हे केवळ त्यांच्या इतरांपेक्षा वेगळं असण्यात नसून या वेगळेपणाच्या पलीकडे आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या त्यांच्या धडपडीत आहे, हे त्यांच्याशी बोलल्यावर लक्षात येतं.
सकारात्मक पेत्र नेट्का
स्त्री-पुरुष भेदभाव हा कोणत्याच क्षेत्राला चुकलेला नाही. पण अशा वेळी जेंडर न्युट्रल व्यक्ती (एकाच वेळी दोन्ही िलगांची जाणीव असणारी) समोर येऊन उभी ठाकते, तेव्हा दोन्ही गटांमध्ये गोंधळ उडतो. पेत्र नेट्काच्या बाबतीत असंचं काहीसं झालं. मध्य युरोपातील चेक रिपब्लिक या छोटय़ाशा देशातल्या या लहान मुलाला आपण इतरांपेक्षा वेगळे असल्याची जाणीव फार आधीच झाली होती. ‘मी कधीच मुलांसोबत रमायचो नाही. त्यांच्यासोबत खेळायचो नाही. मुलांनाही मी त्यांच्यातला कधीच वाटलो नाही. पण मुलींच्या गटामध्ये मी सहज रमायचो,’ पेत्र सांगतो. त्याला मुलींप्रमाणे सजायला आवडायचं, छान छान कपडय़ांची आवड आधीपासूनच होती. ‘लहानपणी मी आईला मेकअप करताना पाहायचो. तेव्हा मलाही मेकअप करायची इच्छा व्हायची.’ पेत्रमधील हा बदल त्याच्यासोबतच त्याच्या आईनेही सहज स्वीकारला. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर संघर्ष करायची गरज त्याला फारशी भासली नाही.
त्याच्या या छंदाचं करिअरमध्ये रूपांतर करायचा निर्णय घेत, त्याने मॉडेिलगमध्ये उतरायचं ठरवलं. पण तिथेही हा शारीरिक आणि मानसिक गोंधळ कायम होताच. ‘मला नक्की माहीत नाही मी मुलगा आहे की मुलगी. माझी शरीरयष्टी कृश आहे. त्यामुळे मुलांच्या विभागातील कपडय़ांमध्ये मला माझी साइज मिळायची नाही. पण मुलींच्या जीन्स, टी-शर्ट्स मला व्यवस्थित बसायचे. लोकांना विचित्र वाटतं पण मला युनिसेक्स व्यक्ती असल्याची जाणीव कायम होती,’ हे सांगत असताना पेत्र स्वत:ची विचारसरणी काहीशी स्त्रियांशी मिळतीजुळती असल्याचेही मान्य करतो. पण म्हणून लिंगबदल करून घ्यायची गरज त्याला कधी भासली नाही.
मॉडेिलगच्या निमित्ताने त्याने ऑस्ट्रेलियामध्ये एक फोटोशूट करून घेतलं. ते फोटो एका मासिकात छापून आले. ते फोटो पाहताना आपण स्त्री आणि पुरुष दोन्ही लुक्स व्यवस्थितपणे कॅरी करू शकत असल्याही जाणीव त्याला झाली आणि जेंडर न्युट्रल मॉडेल म्हणून काम करायचं त्याने निश्चित केलं. अर्थात त्याला संघर्ष चुकला नव्हता. काम मिळविताना नकार, संशयी नजरांचा सामना त्याला नेहमीच करावा लागला. पण ‘माझी विचारसारणी सकारात्मक आहे. प्रत्येक परिस्थितीतून काहीतरी सकारात्मक शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे या गोष्टी फारशा मनाला लावून घ्यायची गरज मला भासली नाही,’ असं तो सांगतो. पण लोक आपल्याला स्वीकारतील की नाही ही धास्ती तर होतीच. आयुष्यात पहिल्यांदा साऊथ आफ्रिका फॅशन वीकच्या रॅम्पची पायरी चढताना ही धास्ती प्रकर्षांने जाणवली. पण तो अनुभव त्याने कल्पना केली होती तितका वाईट नव्हता, उलट त्यामुळे पुढे जायचा उत्साह या अनुभवातून त्याला मिळाला. ज्या देशांमध्ये समलंगिक संबंधांना बंदी आहे, त्या देशांमध्ये जेंडर न्यूट्रल मॉडेल म्हणून ओळख निर्माण करण्याची त्याची इच्छा आहे. आपल्या कामातून समलंगिकतेबद्दल शक्य तितकी जागृती करायचा त्याचा मानस आहे.
जिद्दी अंजली लामा
‘सॉरी. यू आर रिजेक्टेड..’ एखाद्या मॉडेलला तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अशा अनेक नकारांना सामोरे जावे लागते. पण तिच्यासाठी या नेहमीच्या नकारांचा अर्थ केवळ तिचं वाईट काम इतकाच नव्हतं. रोजच्या नकारांना कंटाळून शेवटी एका स्पध्रेच्या वेळेस तिने परीक्षकांना तिला दिलेल्या नकाराचं कारण विचारलंच. तेव्हा तिला सांगण्यात आलं की, तिचं स्पध्रेतील सादरीकरण तर सुंदर होतचं, पण तिचं तृतीयपंथी असणं, नकाराचं मुख्य कारण होतं. तिला धक्का बसला होताच, पण त्यातून सावरून तिने तिचे प्रयत्न चालूच ठेवले. तो एक काळ होता आणि आज भारतातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये रॅम्पवर चालणारी पहिली तृतीयपंथी मॉडेल असण्याचा मान तिने मिळविला आहे.
तृतीयपंथी मॉडेल, या लेखलखाली मोठय़ा पब्लिसिटी स्टंटच्या साहाय्याने अंजली लामा हे नाव भारतीय मॉडेिलग क्षेत्रात सहज समाविष्ट झालं असतं. त्यासाठी मग स्पर्धेत वगैरे भाग घ्यायचीही गरज उरली नसती. पण तिने दरवर्षी होणाऱ्या मॉडेिलग निवड स्पध्रेत भाग घेतला. मागच्या वर्षी तिला लॅक्मेकडूनही नकार मिळाला आहे. पण ती पुन्हा या स्पध्रेत दाखल झाली, नव्या जिद्दीने. आणि यंदा निवडल्या गेलेल्या पाच मॉडेल्समध्ये तिचा समावेश आहे. अर्थात नेपाळच्या नुवाकोट या छोटय़ाशा गावातून आलेल्या (पूर्वाश्रमीची) नाबीन वाबियाचा हा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता. छोटे केस, मुलांचे कपडे घालून वावरणाऱ्या नाबीनला लहानपणापासूनच तिच्या तृतीयपंथी या ओळखीमुळे पदोपदी अपमान, चिडवाचिडवी यांचा सामना करावा लागला होता. विशेष म्हणजे ‘‘गावापेक्षा काठमांडूसारख्या शहरात भेदभावाला जास्त सामोरं जावं लागलं, हा माझ्यासाठी धक्का होता,’’ असं ती सांगते. पुढे तिचा संबंध नेपाळमधील तृतीयपंथीय लोकांसाठी काम करणाऱ्या संस्थेशी आला. त्याच दरम्यान तिचा संबंध मॉडेिलग विश्वाशी आला आणि हे क्षेत्र तिला खुणावू लागलं. िलगबदल शस्त्रक्रिया करून नाबीनची अंजली झाली.
इथून पुढे तिच्या खऱ्या संघर्षांला सुरुवात झाली. गावी तर मॉडेिलग हे क्षेत्रच नवीन. त्यात आईखेरीज घरातल्यांनी तिच्याशी संबंध तोडले होते. पुढे अगदी फोटोशूटपासून मॉडेिलगची कामं मिळविण्यासाठी तिला बरीच धडपड करावी लागली होती. ‘‘नकाराची भीती नव्हती. पण माझं तृतीयपंथी असणं हे नकाराचं कारण होतं, ते माझ्यासाठी वाईट होतं,’’ असं अंजली सांगते. फक्त मॉडेिलग नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रांत तृतीयपंथी लोकांना अशाच भेदभावाला सामोरं जावं लागत असल्याचं ती सांगते. सततच्या नकाराला कंटाळून तिच्या ओळखीच्या लोकांनी तिला परत गावाला यायला सांगितलं, पण तिनं मात्र प्रयत्न करणं सोडलं नाही. तिनं मॉडेिलगचं शास्त्रीय शिक्षण घेतलं, वेळ पडल्यावर काही विनामोबदला किंवा कमी पशात कामं केली. २०१० मध्ये एका बडय़ा फॅशन वीकच्या निमित्ताने तिच्या करिअरला खरी सुरुवात झाली आणि आज ती नेपाळची पहिली तृतीयपंथी मॉडेल असं बिरुद अभिमानाने मिरवते आहे. या प्रवासात आता कुठे लोकांची मानसिकता बदलू लागल्याचं ती सांगते. ही तर तिची फक्त सुरुवात आहे, यापुढे तिला वेगवेगळ्या बडय़ा ब्रॅण्ड्ससाठी रॅम्पवॉक करायचं आहे.
(सौजन्य : लोकप्रभा)
response.lokprabha@expressindia.com