हिवाळा सुरू होताच थंडीच्या दिवसात, सर्व पालक आपल्या लहान मुलांकडे विशेष लक्ष देण्यासाठी सज्ज होतात. बाळाला फार थंडी वाजू नये म्हणून गरम कपडे घालतात. त्यांच्या आहाराकडे लक्ष देतात. परंतु, या सर्व गोष्टींसोबत थंड हवेचा लहान मुलांच्या त्वचेवर फार जास्त आणि लवकर परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्या त्वचेची काळजी कशी घ्यायची याबद्दल काही टिप्स मुंबई येथील, एनएचआरसीसीमधील बालरोगतज्ज्ञ सल्लागार डॉक्टर नेहल शाहा [NHRCC] यांनी टाइम्स ऑफ इंडियाला माहिती देताना सांगितल्या आहेत.
लहान मुलांची त्वचा नाजूक असून ती फार पातळ असते. त्यामुळे अशा थंड वातावरणाचा परिणाम त्यांच्या त्वचेवर पटकन होऊन त्वचा कोरडी पडते. त्यामुळे त्यांच्या त्वचेची काळजी घेणे थोडे अवघड असते. अशा वेळेस पालकांनी या साध्या सोप्या टिप्स लक्षात ठेवाव्यात.
१. हायड्रेशन
शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असल्यास शरीराला डिहायड्रेशनचा त्रास जाणवतो. ही समस्या केवळ उन्हाळ्यात नाही तर हिवाळ्यातही जाणवते. त्यामुळे लहान मुले हायड्रेट राहतील याकडे लक्ष ठेवा.
२. अंघोळ घालताना काळजी घ्यावी
बाळाला अंघोळ घालताना सौम्य आणि वास नसलेल्या उत्पादनांचा वापर करावा. यासोबतच त्यांना फक्त ५ ते १० मिनिटांसाठी कोमट पाण्याने अंघोळ घालावी. पाणी जास्त गरम असल्यास बाळाच्या त्वचेवरील नैसर्गिक तेल निघून जाऊन, त्वचा कोरडी पडते. अंघोळ झाल्यानंतर मऊ टॉवेलने अंगावरील पाणी केवळ टिपून घ्यावे. टॉवेलने घासून अंग कोरडे करू नये.
हेही वाचा : हिवाळ्यात सतत आळस येतोय? ‘हे’ असू शकतं कारण; पाहा या ५ रेसिपी ठेवतील तुम्हाला उत्साही…
३. मॉइश्चराइजरचा वापर
लहान बाळांसाठी तुम्ही कोणत्या मॉइश्चराइजरची निवड करत आहात हे महत्त्वाचे असते. बाळाच्या नाजूक त्वचेला चालेल असे आणि वास नसलेले मॉइश्चराइजर निवडून ते अंघोळ घातल्यानंतर लगेच लावावे. विशेषतः हाताचे कोपरे, गुडघे आणि कानाच्या मागे मॉइश्चराइजर लावायला विसरू नका.
४. एकावर एक कपडे घालताना काळजी घ्या
बाळाला थंडी वाजू नये यासाठी अनेकदा पालक मुलांना एकावर एक कपडे घालत असतात. परंतु, कधीकधी याने त्याच्या शरीरात अतिरिक्त उष्णता निर्माण होऊन त्याचा बाळाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे कपड्यांची निवड करताना मऊ कॉटनचे कपडे निवडावे. पण, ते काहीसे मोकळे आणि थोडे हवेशीर असे असावे म्हणजे एकमेकांवर घातले तरीही त्याचा बाळाला त्रास होणार नाही.
५. सनस्क्रीनचा वापर
कोणताही ऋतू असला तरीही त्याचा त्रास लहान मुलांना होत असतो. त्यामुळे त्यांना बाहेर घेऊन जाताना, वाईट हवेपासून आणि उन्हापासून बाळाचे रक्षण करावे. लहान मुलांसाठी किंवा बाळांसाठी मिळणारे सनस्क्रीन लावणेदेखील फायदेशीर ठरू शकते.
हिवाळ्यातील थंड हवेपासून आपले व आपल्या बाळाचे रक्षण करणे गरजेचे असते. त्यामुळे तज्ज्ञांनी दिलेल्या या लहान लहान टिप्स लक्षात ठेवा आणि हिवाळ्यात आपल्या बाळाची त्वचा जपा.