best breakfast choices: आपण झोपेत असताना, आपले शरीर काही तास अन्नाशिवाय काम करते. सकाळी उठल्यानंतर, शरीराला चयापचय सुरू करण्यासाठी आणि दिवसभरासाठी ऊर्जा प्रदान करण्यासाठी योग्य इंधनाची आवश्यकता असते. पण, आपण उठताच काय खातो यावर आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. काही पदार्थ रिकाम्या पोटी घेतल्यास पचन बिघडू शकते, आम्लपित्त वाढू शकते किंवा थकवा जाणवू शकतो. उलट काही नैसर्गिक आणि संतुलित पदार्थ शरीराला ऊर्जा, एकाग्रता व ताजेतवानेपणा देतात.

बर्‍याच जणांना वाटते की, काहीही खाल्ले तरी चालते; पण तसे नाही. सकाळची पहिली आहार निवड आपले वजन, पचनक्रिया, त्वचा, मेंदूची कार्यक्षमता व मूडवर थेट परिणाम करीत असते. म्हणूनच आपल्या शरीराला कोणते घटक सर्वप्रथम मिळतात याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. चुकीच्या आहारामुळे दिवसभर थकवा येऊ शकतो, तर योग्य आहारामुळे कमी खाल्ले तरी ऊर्जा टिकून राहते. त्यामुळे सकाळचा नाश्ता हा केवळ पोट भरण्यासाठी नसून शरीराला पोषण देण्यासाठी असतो.

रिकाम्या पोटी खाण्यास योग्य पदार्थ

१. कोमट लिंबूपाणी
सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया सुरू होते आणि पचन सुधारते. त्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते.

२. ओट्स
ओट्स फायबरने समृद्ध असल्याने, तुम्हाला ते जास्त काळ पोट भरलेले ठेवते आणि रक्तातील साखर नियंत्रित करते.

३. दही
प्रथिने आणि प्रो-बायोटिक्सने भरलेले दही पचनसंस्थेसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

४. अंडी
अंडी हा नाश्त्यासाठी एक पौष्टिक आणि पोटभर पर्याय आहे. कारण- हा प्रथिने, जीवनसत्त्वे व खनिजांचा उत्तम स्रोत आहे.

५. ग्रीन टी
अँटीऑक्सिडंट्सने भरलेली ग्रीन टी चरबी जाळण्यास आणि मेंदूला सतर्क ठेवण्यास मदत करते.

६. ब्लूबेरी
वजन नियंत्रणासाठी ब्लूबेरी हा एक उत्तम पर्याय आहे. कारण- त्यात कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते.

७. बदाम
हेल्दी फॅट्स, प्रोटीन व फायबरमुळे बदाम सकाळी ऊर्जा देतात आणि भूक आटोक्यात ठेवतात.

८. चिया बिया
ओमेगा-३ आणि फायबरने समृद्ध असलेल्या चिया बिया शरीराला दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा प्रदान करतात.

रिकाम्या पोटी टाळावेत असे पदार्थ

१. कॉफी
रिकाम्या पोटी कॉफी प्ययाल्याने पोटातील आम्ल अचानक वाढू शकते आणि पोटात आग पडतेत. जर हे दीर्घकाळ चालू राहिले, तर त्यामुळे पोटाच्या समस्या आणि छातीत जळजळ होऊ शकते.

२. तिखट पदार्थ
रिकाम्या पोटी मिरच्या आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटाच्या अस्तरांना त्रास होऊ शकतो, ज्यामुळे आम्लता, वेदना किंवा उलट्यांचा धोका वाढतो.

३. लिंबूवर्गीय फळे
संत्रे, मोसंबी, लिंबू यांसारख्या फळांमध्ये नैसर्गिक आम्ल खूप प्रमाणात असते. जर रिकाम्या पोटी त्यांचे सेवन केले, तर कमकुवत पचनसंस्था असलेल्यांना लगेच जळजळ होऊ शकते.

४. सोडा/गॅसयुक्त पेये
सोडा किंवा कार्बोनेटेड पेयांमधील कार्बन डाय-ऑक्साइडमुळे पोटात गॅस होतो. सकाळी हे सेवन केल्याने सतत पोट फुगणे आणि ढेकर येणे हा त्रास होऊ शकते.

५. साखरयुक्त पदार्थ
डोनट्स, केक किंवा साखरयुक्त पेये तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण खूप लवकर वाढवू शकतात. पण, नंतर ती अचानक कमी होते आणि तुम्हाला थकवा, चिडचिड किंवा डोकेदुखी जाणवू शकते.

६. तळलेले पदार्थ
समोसे, वडे, भजी यांसारख्या तळलेल्या पदार्थांमध्ये भरपूर तेल असते. रिकाम्या पोटी हे पदार्थ खाल्ल्याने पोटात जडपणा आणि आळस येऊ शकतो.

७. प्रोसेस्ड फूड
चिप्स, पॅकेट स्नॅक्स किंवा इन्स्टंट नूडल्समध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि कृत्रिम चव भरपूर असते. जर ते रिकाम्या पोटी खाल्ले, तर पोटाला त्याची सवय नसल्याने ते गॅस किंवा पोटदुखीचे कारण बनू शकतात.

८. काही दुग्धजन्य पदार्थ
दूध, चीज किंवा क्रीमसारख्या पदार्थांमुळे काही लोकांमध्ये गॅस किंवा सैल हालचाल होऊ शकते. दुधामधील लॅक्टोज नावाच्या नैसर्गिक साखरेचे पचन न होण्याचा त्रास असेल्यांनी त्यांनी सकाळी दुधाऐवजी हलके पर्याय निवडावेत.