Prostate Cancer Early Signs: प्रत्येक पुरुषाने विशेषत: ५० वर्षांवरील, हृदयाप्रमाणेच पुरुषस्थ ग्रंथीच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कर्करोग हा एक जीवघेणा आजार आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. कर्करोगाचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यातलाच एक म्हणजे पुरुषस्थ ग्रंथीचा कर्करोग. (Prostate Cancer) हा पुरुषांना होणारा एक सामान्य, पण छुपा दुर्धर विकार आहे, जो सुरुवातीला साध्या लक्षणांशिवाय विकसित होतो. डॉ. देवेंद्र कुमार शर्मा (डायरेक्टर, युरोलॉजी आणि रीनल ट्रान्सप्लांट, CK बिर्ला हॉस्पिटल्स, जयपूर) म्हणतात, “ पुरुषस्थ ग्रंथीच्या कर्करोगाची एक मोठी समस्या म्हणजे त्याची लक्षणं फारच अस्पष्ट असतात.”
लक्षात घेण्यासारखी लक्षणे
डॉ. शर्मा पुढे सांगतात, “पुरुषांना लघवीमध्ये बदल दिसू शकतो. वारंवार जाण्याची गरज, अचानक तातडीने जावे लागणे, लघवी मधेच थांबणे आणि पुन्हा सुरू होणे किंवा लघवीचे प्रमाण कमी असणे, काही लोकांना लघवीत रक्त दिसू शकते किंवा खालच्या पाठी किंवा हाडांमध्ये वेदना जाणवू शकतात. हे लक्षण अनेक कारणांमुळेदेखील दिसू शकते; पण अशा स्थितीत ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.”
याचं समर्थन डॉ. अरुण कुमार बालकृष्णन, मॅनेजिंग डायरेक्टर, प्रमुख युरोलॉजिस्ट, रोबोटिक सर्जन व युरो-ऑन्कोलॉजिस्ट, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ नेफ्रोलॉजी अँड युरोलॉजी, चेन्नई, करतात. ते म्हणतात, “रात्री वारंवार लघवीला जाणे, लघवी सुरू करण्यात किंवा एकसारखा प्रवाह राखण्यात अडचण, थांबून थांबून लघवी होणे किंवा मूत्राशय पूर्ण रिकामे न झाल्याची भावना ही याबाबत इशारा देणारी चिन्हे आहेत. काही प्रकरणांमध्ये लघवी किंवा वीर्यात रक्त दिसणे, अचानक वजन कमी होणे ही लक्षणे गंभीर असू शकतात.”
PSA टेस्ट – लपलेल्या कर्करोगाचा शोध
डॉ. शर्मा स्पष्ट करतात, “लक्षणं दिसेपर्यंत रोग बर्याचदा प्रगत अवस्थेत पोहोचलेला असतो. त्यामुळे प्रोस्ट्रेट-स्पेसिफिक अँटिजन (PSA) रक्तचाचणी महत्त्वाची आहे. ही साधी चाचणी कर्करोगाची लवकर ओळख पटवू शकते.”
ते पुढे सांगतात की, “पश्चिमी देशांमध्ये ८०-९०% पुरुषस्थ ग्रंथीचा कर्करोग लवकर ओळखला जातो कारण- PSA स्क्रिनिंग नियमित आहे. भारतात मात्र ७०-८०% प्रकरणे प्रगत अवस्थेत आढळतात. त्यामुळे ५० वर्षांवरील प्रत्येक पुरुषाने वार्षिक PSA चाचणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.”
लवकर निदानाचे फायदे
डॉ. बालकृष्णन सांगतात, “वेळेवर युरोलॉजिस्टचा सल्ला घेऊन योग्य चाचण्या केल्यास उपचार अधिक यशस्वी होतात. जागरूकता वाढवणे आणि पुरुषांना नियमित आरोग्य तपासणीस प्रवृत्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे पुरुषस्थ ग्रंथीचा कर्करोग लवकर ओळखता येतो आणि जीवन रक्षणासोबत गुणवत्ताही टिकवता येते.” कोणत्याही वैद्यकीय स्थितीबाबत नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.