Fruits To Avoid During Cold And Cough : फळांचे सेवन सामान्यत: आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे आजारपणात डॉक्टरांकडून अनेकदा फळं खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण आजारपणामुळे अनेकदा जेवण नकोसं होतं, तोंडाची चव बिघडते, अशावेळी फळांचा रस किंवा काही फळांच्या सेवनाने थोडं बरं वाटत. त्यामुळे फळं ही आरोग्यासाठी फायदेशीर असली तर सर्दी-खोकला झाल्यास काही फळं खाणं टाळलं पाहिजे.

सर्दी-खोकला हंगामी आजार आहे, जो कोणालाही सहजपणे होतो. अशावेळी काही फळांच्या सेवनाने सर्दी, कफ अधिक वाढू शकतो, घशात जळजळ, अॅसिडिटी किंवा रक्तात साखरेचे प्रमाण वाढू शकते. यावर डाएट मंत्रा क्लिनिकच्या आहारतज्ज्ञ कामिनी कुमारी यांनी सर्दी आणि खोकला असताना कोणती फळं खावीत आणि कोणती फळे खाऊ नयेत याविषयी माहिती दिली आहे.

आहारतज्ज्ञ कामिनी कुमारी यांच्या मते, फळं शरीरास आवश्यक जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि हायड्रेशन प्रदान करतात, परंतु कोणत्या आजारावर कोणी फळं खावी हेही तितकचं महत्त्वाचं आहे. कारण फळांच्या सेवनाने तुमच्या आरोग्यावरही वेगवेगळे परिणाम दिसू शकतात, त्यामुळे आजारपणात फळं खातानाही थोडी काळजी घ्यावी लागते. आंबट फळं आणि केळी यांसारख्या फळांच्या सेवनाने आजारी व्यक्तीस बरं होण्यासाठी वेळ लागतो. आजारपणात कोणती फळं शरीरावर कसा परिणाम करतात हे जाणून घेतल्यास तुम्हाला योग्य फळांची निवड करण्यास मदत होऊ शकते.

आंबट फळं

संत्री, द्राक्षे आणि लिंबू यांसारख्या आंबट फळांमध्ये आम्लता जास्त असते, ज्यामुळे घशात जळजळ होऊ शकते आणि खोकला आणखी वाढू शकतो. जरी व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक असले तरी, खोकला आणि सर्दी झाल्यास आंबट फळं कमी प्रमाणात खाणे चांगले.

अननस

अननसात ब्रोमेलेन नावाचे एंजाइम असते, ज्यामुळे सर्दी आणि खोकला वाढू शकतो, म्हणून खोकला आणि सर्दी झाल्यास अननस खाणे टाळावे. ब्रोमेलेनबद्दल संवेदनशील असलेल्या लोकांनी आजारपणात अननस खाताना सावधगिरी बाळगली पाहिजे. खाल्ल्यास कमी प्रमाणात खाणे चांगले.

केळी

केळी हे पचनासाठी चांगले फळ आहे, परंतु जेव्हा तुम्हाला खोकला आणि सर्दी होते तेव्हा ते त्रासदायक ठरू शकते. केळीच्या सेवनाने सर्दी वाढते आणि रक्तसंचय वाढू शकतो. विशेषतः जर तुम्हाला दुग्धजन्य पदार्थांची अॅलर्जी असेल किंवा सर्दी असेल तर केळी खाऊ नका.

द्राक्ष

खोकला आणि सर्दी असताना द्राक्षे खाणे टाळा. जरी ती पौष्टिक असली तरी त्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे जळजळ वाढू शकते आणि तब्येत आणखी बिघडू शकते. द्राक्षांचे सेवन मर्यादित करणे आणि आजारपणात तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणारे हायड्रेटिंग, आरामदायी पदार्थ खाण्यावर लक्ष केंद्रित करणे चांगले.

आंबा

आंबा हे एक पौष्टिक फळ आहे, परंतु त्यात साखरेचे प्रमाण जास्त असू शकते आणि त्यामुळे जळजळ वाढू शकते. जेव्हा तुम्हाला खोकला आणि सर्दी होते, तेव्हा आंबा कमी प्रमाणात खाणे किंवा अजिबात न खाणे चांगले.