अमेरिकी विद्यापीठातील भारतीय-अमेरिकी वैज्ञानिकांच्या पथकाने तुळस (बेसिल) या वनस्पतीचे औषधी गुणधर्म वाढवण्यासाठी जनुकसंस्कारित तुळस तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ओवेन्सबोरो येथील प्रयोगशाळेत हे प्रयोग सुरू असून त्यात रेणवीय जीवशास्त्राचे पश्चिम केंटुकी विद्यापीठातील सहायक प्राध्यापक चंद्रकांत इमानी व त्यांच्या विद्यार्थ्यांनी तुळशीचा परिणाम वाढवण्यासाठी त्यात जनुक अभियांत्रिकीचा वापर केला आहे. यात तुळशीमध्ये युजेनॉल हे संयुग वाढवण्यात येत आहे. तुळशीचे औषधी गुणधर्म सर्वाना माहीतच आहेत, पण या तुळशीत स्तनाचा कर्करोग नियंत्रणात ठेवण्याचाही गुण आहे, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. जर तुम्ही तुळशीची पाने दळली तर त्यातून युजेनॉल हे संयुग बाहेर येते. हे संयुग जर कर्करोगग्रस्त पेशींवर टाकले तर त्यामुळे कर्करोग पेशींची वाढ थंडावते व हे प्रयोगानिशी सिद्ध झालेले आहे, असे इमानी यांचे म्हणणे आहे. जर आपण तुळशीतील युजेनॉलचे प्रमाण वाढवले तर कर्करोगविरोधी गुण असलेल्या संयुगाचे तुळस म्हणजे कोठार बनेल, आता पुढच्या टप्प्यात कर्करोगावर हे संयुग कितपत गुणकारी आहे याचे अचूक मापन केले जाईल. तुळस ही एक औषधी वनस्पती आहे व त्यात मेटॅबोलाइटस संयुगे असतात. आपण जर नीट बघितले तर परदेशात कर्करोगावरील पूरक उपचार म्हणून तुळशीचा वापर केला जातो, असे इमानी यांनी सांगितले.