Gym Workout And Heart Attack Test : हल्ली तरुणांमध्ये फिटनेसची एक वेगळी क्रेझ दिसून येते. जिममध्ये जाणे, धावणे, वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेणे हा आता एक ट्रेंड बनताना दिसतोय. कारण- प्रत्येकाला हल्ली तरुण, तजेलदार व तंदुरुस्त दिसायचे आहे. पण, फिट राहण्याच्या नादात हल्ली तरुण वेगवेगळ्या आजारांची शिकार होताना दिसतायत. त्यात वर्कआउटदरम्यान आता तरुणांना अचानक हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटना वाढताना दिसतात. बाहेरुन निरोगी, उत्साही, तंदुरुस्त दिसणाऱ्या ३० ते ४० वयोगटातील तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण अधिक आहे. पण असे का घडते ते समजून घेणं तितकंच गरजेचं आहे.

बाहेरून तरुण, उत्साही दिसणारा तरुण आतूनही तितकाच तंदुरुस्त असेल याची काही हमी नसते. त्यात हल्ली उच्च रक्तदाब, मधुमेह आणि काही आनुवंशिक घटकांमुळेही हृदयविकाराचं प्रमाण वाढतंय. अशा परिस्थितीत व्यायाम करताना रक्तदाब वाढू शकतो आणि मधुमेहामुळे हृदयावर ताण येतो. त्यामुळेही हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.

तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढतेय?

तीव्र व्यायामामुळे रक्तदाब अचानक वाढतो. त्यात व्यायामादरम्यान ट्रेनरशिवाय तुम्ही कोणताही कठीण व्यायाम करीत असता तेव्हा शरीरावर जास्त ताण येतो. त्यावेळी हृदयविकारचा झटका येऊ शकतो.

वाढलेल्या कॉलेस्ट्रॉलमुळेही हृदयाला होणारा रक्तपुरवठा रोखला जाऊ शकतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

दुर्लक्षित आजार, मधुमेह व लठ्ठपणा या बाबींचाही हृदयाच्या आरोग्याशी थेट संबंध आहे.

बऱ्याचदा हृदयरोग शरीरात कोणत्याही लक्षणांशिवायही असू शकतो, जी लक्षणं व्यायामादरम्यान दिसून येतात.

व्यायामादरम्यान हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी करा ‘या’ ४ चाचण्या

१) रक्तदाब चाचणी

जर तुमचा रक्तदाब सामान्य असला (१२० / ८० mmHg पेक्षा कमी) तरीही वर्षातून एकदा चाचणी करून घेणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी ते आणखी महत्त्वाचे आहे.

२) कोलेस्ट्रॉल पातळी

फास्टिंग लिपिड प्रोफाइल टेस्टमुळे रक्तात किती ‘वाईट’ कोलेस्ट्रॉल आहे ते कळेल. निरोगी व्यक्तीनेही दर ४-६ वर्षांनी एकदा तरी ही चाचणी केली पाहिजे.

३) रक्तशर्करा चाचणी

मधुमेहामुळे धमन्यांचे नुकसान होत असते. त्यामुळे ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी रक्तशर्करा चाचणी केलीच पाहिजे. तसेच जर कुटुंबात कोणाला मधुमेहाचा इतिहास असेल, तर कमी वयातच ही चाचणी वेळोवेळी केली पाहिजे.

४) वजन आणि बीएमआय

जर तुमचा बीएमआय २५ च्या वर असेल, तर तुमच्या कंबरेचा घेरदेखील मोजा. पोटावरील चरबीचा तुमच्या हृदयावर सर्वांत जास्त परिणाम होत असतो.

(वरील बातमी ही सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे कोणतेही औषध घेताना किंवा उपचार करताना आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)