आंबट-गोड अशी वैशिष्ट्यपूर्ण चव असलेला आंबा बहुतांश व्यक्तींना आवडतो. हापूस, केसर असो किंवा रायवळ; प्रत्येक आंब्याची चव, गुणवैशिष्ट्यं वेगवेगळी असतात. त्यामुळेच आंब्याला फळांचा राजा, असे म्हणतात. आरोग्याच्या दृष्टीनं आंबा अतिशय पोषक मानला जातो. आंब्यासोबतच त्यातली कोयदेखील पोषक घटकांनी युक्त असते. त्यामुळे आंबा खाल्ल्यावर कोय टाकून देत असाल, तर तशी चूक करू नका. आता तुम्ही म्हणाल की, त्यांचा काय उपयोग असू शकतो? तर हे लक्षात घ्या की, आंब्याच्या बिया म्हणजेच आंब्याच्या कोयीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. वजन व्यवस्थापन ते हृदयाच्या आरोग्यास मदत करण्यापर्यंत आंब्याच्या कोयीचे पाच आश्चर्यकारक फायदे आज आपण जाणून घेऊ. तुमच्या दैनंदिन आहारात समाविष्ट करण्याचे काही सोपे मार्गदेखील आपण जाणून घेऊ…
आंब्याच्या बिया आरोग्यासाठी चांगल्या आहेत का?
१. वजन कमी करण्यास मदत
जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर आंब्याच्या कोयी तुमच्या प्रयत्नांना मदत करू शकतात. राष्ट्रीय आरोग्य संस्था (NIH)ने प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, आफ्रिकन आंब्याच्या कोयींचा अर्क वजन कमी करण्यास आणि एकूण आरोग्य सुधारण्यास मदत करतो, असे दिसून आले आहे. आंब्याच्या कोयींची पावडर चयापचय वाढवते, असे मानले जाते; जी कॅलरीज कार्यक्षमतेने बर्न करण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे त्याची वजन कमी करण्यासाठी मदत होते.
२. रक्तशर्करेच्या नियंत्रणासाठी उपयुक्त
आंब्याची कोय रक्तातील साखरेची पातळीदेखील नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.द प्रोफेशनल मेडिकल जर्नलने केलेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, आंब्याच्या कोयींच्या अर्काने मधुमेही व्यक्तींनी रक्तातील साखरेची पातळी कमी केली. या अर्कामुळे इन्सुलिनची पातळी वाढते आणि HbA1c ची पातळी कमी होते, जी दीर्घकाळ रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवते. या निष्कर्षांवरून असे दिसून येते की, आंब्याच्या बियांचा अर्क नैसर्गिकरीत्या मधुमेह व्यवस्थापनास मदत करू शकतो.
३. त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर
आंब्याच्या कोयी चांगल्या अन चमकदार त्वचेसाठी योगदान देऊ शकतात. मल्टीडिसिप्लिनरी डिजिटल पब्लिशिंग इन्स्टिट्यूट (MDPI) प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, आंब्याच्या कोयींच्या पावडरच्या सेवनाने त्वचेवर लक्षणीय परिणाम झाला. तुमच्या आहारात आंब्याच्या कोयींच्या पावडरचा समावेश केल्याने तुमच्या त्वचेचे संरक्षण होण्यास आणि स्वच्छ, निरोगी दिसण्यास मदत होऊ शकते.
४. केसांच्या वाढीस प्रोत्साहन
त्वचेची काळजी घेण्याच्या फायद्यांव्यतिरिक्त, आंब्याच्या कोयी केसांच्या सुदृढ वाढीसदेखील मदत करतात. NIH च्या संशोधनातून असे दिसून आले आहे की आंब्याच्या कोयींचे तेल फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन ईने समृद्ध आहे, जे दोन्ही मजबूत, पोषणयुक्त केसांसाठी आवश्यक आहेत. हे तेल थेट टाळूला लावता येते किंवा पेस्ट किंवा हेअर मास्कमध्ये मिसळता येते. नियमित वापराने केसांची मुळे मजबूत होतात, त्यामुळे केस गळणे कमी होते आणि चमक वाढते.
५. हृदयाच्या आरोग्याला समर्थन
आंब्याच्या कोयींमध्ये उच्च पातळीचे अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असतात, जे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. जर्नल ऑफ अॅग्रीकल्चरल अँड फूड केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात पुष्टी झाली आहे की आंब्याच्या कोयींचा अर्क मजबूत अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म देतो. ही संयुगे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि हृदयरोगापासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात. तुमच्या आहारात आंब्याच्या कोयींचा समावेश करणे तुमच्या हृदयाला नैसर्गिकरीत्या आधार देण्याचा एक सोपा मार्ग ठरू शकतो.
तुमच्या आहारात आंब्याच्या कोयींचा वापर कसा करावा?
तुम्ही आंब्याच्या कोयी वाळवून, त्यांची बारीक पावडर बनवू शकता. दुसरा पर्याय म्हणजे आंब्याच्या वाळलेल्या कोयी गरम पाण्यात भिजवून, त्याचा हर्बल चहा बनवणे. तर, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही आंब्यांचा आनंद घ्याल तेव्हा त्या कचऱ्याच्या डब्यात टाकू नका. त्याऐवजी त्यांचा हुशारीने वापर करा आणि आंब्याच्या कोयींचा योग्य तो फायदा करून घ्या.