नवी दिल्ली : निद्रा ही सर्वासाठी महत्त्वाची असते. विशेषत: लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी निद्रेचे महत्त्व अधिकच असते. निद्रेमुळे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. पुरेशा झोपेअभावी मुलांच्या आकलनक्षमता, एकाग्रता, लक्ष देण्याच्या व शिकण्याच्या क्षमतेवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे मुले दिवसभर झोपाळू अवस्थेत-सुस्तीत राहतात किंवा अतिक्रियाशील (हायपरअॅक्टिव्ह) राहण्याची शक्यता असते. त्यांच्या वर्तनक्षमतेवर परिणाम होतो. अध्ययन क्षमतेवरही परिणाम होतो, असे तज्ज्ञ सांगतात.
पुरेशा झोपेअभावी मुलांत स्थूलत्व येऊ शकते. मोठेपणी मधुमेह, उच्च रक्तदाबाचा विकार होण्याची शक्यता असते. लवकर निजण्याची व लवकर उठण्याविषयी शाळेत शिकवले जाते. परंतु सध्या जीवनशैलीतील बदलामुळे व मोबाइल फोन-इतर इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे उशिरा झोपणे व उशिरा उठण्याची सवय मुलांना लागत आहे. ही सवय पूर्वी किशोरवयीन मुलांमध्ये दिसत होती. परंतु आता सर्व वयोगटांतील मुलांतही या चुकीच्या सवयी दिसत आहेत. जर त्यांना उशिरा झोपूनही लवकर उठावे लागले तर अपुऱ्या झोपेने होणारे दुष्परिणाम व ताणाला त्यांना तोंड द्यावे लागते. १४ ते १८ वयोगटात सरासरी नऊ-दहा तास झोपेची गरज असते.
चुकीच्या सवयींमुळे उशिरा झोपल्याने मुलांत विविध आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. टॉन्सिलची वाढ, अॅडेनॉईड ग्रंथींची वाढ, भयावह स्वप्ने, झोपेत चालायची आदी समस्या त्यांच्यात निर्माण होतात. सततच्या अपुऱ्या झोपेने फिट्सचा त्रास होण्याची जोखीम वाढते. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, झोपेच्या चांगल्या सवयी असणे किंवा ज्याला निद्रा आरोग्य (स्लीप हायजीन) म्हणतात ते खूप महत्त्वाचे आहे. मुलांसाठी नियमित झोपण्याची वेळ ठेवा आणि दररोज सकाळी त्यांना नेहमीच्या वेळीच उठवा. झोपण्याची आणि उठण्याची वेळ अंदाजे सारखीच असली पाहिजे आणि शाळेचे दिवस असो वा सुटीचे दिवस त्यांच्या निद्रेच्या सवयीत एक तासापेक्षा जास्त फरक नसावा, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.
