नवी दिल्ली : योग्य प्रमाणात पाणी पिणे महत्त्वाचे आहे. पाण्यामुळे शरीरातील तापमान नियंत्रित राहते. त्यामुळे शरीरातील विषद्रव्ये व नको असलेले घटक मूत्रिपडाद्वारे बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे लाळनिर्मिती होते. शरीराच्या विविध अवयवांना पूरक पोषक घटक पाण्यामुळे मिळू शकतात. पण आहारतज्ज्ञांच्या मते पाणी पिण्याची योग्य वेळ असते. त्या वेळी ते प्यायल्यास त्याचे लाभ मिळतात.

जेवताना पाणी पिऊ नये. जेवताना अगदी पेलाभर पाणी प्यायले तरी आपली पचनशक्ती घटते. त्यामुळे इन्शुलिनचा स्तर लक्षणीयरीत्या घटतो. जेवताना अगदी घोटभर पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. जेवणानंतर तासाभराने पाणी प्यावे. तोपर्यंत आपण घेतलेल्या आहारातील पोषणद्रव्ये शरीराने शोषून घेतलेली असतात. सकाळी उठल्यानंतर पेलाभर पाणी प्यावे. त्यामुळे सुस्ती जाते. रोगप्रतिकारक शक्ती वाढून आजार पळतात. दुपारी थकवा घालवण्यासाठी किमान पेलाभर पाणी प्यावे. निर्जलीकरणामुळे दुपारची सुस्ती आलेली असते. पाणी पिण्यामुळे थकव्यासह इतर नको असलेली लक्षणेही निघून जातात.

पाणी नेहमी बसून प्यावे. पाणी उभे राहून प्यायल्याने मूत्रिपडांवर दुष्परिणाम होतो. संधिवातालाही निमंत्रण मिळते. बसून पाणी प्यायल्याने शरीराला त्यातील आवश्यक घटक शोषून घेऊन आवश्यक त्या अवयवांत पोहोचवणे सोपे जाते. उभे राहून पाणी प्यायल्याने ते थेट पोटात वेगात जाते. त्याचा पुरेसा लाभ मिळत नाही. उभे राहून गटागटा पाणी प्यायल्याने संबंधित नसांवर ताण येतो. त्यामुळे ते बसून छोटे घोट घेत प्यावे. एका वेळी शरीराच्या गरजेइतपत पाणी प्या. खूप पाणी एकाच वेळी प्यायल्याने पोट गच्च होऊन अस्वस्थता येते. चांगली त्वचा, आरोग्यप्रतिकारक शक्ती आणि पचनक्षमतेसाठी आपल्याला खूप नव्हे तर पुरेशा पाण्याची गरज असते. आपल्या शरीराची गरज ओळखा. त्याला पाण्याची कधी गरज लागते हे तुम्हालाच समजेल व त्या वेळी योग्य प्रमाणात पाणी पिण्याची सवय लागेल, असे तज्ज्ञ सांगतात.