नवी दिल्ली : सतत थकवा, केसगळती आणि ठिसूळ नखे अशी लक्षणे दिसत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. यासह खाद्यपदार्थ नसलेल्या काही गोष्टी आपल्याला खाव्याशा वाटत असतील, तर शरीरात लोहाची कमतरता असण्याची मोठी शक्यता असते.

हिमोग्लोबिन निर्मितीसाठी लोहाची शरीराला आवश्यकता असते. हिमोग्लोबिनमुळे रक्ताद्वारे संपूर्ण शरीरात प्राणवायू पोहोचवता येतो. लोहाच्या कमतरतेचा विकार सर्वसामान्यपणे आढळतो. त्यामुळे वरील शारीरिक लक्षणांशिवाय खडू, कच्चा तांदूळ, डिर्टजट असले अखाद्य पदार्थ खावेसे वाटू लागतात, असे आहारतज्ज्ञ सांगतात. आपण जे खातो, पचवतो त्याप्रमाणे आपले शरीर घडते.  आपल्या शरीरात ‘नॉन-हेम’ आणि ‘हेम’ असे दोन प्रकारचे लोहघटक असतात. ‘नॉन-हेम’ लोहघटक हे आपल्याला शाकाहारातून मिळतात. या प्रकारचे घटक अस्थिर असतात. ते  विविध आहारघटक व आपल्या पचनक्षमतेनुसार दोन ते २० टक्के शोषले जातात. ‘हेम’ लोहघटक आपल्या प्राणिजन्य पदार्थातून मिळतात. यांचे शरीरात शोषले जाण्याचे प्रमाण तुलनेने जास्त म्हणजे १५ ते ३५ टक्के आहे. तज्ज्ञांच्या मते लोहघटक कमी प्रमाणात शोषले जाण्याची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अन्नासह चहा, कॉफी, ग्रीन टी यांसारख्या कॅफिनयुक्त पेयामुळे लोहघटक शोषले जाण्याच्या प्रक्रियेत अडथळे येतात. कॅफिन, टॅनिन आणि पॉलिफेनॉल हे लोहघटकासह एकत्र आल्यास ते शरीराद्वारे शोषले जाणे कठीण असते. शाकाहारातील ‘नॉन-हेम’ लोहघटकांबाबतीत ही शक्यता जास्त असल्याने शाकाहारींमध्ये लोहघटकांची कमतरता असण्याचे प्रमाण जास्त असण्याची जोखीम असते. भोजनातील आहारामधील लोहघटक शरीरात नीट शोषले जाण्यासाठी दोन जेवणांदरम्यानच्या काळात जेवणानंतर तासाभराच्या अंतराने चहा-कॉफी प्यावी, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. क जीवनसत्त्वयुक्त घटक लोहयुक्त जेवणात मिसळून आहारसेवन केल्यास भोजनातील लोहघटक शोषले जाण्यास मदत होते. काही जणांत पचनक्षमताच क्षीण असते. त्यामुळे लोहघटकांचे शोषण होऊ शकत नाही. सेलिअ‍ॅक विकार किंवा पचनक्रियेतील दोष, आतडय़ांच्या विकारांमुळे लोहघटक शोषले जाण्यात अडथळे निर्मा होतात. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आहारामध्ये लोहघटकांचा अभाव असणे किंवा त्याची कमतरता असल्याने लोहघटक शरीराला मिळूच शकत नाहीत. गर्भवती महिला किंवा मासिकपाळीत जास्त रक्तस्त्राव होत असलेल्या स्त्रिया, मुले व सर्वसाधारणपणे शाकाहारी व्यक्तींत लोहघटकांची कमतरता असण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी लोहघटकयुक्त आहार, लोहघटक पूरक गोळय़ा तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेऊन या कमतरतेवर मात करता येते. जर आपल्यात लोहघटकांची कमतरता असेल, तर कॅफेनयुक्त पेय, अन्य घटकांचे सेवन करणे कमी करावे. तसेच दर सहा महिन्यांनी शरीरातील लोहघटकांचे प्रमाण तपासून घ्यावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.