Healthy Heart: उत्तम आरोग्यासाठी झोप ही सर्वात महत्त्वाची असते. रात्रीच्या उत्तम झोपेननंतर पूर्ण दिवस आनंदात जातो. तुमचा दृष्टिकोन सकारात्मक होऊन मन व लक्ष केंद्रित राहण्यसास मदत होते. केवळ मानसिकच नव्हे तर झोपेचे शारीरिक फायदेही भरपूर आहेत. तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, उत्तम त्वचेसाठी उत्तम झोप गरजेची असते. अनेकदा खूप थकल्यावरही आपल्याला पटकन झोप लागत नाही याची अनेक कारणे असू शकतात. आज आपण अशी ५ सोप्पी कामे पाहणार आहोत जी रात्री १० नंतर करणे टाळल्यास तुम्हाला बेडवर पडल्या पडल्या झोप लागू शकते. चला तर मग…
रात्री १० नंतर ही कामे टाळाच
झोपेचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांच्या माहितीनुसार रात्री १० नंतर म्हणजेच झोपण्याच्या वेळेत तुम्ही फोन पाहिल्यास मेंदू अधिक सक्रिय होऊ शकतो. आपल्या शरीरात कोर्टिसोल व मेलाटोनिन हार्मोन हे मेंदूला झोपण्याचे संकेत देतात. जेव्हा तुम्ही फोनचा वापर करता इव्हा त्यातील फ्लोरोसेंट आणि एलईडी लाइट्स या प्रक्रियेत अडथळा आणतात. यामुळेच झोप लागत नाही. सोप्प्या भाषेत सांगायचं तर, तुम्ही फोनमध्ये जे पाहता ते तुमच्या मेंदूत साठवलं जातं, झोपण्याच्या आधी फोन पाहिल्यास ही प्रक्रिया मेंदूमध्ये सुरु असते त्यामुळे झोपेचे संकेत शरीराला मिळतच नाहीत. म्हणून निदान अर्धा तास आधी फोन पाहणे किंवा नवीन माहिती डोक्यात टाकणे टाळावे.
व्यायाम करू नये
व्यायामाने शरीर थकून पटकन झोप लागेल असा काहींचा समज असतो. पण हे चुकीचे आहे आपण व्यायाम करताना शरीरात रक्तप्रवाहाचा वेग वाढतो यामुळे अवयव अधिक सक्रिय होतात. म्हणूनच झोपण्याच्या आधी व जेवल्याच्या नंतर काही वेळ व्यायाम टाळावा.
आठवड्यात किती काम करावे?
काहींना तहान भूक हरपून काम करण्याची सवय लागते पण असे करणे तुमच्या कामावरच विपरीत परिणाम करू शकते. एका अहवालात प्राप्त माहितीनुसार आठवड्याभरात ५५ तासांहून अधिक काम केल्यास मेंदू थकायला सुरुवात होते. यामुळेच हृदय रोगासह मृत्यूचा धोका वाढू शकतो. शक्य झाल्यास रात्रीच्या जेवणानंतर डोक्याचे काम करणे टाळावे.
शरीर डिटॉक्स करा
झोपण्याआधी निदान काही तास शरीराची डिटॉक्स प्रक्रिया होणे गरजेचे आहे. चहा व कॉफी ही उत्तेजक पेय आहेत यामुळे शरीर सक्रिय होतं. यामुळे झोपेच्या चक्रात बाधा होऊ शकते. यामुळे झोपेच्या तीन तास आधीपर्यंत कॉफीचे सेवन टाळावे. शक्य असल्यास पाणी प्या व चघळून खाण्याचे एखादे फळ किंवा मुखवास खाऊ शकता.
हे ही वाचा<< आज रात्री लहान बाळासारखी झोप घ्या; झोपेचा ‘१०-३-२-१-०’ नियम काय सांगतो पाहा
रात्री काय व किती खावे?
रात्री तुम्ही पचनास जड अन्नाचे सेवन केल्यास शरीराची पचनप्रक्रिया अधिक काळ सुरु राहते. उच्च कॅलरी असणारे पदार्थ हे पचायला जड असतात. रात्रीच्या वेळी भुकेपेक्षा १० टक्के कमी खावे.
(टीप: निद्रानाशाचा त्रास असल्यास वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा)