नवी दिल्ली : पोषक तत्त्व मुबलक प्रमाणात असल्याने अनेक जण आहारात चिकनचा अवश्य समावेश करतात. परंतु एका नव्या संशोधनानंतर या आहाराबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. चिकनच्या आहारामुळे पोषक तत्त्वाबरोबरच प्लास्टिकचा अंशही शरीरात जातो, असे या संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
कोंबडीच्या भ्रूणामध्ये नॅनॉ प्लास्टिक : नेदरलँडमधील लायडन विद्यापीठाचे जैवशास्त्राज्ञ मीरू वांग यांनी यासंबंधी संशोधन केले. ते ‘इन्व्हायर्नमेंट इंटरनॅशनल’मध्ये प्रकाशित झाले आहे. यानुसार कोंबडीच्या भ्रूणामध्ये नॅनोप्लास्टिक सापडले. या पार्श्वभूमीवर संशोधकांनी चिंता व्यक्त केली असून मानवी शरीरावर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली. मीरू वांग यांनी ‘फ्लोरोसेंट मायक्रोस्कोप’ खाली भ्रूणाची तपासणी केली. यावेळी चकमणारे प्लास्टिकचे कण आढळले.
विकासात अडथळा : संशोधनानुसार प्लास्टिक कण सापडलेल्या भ्रूणांचा विकास अन्य भ्रूणांच्या तुलनेने कमी वेगाने झाला. तसेच त्यांच्या अवयवांवरही परिणाम दिसून आला.
धोक्याचा इशारा : आहाराच्या माध्यमातून प्लास्टिक कण मानवी शरीरात गेले तर त्याचा गंभीर परिणाम हृदय, मूत्रिपड, यकृतावर होऊ शकतो. तसेच फुप्फुस खराब होण्याचा आणि रक्तसंक्रमणाचाही धोका आहे.