लहान मुलांना कार्टून पाहायला प्रचंड आवडते. मुलांना नवीन गोष्टी शिकवणे, त्यांच्या ज्ञानात भर टाकणे आणि मनोरंजन करण्याच्या हेतूने विविध प्रकारचे कार्टून्स तयार केले जातात. यापैकी काही कार्टून मुलांसाठी “सकारात्मक” संदेश देणारे, सुरक्षित, नवीन गोष्टी शिकवणारे आणि शैक्षणिक ज्ञान वाढवणारे असतात. पण, हे कार्टून मुलांची भावनिक वाढ, लक्ष वेधण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता कमी करू शकतात का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे की, “प्रसिद्ध कार्टून जसे की, ‘पेप्पा पिग’ आणि ‘कोको मेलन’ यांचा वापर पालक मुलांना शांत करण्यासाठी, मुलांना जेवण भरवताना लक्ष विचलित करण्यासाठी करतात; पण त्यामुळे मुलांची सहानुभूती, कल्पनाशक्ती आणि संवाद कौशल्य हिरावून घेतले जात आहे.

JAMA नेटवर्कमध्ये प्रकाशित झालेल्या जपानी अभ्यासात असे आढळून आले आहे की, “एक वर्षाच्या मुलांमध्ये जास्त वेळ स्क्रीनकडे पाहणाचा संबंध, २ ते ४ वयोगटादरम्यान संवाद साधण्याच्या आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेच्या विकासास उशीर होण्याशी जोडला जात आहे”, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे? असा प्रश्न उपस्थित होतो.

याबाबत इंडियन एक्स्प्रेसबरोबर संवाद साधताना दिल्ली ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), मानसोपचार विभागाचे प्राध्यापक डॉ. राजेश सागर सांगतात की, “कार्टून कितीही माहिती देणारे किंवा मन गुंतवणारे असले तरी जास्त वेळ स्क्रीनकडे पाहत राहणे किंवा त्याचा अतिवापर करणे तुमच्या मुलांना ‘zombie’ बनवू शकते, ज्यामुळे त्यांच्या झोपेवर आणि आहाराच्या पद्धतींवर परिणाम होतो. तसेच त्यांच्या रडण्याची तीव्रता वाढते आणि पालकांच्या सुचनांचे पालन करण्याचा हट्टीपणा वाढतो. खरं तर लहान मुले तीन वर्षांची होईपर्यंत डिजिटल उपकरणांच्या संपर्कात येऊ नयेत. जेव्हा मुले ऑनलाइन अधिक वेळ घालवतात, तेव्हा त्यांचे थेट संवाद कौशल्य कमी होते, भावनिक बुद्धिमत्ता आणि प्रत्यक्षात दृढ आणि अर्थपूर्ण नातेसंबंध तयार करण्याची क्षमता कमी होते.”

मुलांच्या वर्तणुकीत होणाऱ्या बदलांकडे लक्ष द्या?

डॉ. राजेश सागर यांनी सांगितले की, “आमच्याकडे पालकांच्या तक्रारी येतात की, लहान मुलांना फोन किंवा उपकरणांचे इतके व्यसन लागले आहे की, ते इतर कोणत्याही उपक्रमांमध्ये भाग घेण्यास नकार देतात आणि मुलं प्रचंड वाद घालत असल्यामुळे पालकांना मोबाइल फोन देण्याशिवाय काही पर्याय नसतो. अनेक त्रासलेले पालक मुलांच्या टोकाच्या व्यसनाधीन वागणुकीबाबत तक्रार करतात. मुलांमध्ये लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी असेल किंवा मुलांच्या विकासाच्या टप्प्यांमध्ये विलंब होत असेल, अशा मुलांकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. मुलं जर स्वत: हाताने चित्र काढत असतील किंवा प्रयत्न करून कोडी सोडवत असतील, तर त्यांच्या मनाचा विकास होतो, पण ही संधी ‘टॅबलेट’ ‘मोबाइल’ मुलांना देत नाही.”

स्क्रीन टाइममुळे लक्ष केंद्रित करण्याचा कालावधी कसा कमी होतो?
यात काही शंका नाही की मन गुंतवून ठेवणारा आशय हा अल्प कालावधीमध्ये लक्ष सुधारण्यासाठी मदत करतो; परंतु दीर्घ काळापर्यंत अशा प्रकारे सातत्याने वागल्यामुळे अशा पर्यायांवर अवलंबून राहणे वाढते आणि स्वतःचे विचार करण्यास किंवा स्वत: कोणतीही प्रक्रिया करण्याची क्षमता कमी करते.

पालकांनी काय लक्षात ठेवावे?

पालकांनी हे समजून घेतले पाहिजे की, मुलांनी त्यांच्या पालकांकडे त्यांच्या जीवनाचे प्रथम आदर्श व्यक्ती म्हणून पाहिले पाहिजे आणि तुम्ही मुलांना स्वतःपासून दूर ठेवत आहे किंवा मुलांना दूर ठेवण्यासाठी सहज उपलब्ध असलेला मार्ग वापरत आहात असे त्यांना कधीही वाटू देऊ नका. मुलांना स्वत:पासून दूर ठेवण्यासाठी पालक गेम डिव्हाइस देतात, कारण गेम डिव्‍हाइस ही लहान मुले सहज वापरू शकतील अशी सर्वात सोपी गोष्ट आहे, जे वापरून पालक काही वेळासाठी मुलांना स्वत:पासून दूर ठेवतात; पण असे करू नका. मुलांसाठी आरामदायक आणि अनुकूल वातावरण तयार करा, म्हणजे तुम्ही त्यांच्या सर्व गोष्टींमध्ये सामील व्हा आणि त्यांच्या चांगल्या वागणुकीला प्रोत्साहन द्या. ही एक त्वरीत समस्या सोडवण्याऐवजी एक मोठी प्रक्रिया आहे, जी बहुतेक पालक शोधत असतात.

कार्टून शो मुलांची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता हिरावून घेतात का?

होय, कार्टून शो मुलांची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता हिरावून घेतात. तुमच्या हातात रिमोट कंट्रोल असेल जो तुमचा पाहण्याचा अनुभव बदलण्याची ताकद देतो हे तुम्हाला माहीत असेल, तर तुम्हाला सहज कंटाळा येतो आणि तुम्ही नेहमीच नवीन काहीतरी शोधत राहता आणि तुम्हाला समाधान मिळेल असा पर्याय शोधू लागता. त्यामुळे डिजिटल उपकरण मुलाला सहजतेने आकर्षित करू शकतात. परंतु, त्यामुळे कालांतराने मुलांची लक्ष वेधून घेण्याची क्षमता कमी होईल, ज्यामुळे त्यांची प्रक्रिया करण्याची आणि निवड करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. मूल भावनांच्या आहारी जाते आणि आक्रमक होते.

हेही वाचा – ब्लॅक कॉफी प्यायल्याने शरीरातील फॅट्स कमी होण्यास मदत होते का? संशोधनाबाबत काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेवटी पालकांची संरक्षण करण्याची शक्ती ही अशा धोकादायक घटकांपेक्षा जास्त असली पाहिजे. तुम्ही एखाद्या मुलाचे डिव्हाइसेसचा वापर पूर्णपणे बंद करू शकत नाही किंवा त्यांना शैक्षणिक कार्टून शो पाहणे बंद करू शकत नाही, परंतु कोणताही प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी तुम्ही त्यात छोटे छोटे अडथळे निर्माण करू शकता आणि मुलांना आधार देऊ शकता.