Sleeping pills : झोप ही निरोगी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.. ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा असतात त्याचप्रमाणे झोप ही शरीराची मुलभूत गरज आहे. चांगल्या झोपेमुळे मेंदू आणि शरीराला विश्रांती मिळते. उत्तम आरोग्य पाहिजे असेल तर झोप ही खूप महत्त्वाची आहे. आजकाल कामाच्या धावपळीत अनेक जण आरोग्याकडे लक्ष देत नाही. विशेषत: पुरेपूर झोप घेत नाही. काही लोकांना रात्रीची शांत झोप लागत नाही अशावेळी हे लोक झोपेच्या गोळ्या सुद्धा घेतात. ज्या लोकांना पुरेशी झोप न मिळणे, निद्रानाश किंवा इतर झोपेच्या समस्यांना सामोरे जावे लागते ते अनेकदा झोपेच्या गोळ्या घेतात .

खरं तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेच्या गोळ्या घेऊ नयेत पण हल्ली तरुणाईमध्ये झोपेच्या गोळ्या घेण्याचे प्रमाण वाढले आहे. चुकीची जीवनशैली, बिघडलेले वेळापत्रक, मानसिक तणाव यारखे अनेक कारणांमुळे झोपेची समस्या जाणवू शकते. तुमचा मुलगा किंवा मुलगी तुमच्या नकळत झोपेच्या गोळ्या घेतात का? खरंच झोपेच्या गोळ्या घेणे कितपत चांगले आहे? त्याचे चांगले वाईट परिणाम काय आहेत? या संदर्भात मेंदू व मज्जारज्जू शल्यचिकित्सक डॉ. सुमित पवार यांनी लोकसत्ताशी संवाद साधताना सविस्तर माहिती सांगितली आहे.

तरुणाईमध्ये झोपेच्या गोळ्या घेण्याचे प्रमाण का वाढत आहे?

डॉ. सुमित पवार : आजकाल धावपळीच्या जीवनात प्रत्येकाच्या आयुष्यात तणाव खूप वाढला आहे. अनेकांचे वेळापत्रक चुकत आहे. अशा लोकांना झोपेच्या समस्या येतात आणि याविषयी जाणून घेण्याची त्यांची तयारी नसते की आपल्याला झोप का येत नाही. त्यांना फक्त सोपा मार्ग पाहिजे असतो. सोपा मार्ग शोधणारी ही पिढी आहे. दुर्दैवाने अनेक मेडिकल स्टोअर सरकारचे नियम तितक्या गंभीरतेने पाळत नाही. एखादी व्यक्ती मेडिकल स्टोअरमध्ये जाते आणि सांगते की मला झोप येत नाही त्यामुळे झोपेच्या गोळ्या द्या आणि ओळखीचा किंवा जवळचा मेडिकलवाला असेल तर तो लगेच विचार न करता गोळ्या देतो.आज गोळी घेतली, झोप लागली; आता माझं काम झालं, असा विचार ती व्यक्ती करतात. परत पुढच्या वेळी त्रास होतो, परत तणाव वाढतो आणि ती व्यक्ती पुन्हा गोळ्या घेते. हा एक सोपी मार्ग आहे. मुळ समस्या काय आहे आणि झोप का येत नाही, हे समजून घेणे त्यांना महत्त्वाचं वाटत नाही.

झोपेच्या गोळ्या घेतल्यामुळे आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात?

डॉ. सुमित पवार : झोपेच्या गोळ्या या खास मेंदूसाठी असतात पण या गोळ्यांचा शरीरावर दीर्घकाळ परिणाम दिसून येतो. त्यामुळे गोळ्या घेतल्यानंतर तुम्हाला दिवसा सुद्धा झोप लागू शकते. एक आणि दोन आठवडा सतत गोळ्या घेतल्या आणि त्यानंतर बंद केल्या तर तुम्हाला त्या गोळ्यांची इतकी सवय होते की त्याशिवाय तुम्हाला झोप येत नाही त्यामुळे गोळ्यांवर अवलंबून राहण्याची मानसिकता वाढते. काम करण्याचा कंटाळा येतो किंवा आळस येतो. (कारखान्यात) काम करताना मोठ्या मशीन वापरत असाल किंवा जे पायलट असतात, त्यांच्यासाठी झोपेच्या गोळ्या घेणे हे खूप धोकादायक ठरू शकते. याशिवाय लैंगिक कार्यक्षमतेवर सुद्धा झोपेच्या गोळ्यांचा दुष्परिणाम दिसून येतो.

झोपेच्या गोळ्या घेतल्यामुळे नैराश्य येते का?

डॉ. सुमित पवार : अनेकदा नैराश्यामुळे झोप येत नाही. जर आपण नैराश्यावर योग्य तो उपचार केला नाही तर त्याचा झोपेवर परिणाम होतो. एवढंच काय तर काही लोक आत्महत्या करतात. झोपेच्या गोळ्या घेतल्यामुळे तुम्हाला नैराश्य येणार नाही पण नैराश्यात असताना गोळ्या घेतल्या तर नैराश्यातून तुम्ही बाहेर सुद्धा पडू शकत नाही.

हेही वाचा : तुम्ही १४ दिवस मेथीचे दाणे खाल्ले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…

झोपेच्या गोळ्या घेतल्यानंतर मानसिक थकवा दूर होतो का?

डॉ. सुमित पवार : झोपेच्या गोळ्या घेतल्यानंतर तुम्हाला झोप लागते पण तुम्हाला फ्रेश वाटणारी ती झोप नसते. झोपेच्या गोळ्यांमुळे तुम्हाला दर्जेदार झोप मिळणार नाही. अस्थमा, गुडघेदुखी, पाठदुखी या समस्यांमुळे जर तुम्हाला झोप लागत नाही पण लक्षात ठेवा जो पर्यंत तुम्ही या आजारांवर उपाचार घेत नाही तोपर्यंत तुम्हाला दर्जेदार झोप लागणार नाही. भारतापेक्षा अमेरिकेत झोपेच्या गोळ्या घेण्याचे प्रकार खूप जास्त दिसून येतात कारण कारण त्या लोकांमध्ये सहनशीलता खूप कमी आहे.

झोपेच्या गोळ्यांचा डोस किती महत्त्वाचा आहे?

डॉ. सुमित पवार : तुम्ही किती डोस घेता हे जर तुम्हाला माहिती नाही, तरच हे खूप गंभीर बाब आहे. एखादा रुग्णाला ०.२५ किंवा ०.५ मिलीग्रॅमची झोपेची गोळी द्यायची आहे आणि त्याने २ मिलीग्रॅमची गोळी घेतली तर त्याचा शरीरावर दुष्परिणाम दिसू शकतो.

कोणी झोपेच्या गोळ्या घेऊ नये?

डॉ. सुमित पवार : जर तुम्हाला अस्थमा, सीओपीडी किंवा ब्राँकायटिस सारखा आजार असेल आणि तुम्ही झोपेच्या गोळ्या घेतल्या तर त्यांना थेट आयसीयुमध्ये भरती करण्याची वेळ येऊ शकते. कारण जेव्हा हे लोक झोपेच्या गोळ्या घेतात त्यानंतर त्यांना श्वास घेण्यास अडचण येते. आम्हाला माहिती असते की काही आजारामध्ये रुग्ण झोपेच्या गोळ्या घेऊ शकत नाही पण हे रुग्णांना माहिती नसते आणि अशावेळी त्यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्या तर त्यांचा गंभीर परिणाम दिसून येतो.

झोपेच्या गोळ्या घेणाऱ्या तरुणाईला काय सांगाल?

डॉ. सुमित पवार : सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जावे आणि झोप का येत नाही या मागील कारण समजून घेणे गरजेचे आहे. जर त्यामागील कारण ताण तणाव असेल किंवा तुम्ही जे काम करताय, त्यामुळे तुम्हाला झोप येत नसेल तर तुम्हाला परिस्थिती हाताळता आली पाहिजे. झोपेच्या समस्यासाठी ध्यान हे अव्वल क्रमांकाचा उपाय आहे. मोबाईल – लॅपटॉप किंवा टिव्ही सारख्या स्क्रिनकडे पाहण्याचा वेळ कमी करा. त्याऐवजी व्यायाम वाढवा. त्यामुळे तुम्हाला झोप चांगली येईल. कारण शारीरिक थकवा आला तर तुम्हाला चांगली झोप येईल. रात्री नऊ नंतर कोणत्याही प्रकारची स्क्रिन पाहणे बंद केली पाहिजे. मोबाईलमधील ब्लू लाइट फिल्टर आपल्या मेंदूला सक्रिय ठेवतो ज्यामुळे आपल्याला झोप येत नाही.याशिवाय रात्री नऊ नंतर कोणत्याही प्रकारचे द्रव पदार्थांचे सेवन करू नये, उदा. चहा किंवा कॉफी घेऊ नये. मद्यपान सुद्धा करू नये. मद्यपानामुळे झोप येते पण ती दर्जेदार झोप नसते त्यामुळे वारंवार जाग येते.