Brain Stroke Risk Factors: सध्याची बिघडलेली जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि झोपेचा अभाव यामुळे विविध आजारांचा धोका वाढला आहे. या परिस्थितीत स्ट्रोक लोकांसाठी एक मोठा धोका आहे. दरवर्षी लाखो लोकांना स्ट्रोकचा त्रास होतो आणि अनेकांचा मृत्यू होतो. बऱ्याच लोकांचा असा समज आहे की, वेळीच खबरदारी घेतल्यास ही धोकादायक स्थिती टाळता येऊ शकते. स्ट्रोकचा धोका वाढवणारे चार मुख्य घटक आणि लोकांनी कोणत्या परिस्थितीत ते टाळले पाहिजेत ते जाणून घेऊ…

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाब हे स्ट्रोकचे सर्वात सामान्य कारण मानलं जातं. काण सतत उच्च रक्तदाब मेंदूच्या नसांवर दबाव आणतो. जेव्हा हा दाब खूप जास्त होतो तेव्हा नसा फुटू शकतात. त्यामुळे रक्तस्त्राव होतो. अनेक लोकांमध्ये उच्च रक्तदाब बहुतेकदा कोणत्याही लक्षणांशिवाय विकसित होतो, म्हणूनच त्याला सायलेंट किलर म्हणतात. उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी नियमित रक्तदाब तपासणी अत्यंत महत्त्वाची असते आणि अशा लोकांनी डॉक्टरांच्या सांगण्यानुसारच औषधे घ्यावीत.

चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी

आजच्या धावपळीच्या जीवनात लोक फास्ट फूड, जंक फूड आणि जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थांवर अवलंबून आहेत. या पदार्थांमध्ये असलेले ट्रान्स फॅट आणि कोलेस्ट्रॉल नसांमध्ये चरबी जमा करतात. त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो आणि स्ट्रोकचा धोका लक्षणीयरित्या वाढतो. रात्री उशिरापर्यंत जागणे, ८ ते ९ तास झोप न घेणे आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे हा धोका आणखी वाढतो.

धूम्रपान आणि मद्यपान

सध्या बरेच तरूण खूप लहान वयापासूनच धूम्रपान आणि मद्यपान करू लागतात. याचा त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. लहान वयातच त्यांना स्ट्रोकसारखे गंभीर धोके होऊ शकतात. सिगारेटचा धूर शरीराच्या नसा कमकुवत करतो आणि रक्त जाड करतो. त्यामुळे ब्लॉकेजचा धोका वाढतो. दारूमुळे रक्तदाब देखील वाढतो. या दोन्ही सवयी हळूहळू शरीराला आतून कमकुवत करतात.

ताण आणि मानसिक दबाव

बरेच लोक सतत तणावाखाली असतात. त्यामुळे शरीरातील कॉर्टिसोल हार्मोन वाढतो. परिणामी रक्तदाब आणि साखरेची पातळी दोन्ही प्रभावित होते. दीर्घकालीन ताणतणाव असलेल्या लोकांना स्ट्रोकचा धोका जास्त असतो. म्हणूनच शरीरासोबतच मनालाही आराम देणे तणावमुक्त राहणे महत्त्वाचे आहे.