Homemade natural paste for teeth: दातांमध्ये खूप वेदना होणं, हिरड्यांना सूज येणं किंवा रक्त येणं, दातांचा पिवळेपणा अशा समस्या तुम्हाला सतावतात का? तोंडातून येणारी दुर्गंधी, दातांचा पिवळेपणा एवढा होतो की चारचौघात हसणं कठीण होऊन जातं? या सर्व समस्यांवर एक जालीम उपाय आहे तो म्हणजे तुम्ही खास घरगुती पद्धतीने तयार केलेली हर्बल पेस्ट वापरणं. दातांच्या असंख्य समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला कॉस्मेटिक टुथपेस्ट, माउथवॉश आणि ब्रश बदलण्याची गरज नाही. उलट तुम्ही एका नॅचरल पेस्टचा वापर करा. ही घरीच तयार केलेली पेस्ट तुमच्या दातांना मजबूत तर करेलच आणि दातांसंबंधित सर्व समस्या दूर करण्यास मदत करेल.
याबाबत डॉ. समीर भूषण यांनी सांगितले की, समस्या फक्त तोंडापर्यंत मर्यादित नाही. कारण दातांनी तुम्हाला अन्न व्यवस्थित चावता आले तर त्याचे पचन योग्यरितीने होईल. पचन न झाल्यास डोकेदुखी, गॅस, अॅसिडिटी आणि थकवा या समस्या नव्याने उद्भवतील. ओरल हेल्थ चांगली असल्यास त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरही होतो. तुम्हाला जर हिरड्या आणि दातांच्या समस्यांवर उपाय करायचा असेल तर या नॅचरल पेस्टचा उपयोग तुम्ही नक्की करा.
दातांच्या आरोग्यासाठी लवंग, हळद, जाडं मीठ, मोहरीचं तेल, कडुनिंबाचा पाला याचं एकत्रित मिश्रण तयार करून एक पेस्ट बनवली, तर दात आणि हिरड्यांसाठी ती योग्य उपाय ठरते. ही पेस्ट नेमकी कशी तयार करावी हे जाणून घ्या…
हर्बल पावडरसाठीचे साहित्य
लवंगची पावडर एक चमचा
हळद अर्धा चमचा
जाडं मीठ अर्धा चमचा
मोहरीचं तेल दोन चमचे
कडुनिंबाच्या पाल्याची पावडर अर्धा चमचा
कृती- वरील सर्व साहित्य रात्री झोपण्याआधी एकत्र करून घ्या. सकाळी तयार असलेली ही पेस्ट बोटाच्या साहाय्याने हिरड्यांवर, दातांवर वापरा. कमीतकमी दोन मिनिटं या पेस्टने मसाज करा. मसाज केल्यानंतर कोमट पाण्याने चूळ करा. या पेस्टने दातांवर मसाज केल्याने दातांचं दुखणं गायब होऊन जाईल. दातांसंबंधित काही मोठी समस्या असेल तर पाण्यात लवंग टाकून उकळून घ्यावे आणि या पाण्याने दिवसातून दोनवेळा चूळ भरा. या हर्बल पेस्टचा वापर केल्याने हिरड्यांमधून रक्त येणे, दातांवर चमक येणे आणि तुमची ओरल हेल्थ नक्की सुधारेल.
याचे फायदे काय?
लवंगमधील युजेनॉल दातांचं दुखणं थांबवतं. यामुळे बॅक्टेरिया आणि फंगसपासून बचाव करते. हळदीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गणधर्म असल्याने सूज आणि वेदना नियंत्रित होतात. हळदीत अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म असतात. यामुळे इंफेक्शनपासून बचाव होतो. मीठामुळे दाताचा पिवळेपणा दूर होतो. मोहरीच्या तेलामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढते. तसंच दातांची चमक वाढते आणि पिवळेपणा दूर होतो. कडुनिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल गणधर्म असतात, जे दात किडण्यापासून बचाव करतात.