Coconut Water Health Benefits: नारळपाणी पिणं आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे काही जण ते दररोज पितात. पण जर तुम्ही ते आठवड्यातून फक्त चार दिवस प्यायले तर काय होईल; ते पिणं आरोग्यासाठी योग्य आहे का? हे आपण या बातमीच्या माध्यामातून जाणून घेऊ
“आठवड्यातून तीन ते चार वेळा नारळपाणी प्ययाल्याने तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास, मूत्रपिंडांच्या कार्याला चालना देण्यास आणि पचनास मदत होण्यास मदत होते . त्यात नैसर्गिकरीत्या पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि पोटफुगी कमी करण्यास मदत करते. त्यामुळे तुम्हाला अधिक ऊर्जावान वाटू शकते, असे ठाणे येथील किम्स हॉस्पिटल्सच्या मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. गुलनाज शेख म्हणाल्या.
डॉ. शेख यांच्या मते, आठवड्यातून तीन ते चार वेळा नारळपाणी पिणे बहुतेक लोकांसाठी पुरेसे आहे. “जर तुम्ही सक्रिय असाल, तुम्हाला खूप घाम येत असेल किंवा आजारातून बरे होत असाल, तर दररोज नारळपाणी प्यायल्याने शरीराने गमावलेले द्रव आणि इलेक्ट्रोलाइट्स भरून निघण्यास मदत होऊ शकते. परंतु, सरासरी निरोगी व्यक्तीसाठी नारळपाणी आठवड्यातून चार वेळा पिणे हे चांगले प्रमाण आहे,” असे डॉ. शेख म्हणाल्या.
तुम्ही किती प्यायला हवे?
बहुतेक लोकांसाठी एका वेळी सुमारे १५० ते २०० मिली नारळपाणी पुरेसे असते. “एका मध्यम आकाराच्या नारळात साधारणपणे तेवढेच प्रमाण असते. तुम्हाला जास्त पिण्याची गरज नाही; जास्त प्यायल्याने ते जास्त फायदा देईल, असे काहीही नाही,” असे शेख म्हणाल्या.
नारळपाणी पिण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?
सकाळी किंवा व्यायामानंतरची वेळ नारळपाणी पिण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. “हे पचायला हलके आहे आणि हायड्रेशन सुरू करण्यास मदत करते. जर तुम्हाला वारंवार लघवीला जावे लागत असेल, तर रात्री उशिरा ते पिणे टाळा.”
उच्च रक्तदाब असलेले लोक, डिहायड्रेशनचा धोका असलेले लोक आणि खेळाडू सर्वांना याचा फायदा होऊ शकतो. हे पेय पोटासाठीदेखील हलके आहे, ज्यामुळे ते मुले आणि वृद्धांसाठी एक चांगला पर्याय ठरते”
जर तुम्हाला मूत्रपिंडाच्या समस्या असतील किंवा तुम्ही पोटॅशियम मर्यादित करणारे आहार घेत असाल, तर प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. “मधुमेहाच्या रुग्णांनी ते किती प्रमाणात सेवन करावे याचीदेखील जाणीव ठेवावी. कारण- नारळाच्या पाण्यात नैसर्गिक साखर असते म्हणून संयम राखणे महत्त्वाचे आहे,” असे डॉ. शेख म्हणाल्या.