तुमच्यापैकी अनेकांनी स्प्राऊट्स हा शब्द ऐकला असेल. पण, स्प्राऊट्स म्हणजे नक्की काय हे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी, स्प्राऊट्स म्हणजे कडधान्ये आणि काही भाज्यांपासून बनविला जाणारा कोरडा पौष्टिक पदार्थ! सहसा जिमला जाणारे आणि डाएट प्लॅन फॉलो करणारे आवर्जून हे स्प्राऊट्स खातात. स्प्राऊट्सची खासियत म्हणजे ते तयार करण्याची स्पेशल रेसिपी नाही. आजकाल टिफिनमध्ये बहुतांशी लोक चपाती-भाजीऐवजी स्प्राऊट्सच नेतात. कारण- ते बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि त्यात चवीसह पौष्टिकताही असते. ते फायबर, कॅल्शियम, अ व क ही जीवनसत्त्वे, पोटॅशियम व फॉस्फरसचे समृद्ध स्रोतदेखील आहेत. याचसंदर्भात आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अलका विजयन यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अलका विजयन यांच्या मते, या कडधान्यांचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत.
मोड आलेली कच्चे कडधान्ये खाताना सावधगिरी का बाळगावी?
दिल्लीस्थित पोषणतज्ज्ञ इश्ती सलुजा म्हणाल्या, “विशेषतः कच्चे किंवा न शिजवलेली कडधान्ये, स्वयंप्रतिकार रोग असलेल्या आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींमध्ये, ज्यात मुले आणि वृद्धांचा समावेश आहे, अन्न विषबाधा होऊ शकतात. त्यामध्ये प्रथिने आणि फायबरदेखील जास्त असतात. म्हणून कमकुवत मूत्रपिंड असलेल्यांनीही सावधगिरी बाळगली पाहिजे.”
स्वयंप्रतिकार रोग म्हणजे काय?
स्वयंप्रतिकार रोग म्हणजे अशी स्थिती जिथे तुमची रोगप्रतिकार शक्ती तुमच्याच शरीराच्या पेशींवर हल्ला करते. सामान्यतः, रोगप्रतिकार शक्ती संसर्गांपासून संरक्षण करते, पण या रोगात ती स्वतःच्याच ऊतींना लक्ष्य करते.
त्या पुढे म्हणाल्या की, संवेदनशील आतडे असलेल्यांनी स्प्राउट्स खाण्याबाबत खूप काळजी घ्यावी. कारण- ती शरीराला विघटन करण्यास आणि पचण्यास कठीण असतात, ज्यामुळे तुमच्या आतड्यांच्या स्थितीनुसार पोटदुखी, गॅस आणि अतिसार किंवा बद्धकोष्ठता यांचा त्रास होऊ शकतो. मूळव्याध असलेल्यांनी कच्चे स्प्राउट्स खाऊ नयेत. कारण- ती तुमच्या आजाराची लक्षणे वाढवू शकतात.
भाज्या सामान्यतः आरोग्यासाठी चांगल्या मानल्या जात असल्या तरी काही भाज्या अशा आहेत की, ज्या अंकुरलेल्या असल्यास तुम्ही खाऊ नयेत. चेन्नईतील प्राग्मॅटिक न्यूट्रिशन येथील मुख्य पोषणतज्ज्ञ मीनू बालाजी यांनी अशा भाज्यांची दिलेली यादी खालीलप्रमाणे :
कांदा
कांदा बराच काळ साठवून ठेवल्यास, त्यातून हिरवे कोंब फुटताना तुम्ही पाहिले असेल. जर कांद्याला दुर्गंधी येत असेल आणि त्याची पोत मऊ असेल, तर अंकुरलेला कांदा खाऊ नका.
लसूण
जरी याचे सेवन करणे हानिकारक नसले तरी लसूण खराब परिस्थितीत साठवल्यास तो गळून पडतो आणि बुरशी निर्माण होण्याची शक्यता असते. अशा स्थितीतील लसूण टाकून देणे इष्ट ठरेल.
बटाटा
कांदा आणि लसणाप्रमाणेच बटाट्यालाही कोंब फुटतात. त्यामुळे सोलानाइनसारखे ग्लायकोआल्कलॉइड तयार होतात, जे हानिकारक असू शकतात. त्यामुळे पोटदुखी, मळमळ व अतिसार यांसारख्या पचन समस्या उद्भवू शकतात.
अंकुरलेला राजमा
मोड आलेला राजमा योग्यरीत्या शिजवला नाही, तर त्यामुळे पचनास गंभीर त्रास होऊ शकतो. त्यात फायटोहेमॅग्लुटिनिन नावाचे संयुग असते. राजमा अंकुरल्याने त्यातील या संयुगाची तीव्रता वाढू शकते आणि आतड्यांच्या अस्तरावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
स्प्राउट्स कच्चे खाणे जीवावर बेतू शकते. स्प्राउटस् हे कडधान्यापासून तयार होत असतात. अनेकदा त्यामध्ये कोलाई आणि सॅल्मोना हे हानिकारक जीवाणू वाढण्याची शक्यता असते. कच्च्या स्प्राउट्सच्या सेवनामुळे हे जीवाणू पोटात जाऊन फूड पॉयझनिंग म्हणजेच अन्न विषबाधा होण्याची शक्यता असते.
त्यातील जीवाणूमुळे पोटात दुखणे, अतिसार किंवा उलटीचा त्रासदेखील होऊ शकतो.
खास करून लहान मुले, वयोवृद्ध व गरोदर महिला म्हणजेच पचनशक्ती नाजूक असलेल्यांना कच्च्या अंकुरित धान्याच्या सेवनामुळे अधिक त्रास जाणवू शकतो.
तसेच संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या जेवणात कच्चे स्प्राउट्स खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.